You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील यांचं भरपावसात भाषण #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. चंद्रकांत पाटील यांचं भरपावसात भाषण
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भरपावसात भाषण केलं आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरपावसात केलेल्या भाषणाची राज्यभर मोठी चर्चा झाली होती.
त्यानंतर आता पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेला एक कार्यक्रमही चर्चेत आला आहे. कारण या कार्यक्रमात पाऊस कोसळायला सुरुवात झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी न थांबता भिजत आपलं भाषण सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं.
पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान हे चित्र पाहायला मिळालं आहे.
या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू असतानाच पाऊस कोसळू लागला, मात्र पाटील यांनी न थांबता आपलं संबोधन सुरूच ठेवलं.
2. जितकी प्रगती व्हायला हवी होती, तितकी झाली नाही- मोहन भागवत
गेल्या 75 वर्षांत आपण जितकी प्रगती करायला हवी होती, तितकी प्रगती केलेली नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित संत ईश्वर सन्मान 2021 कार्यक्रमात संघ प्रमुख मोहन भागवत बोलत होते.
भागवत म्हणाले, "आपण भगवान 'जय श्रीराम'चा नारा जोरात लावतो, पण आपणही त्यांच्यासारखे व्हायला हवे. तो देव होता, असे आपल्याला वाटते. भरतासारख्या भावावर फक्त देवच प्रेम करू शकतो, आपण करू शकत नाही, असा सामान्य माणसाचा विचार आहे. त्यामुळे ते त्या मार्गावर जाऊ शकत नाहीत. स्वार्थपणा सोडून जनतेच्या भल्यासाठी काम करणे अवघड आहे.
"जगातील सर्व देशांनी मिळून जेवढे महापुरुष आपल्या देशात गेल्या 200 वर्षांत घडले असतील, तेवढेच घडले आहेत, असेही ते म्हणाले. व्यक्तीचे जीवन सर्वांगीण जीवनाचा मार्ग प्रकट करते."
3. मोदी हे सर्वांत मोठे अभिनेते- औवेसी
मोदी हे देशातील सर्वांत मोठे कलाकार आहेत. ते राजकारणात आले, नाहीतर फिल्म इंडस्ट्रीचं काय झालं असतं?, असं वक्तव्य एमआय़एम पक्षाचे नेते असदुद्दीन औवेसी यांनी केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
"शेती कायदे मागे घेतल्यानंतर आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिल्याचं मोदींनी म्हटलं. यावरूनच कळतं की मोदी किती मोठे कलाकार आहेत.
"या कायद्यांविरोधात 750 शेतकऱ्यांनी जीव दिला, तरीही ते जागेवरून हटले नाहीत. याला म्हणतात तपस्या. तुम्ही म्हणताय की माझ्याच तपस्येत कमतरता राहिली, कलाकार आहात तुम्ही," असंही औवेसी पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच शेती कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या कायद्यांविरोधात शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते.
4. ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
माधवी गोगटे यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं.
'भ्रमाचा भोपळा' आणि 'गेला माधव कुणीकडे' ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. तसेच 'घनचक्कर' या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती.
5 . राज्यात अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान
महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपुरात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
कोकणात पावसाचं पाणी शेतात शिरलंय. ऐन काढणीला आलेल्या धान पिकाचं यामुळे मोठं नुकसान झालंय. शासनानं तातडीनं नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)