नवाब मलिक न्यायाची लढाई लढत आहेत-संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images
पेट्रोलचे 50 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले जातात. राज्य सरकारची आर्थिक कोंडी केली जाते. जीएसटी परतावा दिला जात नाही. मदत केली जात नाही. असं असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रातले मंत्री महागाईवर का बोलत नाहीत, असा प्रश्न शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
आज (13 नोव्हेंबर) औरंगाबाद येथे शिवसेनेकडून महागाईविरोधातील मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याचं नेतृत्व संजय राऊत यांच्याकडे देण्यात आलं आहे. यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, तिथल्या सरकारला काम करू दिलं जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशीरपणे घुसवल्या जातात. तिथले मंत्री, नेते यांच्यावर जोरजबरदस्ती, जुलूम केला जातो. हे आपण महाराष्ट्रात पाहत आहोत. पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि केरळमध्येही तेच सुरू आहे."
"पंतप्रधान किंवा केंद्रातले मंत्री हे वाढत्या महागाईबाबत बोलत नाहीत. देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. त्याच्यावर बोलायला कुणी तयार नाही. लोकांचं लक्ष विचलित करून भलतेसलते प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजचा औरंगाबादचा मोर्चा ही त्याच्याविरुद्धची पडलेली महाराष्ट्रातली पहिली ठिणगी आहे, असं राऊत म्हणाले.
"भारतीय जनता पक्ष लढण्यासाठी कधीच स्वतःचं शस्त्र वापरत नाही. नेहमी दुसऱ्यांच्या खांद्याचा वापर केला जातो. पण ते खांदेही मजबूत नसतात, त्यामुळे नेहमीच त्यांचा बार फुसका निघतो. भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून आम्हाला लक्ष्य केलं जातं. पण शिवसेना हा हत्ती आहे. हत्ती चालतो, कुत्रे भुंकतात, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही.
"नवाब मलिक यांच्या पाठिशी उभे असल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मलिक हे न्यायाची लढाई लढत आहेत. संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीने ही लढाई ते लढत आहे. हे प्रकरण लवकर संपावं अशी आमची इच्छा होती. पण भारतीय जनता पक्षाला हे समजत नसेल, तर लढाई सुरू राहील.
हा चित्रपट बराच काळ चालेल. इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक सांभाळतील. त्यानंतर यामध्ये माझी एन्ट्री होईल", असं राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली.
उद्धव ठाकरे यांच्यावर काल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यांना दोन-तीन दिवसांत घरी सोडण्यात येईल. ते लवकरच कामावर परततील, अशी खात्री आहे, असं राऊत म्हणाले.
शिवाय, ठाकरे हे रुग्णालयातून राज्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी आवश्यक सूचना ते देत आहेत, असंही राऊत यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























