बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
इतिहासलेखक बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
'बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया होऊन वृद्धपकाळाने ते गेल्या आठवड्याभरापासून दीनानाथ रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे. सध्या ते अतिदक्षता विभागात आहेत,' अशी माहिती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी दिली.
"बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आज (14 नोव्हेंबर) सकाळपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीमध्ये उपचार सुरू आहेत," असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै 2021 रोजी वयाच्या शंभरीत पदार्पण केलं. या निमित्त पुण्यातील कात्रज येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले उपस्थित होत्या.
महाराष्ट्रसह देशभरात इतिहास संशोधक, 'शिवशाहीर' आणि लेखक म्हणून ते ओळखले जातात. त्याचं जन्म नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्याजवळच्या सासवड इथे झाला.
पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरू केलं. 2015 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजारहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले हा बाबासाहेबांच्या अभ्यासाचा विषय आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचे श्रेय त्यांना दिलं जातं. पण अनेक प्रसंगी त्यांना विरोध झाला आहे, त्यांच्या कामावर टीकाही झाली आहे.शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक असले तरी ते स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नाहीत. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना "शिवशाहीर" म्हणतात, पण त्यापुढे जाऊन ते म्हणायचे की "मला काही म्हटलं नाही तरी चालेल. पण शिवचरित्र वाचा."बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत: ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललिक कादंबरी लेखन, नाट्य लेखन केलं आहे.'राजा शिवछत्रपती' ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती मानली जाते. तसंच जाणता राजा हे नाटकही लोकप्रिय आहे.
2015 मध्ये त्यांना महाराष्ट्रभूषण तर 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या नाटकाचे 1200हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक 5 भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे.
दीडशे कलावंत, असंख्य प्राणी आणि भव्य रंगमंच हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद
2015 मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती.

फोटो स्रोत, AFP
'दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला', हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. "बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही," असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे सांगतात.
त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या 10 लाख रकमेपैकी फक्त 10 पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात 15 लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























