भागवत कराड यांनी विमानात सहप्रवाशाचे प्राण कसे वाचवले? व्हॅसोव्हेजन सिनकोप म्हणजे काय?

डॉ. भागवत कराड

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या एका फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

हा फोटो एका विमानातला असून यामध्ये डॉ. कराड हे एका व्यक्तीवर उपचार करत असल्याचं दिसून येतं.

केंद्रात मंत्री असलेल्या भागवत कराड यांनी प्रसंगावधान राखत विमानात आपल्या मूळच्या डॉक्टरच्या भूमिकेत तातडीने प्रवेश केला.

त्यांनी दिलेल्या आपत्कालीन उपचारांमुळे त्या प्राणही वाचले. डॉ. कराड यांच्या या कामगिरीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊ.

नेमकं काय घडलं?

डॉ. भागवत कराड हे सोमवारी (15 नोव्हेंबर) रोजी मध्यरात्री 1 वाजता इंडिगो फ्लाइट क्रमांक 171ने दिल्ली ते मुंबई प्रवास करत होते. ते विमानात पहिल्याच रांगेत बसले होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात ते झोपी गेले.

काही वेळाने त्यांना विमानातील क्रू सदस्यांच्या आवाजाने जाग आली. घोषणा सुरू होती, "विमानात कुणी डॉक्टर असेल तर तत्काळ संपर्क साधा. एका प्रवाशाला मदतीची गरज आहे."

भागवत कराड

फोटो स्रोत, Twitter

हा प्रसंग डॉ. भागवत कराड यांनी फेसबुकवर पोस्ट करत हा प्रसंग शेअर केला. ते म्हणतात, "प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट इंडिगोमध्ये 12 A सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरू झाली आणि मला कळाले.

एका क्षणाचाही देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड शुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली, असं डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' संतांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या, असं आवाहनदेखील डॉ. कराड यांनी केलं.

खुर्चीवर झोपवून दिले प्रथमोपचार

यासंदर्भात डॉ. कराड यांच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले, "मी ज्यावेळी त्या व्यक्तीकडे गेलो, तेव्हा तो विमानातील खुर्च्यांच्या मध्ये आडवा बेशुद्धावस्थेत पडला होता.

मी त्याची नाडी तपासली. तेव्हा ती अतिशय मंद झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं. हा हायपोटेन्शनचा प्रकार असल्याचं माझ्या लक्षात आलं."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"तातडीने मी त्या व्यक्तीला खुर्चीवर उताणं करून प्रथमोपचारास सुरुवात केली. त्याचे पाय वर केले. कपडे सैल करून त्याच्या छातीवर थोडं चोळलं. दरम्यान, विमानातील क्रू सदस्यांना ग्लुकोज अथवा ORS आणण्यास सांगितलं.

विमानात ORS उपलब्ध होतं. ते द्रावण संबंधित व्यक्तीला पाजण्यात आलं. त्यानंतर त्याला थोडं बरं वाटू लागलं."

या घटनेचा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला. हाच फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत असून डॉ. कराड यांचं कौतुक होताना दिसत आहे.

हायपोटेन्शन किंवा हायपोग्लायसेमिया

डॉ. कराड सांगतात, "संबंधित व्यक्ती हा अनोळखी होता. त्यामुळे त्याची मेडिकल हिस्टरी काय आहे, हे आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं. त्याची नाडी तपासताच त्याचा रक्तदाब कमी झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्यादृष्टीने उपचार सुरू केले.

शिवाय शरीरातील ग्लुकोज पातळी खालावल्यास अशा प्रकारे चक्कर येण्याचे प्रकार उद्भवतात. त्यामुळे हायपोटेन्शन आणि हायपोग्लायसेमिया या दोन्ही स्थितींच्या अनुषंगाने उपचार देण्यास मी सुरू केलं. अशा व्यक्तींना तत्काळ ग्लुकोजमिश्रीत पाणी पाजणं गरजेचं असतं. त्यासाठी ORS ही मागवून ठेवलं."

