शरद पोंक्षे- सावरकरांना 2014 नंतर लक्ष्य केलं जात आहे #5मोठ्याबातम्या

विनायक दामोदर सावरकर, शरद पोंक्षे, इतिहास

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, शरद पोंक्षे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-

1. सावरकरांना2014 नंतर लक्ष्य केलं जात आहे- शरद पोंक्षे

2014 नंतर सावरकरांना सतत लक्ष्य केलं जात आहे. दुसरं कुठलंच नाव येत नाही. हिंदुत्ववादी अनेक नेते होऊन गेले पण त्यांना लक्ष्य केलं गेलं नाही. मात्र, सावरकरांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातंय असं अभिनेते शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, "सावरकरांनी एक कणभरही हिंदुत्वाला तिलांजली दिली नाही. हिंदुत्वाच्या भल्यासाठी मी काम करीत राहणार अशीच सावरकरांची भूमिका होती. बाकी इतर हिंदुत्ववाद्यांनी राजकारणासाठी कुठंतरी तोडजोडी केल्या, हिंदुत्वासाठी तडजोड केल्या. पण सावरकरांनी नाही केली."

"सावरकर हे भारतरत्नच नाहीत तर विश्वरत्न आहेत. मात्र, सावरकरांवर शिंतोडे उडवायचे असं करुन सावरकरांना बदनाम केलं जात आहे. 80 टक्के हिंदूंना दुखवायचे असेल तर सावरकरांना बदनाम करायचे, हे काम सुरू आहे," असं पोंक्षे म्हणाले.

"कट्टरता हिंदूंमध्ये येऊ शकत नाही. जिथं नियम येतात, घटना येते तिथं कट्टरता येते. हिंदू धर्मामध्ये ही भानगड नाही. कारण मुळात धर्म आहे. इतर धर्मसंस्था आहेत. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार धर्मसंस्थांची निर्मिती केली. देवाला शिव्या देणारा, नास्तिक असतानाही तो हिंदूच असतो," असं त्यांनी सांगितलं.

2. राजस्थानमध्ये सर्व मंत्र्यांचा राजीनामा

राजस्थानमध्ये उद्या होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत सरकारमधील सर्व मंत्र्यानी राजीनामा दिला आहे.

रविवारी राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट असा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

काँग्रेस, राजस्थान, अशोक गेहलोत, सचिन पायलट

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट

काँग्रेस नेते सचिन पायलट हे आधीच अशोक गहलोत यांच्या कारभारावर नाराज आहेत. गेहलोत हे पायलट समर्थकांना डावलतात अशी त्यांची तक्रार आहे. तसेच राजस्थानमध्ये 2023 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी सचिन पायलट प्रयत्नशील आहेत.

गेल्या वर्षी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांनी ही बंडखोरी केली होती. सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता.

3.नवाब मलिकांच्या कन्येचं ट्वीट, वानखेडेंच्या विवाह दाखल्याची माहिती

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या विवाहाबाबतचे अर्धसत्य लोकांना माहीत होतं, आता मी पूर्ण सत्य सांगत आहे, असं सांगत सना यांनी समीर वानखेडे यांच्या विवाहाचा कथित दाखला ट्विट केला आहे.

'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

समीर वानखेडे

फोटो स्रोत, ANI

या कथित दाखला म्हणजे समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या विवाह झाल्याचा दाखला असल्याचे सना यांनी दाखवून दिले आहे. या दाखल्यावर समीर वानखेडे यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिलेले आढळते. तसेच हा दाखला 26 डिसेंबर 2006 रोजी जारी करण्यात आल्याचे यावर दिसत आहे.

या पूर्वी समीर वानखेडे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या निमंत्रण पत्रिकेवर देखील समीर दाऊद वानखेडे असे नमूद केलेले दिसत होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आता सना यांनी त्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेनंतर लग्नाचा दाखला आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे.

4. आम्हाला कोणाचेही धर्मांतर करायचे नाही, चांगला माणूस घडवायचाय- मोहन भागवत

आम्हाला कोणाचाही धर्म बदलायचा नाहीये तर माणसाला समृद्ध जीवन जगण्याची पद्धत शिकवायची आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. छत्तीसगढ येथे आयोजित घोष शिबिरात ते बोलत होते. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

"आपण भारतभूमीत जन्मलो आहोत. आमचा पंथ कोणाचीही उपासना पद्धत न बदलता चांगला माणूस घडवू शकतो अशी शिकवण आपल्याला संपूर्ण जगाला द्यायची आहे", असं त्यांनी सांगितलं.

मोहन भागवत, धर्म, हिंदू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

"भारताला विश्वगुरु बनवायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. देशाची व्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न असेल तर ते योग्य नाही.

पूजा-उपासना यामध्ये विविधता असूनही आपलेपणाची वागणूक ही सर्वांना एकजुटीने मिळून मिसळून राहण्याची शिकवण देते. कोणालाही परकेपणाची वागणूक देत नाही. हीच आपल्या धर्माची शिकवण आहे. या माध्यमातून लोकांना समृद्ध जीवन जगण्याची शिकवण देता येऊ शकते. हरवलेलं व्यावहारिक संतुलन परत मिळवता येऊ शकतं, "असं त्यांनी सांगितलं.

5. राज्यात दारुवरच्या उत्पादन शुल्कात 50 टक्क्यांनी घट होणार

राज्यात आयात करणाऱ्या दारूवर उत्पादन शुल्क तब्बल 50 टक्क्यांनी कपात करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे इतर राज्यात असलेल्या दारूच्या किंमती राज्यातली किंमती एक समान असणार आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

दारू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दारू

राज्यात अनेक प्रकारचे मद्य हे आयात होत असतं. स्कॉच प्रकारच्या दारूतून राज्याला मोठा महसूल मिळतो.

राज्य सरकारला स्कॉचच्या विक्रीतून वर्षाला 100 कोटींचा महसूल मिळत असतो. या कपातीतून आता राज्याच्या महसुलामध्ये वाढ होणार आहे. राज्याचा महसूल आता 250 कोटी रुपये वार्षिक होण्याची अपेक्षा आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)