'अनिल देशमुखांना झालेल्या त्रासाचा एक-एक मिनिट वसूल करू' - शरद पवार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. अनिल देशमुखांना झालेल्या त्रासाचा एक-एक मिनिट वसूल करू - शरद पवार
अनिल देशमुख यांची वस्तुस्थिती मला माहित आहे. ते पुन्हा बाहेर येऊन सक्रिय होतील. त्यांना जो त्रास दिला जात आहे, त्याचा एक-एक मिनिट मी वसूल करेन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचा उल्लेख केला.
'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नागपूरला आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत, असा हा पहिलाच दिवस आहे, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, काय घडलं ते त्यांनी मला सगळं सांगितलं होतं. आरोप करणारे फरार झाले. पण अनिल देशमुख तुरुंगात आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
2. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा टीव्हीवरच्या चर्चांनी जास्त प्रदूषण होतं, सरन्यायाधीशांनी सुनावलं
राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची समस्या अधिकाधिक बिकट बनत चालली आहे. दृश्यमानता कमी झाल्यामुळे दिल्ली सरकारने 2 दिवसांचा लॉकडाऊन तसंच वर्क फ्रॉम होम यांसारख्या पर्यायांबाबत चर्चा सुरू केली आहे.

फोटो स्रोत, Reuters
दरम्यान या पार्श्वभूमीवर भारताचे सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमण यांनी भारतातील वृत्तवाहिन्यांच्या कामकाजावर टीका केली.
"टीव्हीवर चालणाऱ्या चर्चा या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रदूषण करतात. तिथे प्रत्येकजण आपापला अजेंडा राबवत आहे. पण इथे आम्ही समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत," असं रमण म्हणाले, ही बातमी लोकसत्ताने दिली.
3. मोदींच्या मंत्रिमंडळात कुणालाच मंत्री असल्यासारखं वाटत नाही - संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांना आपण मंत्री असल्यासारखं वाटत नाही. खासदाराला आपण खासदार असल्यासारखं वाटत नाही. पण महाराष्ट्रात संविधान आणि लोकशाहीच्या आधारावर हे सरकार चालत आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राज्यात एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते.
आता संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस अजूनही स्वतःला मुख्यमंत्रीच समजतात, त्यामुळेच ते ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत, असं राऊत म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.
4. 'ऊन, वारा, पावसात एसटी कर्मचारी आस लावून बसलाय, लक्ष द्याल का?'
ऐन दिवाळीपासून पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. मुंबईतील आझाद मैदानातही आठवड्याभरापासून शेकडो एसटी कर्मचारी भाजप नेत्यांसह बसले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'विविध विषयांच्या धुराळ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे तसेच कायम आहेत! ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत 10 दिवसांपासून एसटी कर्मचारी आस लावून आहेत! दिशाभूल, संभ्रम, खोटे आरोप,फसवाफसवी, माध्यम व्यवस्थापन इत्यादी काही काळ बाजूला ठेऊन त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्याल का?' असा सवाल फडणवीसांनी केला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
5. ठाकरे सरकार घेणार सलमान खानची मदत
मुस्लीम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळेच या भागांमध्ये लस घेण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत.
म्हणूनच आता राज्य सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सलमान खानचा मोठा चाहता वर्ग असून महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे.
याशिवाय, मुस्लीम धर्मगुरूंचीही लसीकरण मोहिमेत मदत घेतली जाईल, मुस्लीम समाजातील सदस्यांनी लसीकरण करुन घेण्यासंदर्भात जनजागृती केली जाईल, असं टोपे यांनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























