केरळ : शाळेने लैंगिक भेदभावाला दिला फाटा, मुले-मुली सर्वांसाठी आहे सारखाच गणवेश

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी केरळच्या कोचीमधील एका शाळेनं खास पाऊल उचललं आहे. या शाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सारखाच गणवेश तयार केला आहे.

कोचीमधील एर्नाकुलम जिल्ह्यातल्या वलयंचिरंगरा येथील पूर्व प्राथमिक शाळेनं हे पाऊल उचललं आहे. या माध्यमातून मुले-मुली असा लैंगिक भेद दूर करण्याची सुरुवात या शाळेनं केली आहे.

2018 मध्येच या शाळेनं अशा प्रकारच्या लैंगिक विषमता दूर करणाऱ्या गणवेशाचं धोरण जाहीर केलं. होतं. त्यानुसार मुले-मुली अशा सर्व विद्यार्थ्यांना सारखाच गणवेश ठरवण्यात आला.

या गणवेशात शर्ट आणि थ्री फोर्थ (गुडघ्यापर्यंत) पँट यांचा समावेश होता. याबाबत माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

स्कर्टमुळे येतात अनेक अडचणी

तत्कालीन मुख्याध्यापिका सी राजी यांनी या मागे असलेला विचार स्पष्ट केला. त्यांनीच 2018 मध्ये ही कल्पना मांडली आणि यासाठी पुढाकार घेतला होता.

"ही शाळा दूरदृष्टी ठेवून काम करते. या शाळेत काही उपक्रम राबवण्याची चर्चा झाली, तेव्हा त्यात लैंगिक समानता हा महत्त्वाचा मुद्दा होता," असं मत शाळेच्या मुख्याध्यापिका सी राजी यांनी व्यक्त केलं.

आमच्या मनात गणवेशाबाबत विचार आला. मी याबाबत विचार करत होते. त्यावेळी मुलींना स्कर्टमुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं लक्षात आलं, त्यातूनच अशा गणवेशाचा विचार पुढे आला, असंही त्या म्हणाल्या.

आम्ही सर्वांबरोबर या बदलाविषयी चर्चा केली. 90 टक्के पालकांनी याला पाठिंबा दिला. मुलेही आनंदी होती. आता समाजातही यावर चर्चा होत आहे, याचा आनंद असल्याचं राजी म्हणाल्या.

निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत

"लैंगिक समानता हा मुद्दा विद्यार्थी आणि पालक सर्वांच्या मनामध्ये असायला हवा. मुलींना स्कर्ट वापरताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. खेळताना किंवा टॉयलेटचा वापर करताना त्यांना अशा अडचणींना सामोरं जावं लागतं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे," असं शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एनपी अजयकुमार म्हणाले.

लैंगिक समानतेच्या भावनेतून या गणवेशाची संकल्पना समोर आलेली आहे. ही 105 वर्षे जुनी शाळा आहे. त्यामुळं या निर्णयाला तसा विरोधही झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शाळेच्या शैक्षणिक समितीच्या निर्णयाला सगळीकडूनच होकार मिळाला. त्याशिवाय समाजातूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं, अजयकुमार म्हणाले.

"माझ्या मुलांनी 2018 मध्ये या शाळेत प्रवेश घेतला. मुले आणि मुलींमध्ये समानता असणं हे गरजेचंच आहे. हीच यामागची कल्पनाही होती. या गणवेशात त्यांना सर्वकाही अगदी सहजपणे करणं शक्य होतं, असं पालक-शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व्ही विवेक म्हणाले.

स्वातंत्र्य आणि आनंदही समान

हा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी 2018 मध्येच झाली होती. पण, त्यामुळं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असं शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका सुमा केपी यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना सर्वकाही करण्यासाठी हा गणवेश अत्यंत उपयोगी ठरतो. त्यामुळं मुली आणि त्यांचे पालकही अत्यंत आनंदी आहेत, असं सुमा म्हणाल्या.

अशाप्रकारचा निर्णय घेण्यामागचं प्रमुख कारण हे मुले आणि मुली अशा सर्वच विद्यार्थ्यांनी सारख्या प्रमाणात स्वातंत्र्य आणि आनंद याचा अनुभव घ्यावा, हे होतं असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)