छातीत धडधड

फोटो स्रोत, Getty Images

संबंधित व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर डॉ. कराड यांनी त्याच्याकडून आरोग्याबाबत माहिती जाणून घेतली. संबंधित व्यक्तीला कोणत्याही व्याधी नाहीत, असं त्या व्यक्तीने सांगितलं.

म्हणजे केवळ झोपेतून अचानक उठून उभं राहिल्यामुळे त्याला अशा प्रकारे चक्कर आली. याला शास्त्रीय भाषेत 'व्हॅसोव्हेजन सिनकोप' असं संबोधलं जातं, असं डॉ. कराड यांनी सांगितलं.

यादरम्यान संबंधित प्रवाशासोबत चर्चा करताना डॉ. कराड यांनी त्याला ECG आणि इतर काही आवश्यक चाचण्याही करून घेण्याचा सल्ला दिला.

व्हॅसोव्हेजन सिनकोप काय आहे?

डॉ. कराड सांगतात, "झोपेतून अचानक उठून उभे झाल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कधी-कधी अंधारी आल्यासारखं होतं. यालाच 'व्हॅसोव्हेजन सिनकोप' म्हटलं जातं. हे कुणालाही होऊ शकतं. अगदी निरोगी व्यक्तीलाही."

सोलापूर येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ. अग्रजा चिटणीस यांनी सिनकोप व्हॅसोव्हेजनसंदर्भात सविस्तर समजावून सांगितलं.

चक्कर येणे

फोटो स्रोत, Getty Images

त्या म्हणतात, "व्यक्ती झोपलेला असताना आपला रक्तप्रवाह संथपणे हृदयाच्या दिशेने जात असतो. पण झोपेतून अचानक उठून थेट उभं राहून चालू लागल्यानंतर या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला थोडं गरगरल्यासारखं होतं. हे अगदी कुणालाही होऊ शकतं.

त्याचप्रमाणे, आपण दिवसभर आपण काही ना काही खात असतो. परंतु, रात्रभर झोपेत असल्यामुळे बराच वेळ जेवण केलेलं नसतं. अशा स्थितीत सकाळच्या वेळी हायपोग्लायसेमियाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.

मधुमेह असणाऱ्या किंवा नसणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना ही समस्या येऊ शकते. शिवाय विमान प्रवासात बराच काळ काही खाल्लेलं नसतं, त्यामुळे अशा ठिकाणी या अडचणी येऊ शकतात.

काय काळजी घ्यावी?

व्हॅसोव्हिजन सिनकोप टाळण्यासाठी झोपेतून अचानक आडव्याचं उभं होण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया करावी, असा सल्ला डॉ. चिटणीस यांनी दिला.

त्या म्हणतात, झोपेतून उठल्यानंतर थोडं थांबून उभं राहावं. यामुळे रक्तप्रवाह विचलित न होता समांतर पद्धतीने सगळ्या दिशेने होऊ लागतो.

याशिवाय, प्रवासाला जाताना आपण भरपूर पाणी प्यायलेलं असणं गरजेचं असतं. विशेषतः विमानप्रवासात अनेकांना विविध प्रकारचे त्रास होतात, ते टाळण्यासाठी आपलं शरीर हायड्रेटेड असणं महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

निरोगी व्यक्तींनी नियमितपणे आपल्या शरीराची चाचणी करत राहावी. रक्तदाब, मधुमेह यांच्यासारख्या व्याधी असलेल्या रुग्णांनी आपली औषधं, ग्लुकोज वगैरे गोष्टी सोबत बाळगाव्यात.

डॉ. कराड म्हणतात,की प्रवासाला जाण्यापूर्वी रुग्णांनी एकदा आपल्या डॉक्टरांशी चर्चा नक्कीच केली पाहिजे. त्यांनी आपली औषधं नियमित वेळेवर घेऊनच प्रवासाला निघावं.

"आपल्या व्याधींबाबतची माहिती असलेलं प्रिस्क्रिप्शन अथवा आपली औषधं जवळ ठेवावीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपत्कालीन स्थितीत घेण्यासाठीची औषधंही आपल्या सोबत बाळगल्यास अशा प्रकारच्या अडचणींवर सहज मात करता येऊ शकते," असंही डॉ. कराड म्हणतात

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)