अनिल देशमुखांवर ईडीच्या चौकशीची टांगती तलवार कायम, समन्स रद्द करण्याची मागणी कोर्टाने फेटाळली #5मोठ्या बातम्या

अनिल देशमुख

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. अनिल देशमुखांवर ईडीच्या चौकशीची टांगती तलवार कायम, समन्स रद्द करण्याची मागणी कोर्टाने फेटाळली

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची ईडीचे समन्स रद्द करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावंच लागणार आहे.

मात्र हायकोर्टानं ईडीच्या चौकशीला जाताना वकिलांना सोबत नेण्याची मुभा अनिल देशमुख यांना दिली आहे. त्यामुळं चौकशीदरम्यान त्यांचे वकील उपस्थित राहू शकतील.

ईडीचे समन्स रद्द करण्याची मागणी फेटाळली असली तर देशमुखांना अटकेपासून संरक्षण हवं असेल तर अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात ते दाद मागू शकतात, असंही हायकोर्टानं म्हटलं आहे.

100 कोटींच्या वसुलीच्या टार्गेट प्रकरणी परमबीर सिंह यांच्या आरोपांवर ईडीमार्फत तपास सुरू आहे. ईडीनं पाच वेळा समन्स बजावलं. पण समन्स रद्द करुन अटकेपासून संरक्षणाची मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. ती उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

2. दिवाळी भेट म्हणून मुंबई पोलिसांना प्रत्येकी 750 रुपये

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडं उत्साहाचं वातावरण असलं तरी मुंबई पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबई पोलिसांना दिलेली दिवाळी भेट.

दिवाळीच्या निमित्तानं मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 750 रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली आहे. मात्र, ही पोलिस कर्मचाऱ्यांची चेष्टा असल्याचं मत पोलिस दलातून उमटत आहे.

मुंबई पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला सबसिडी कँटिनमधून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून 750 रुपयांची खरेदी करता येईल. त्यावर लागलेली रक्कम मात्र त्यांना स्वतः भरावी लागणार आहे.

पोलिस कल्याण निधीतून ही भेट दिली जाणार आहे. मात्र बेस्ट किंवा पालिका कर्मचारी यांना भरघोस बोनस आणि पोलिसांना केवळ 750 रुपये दिल्यानं पोलिस कर्मचारी नाराज आहेत.

सकाळनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

3. राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस परवडली, ते दरोडेखोर नसतात, चंद्रकांत पाटलांची टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांच्यापेक्षा काँग्रेस परवडली असं म्हटलं आहे. काँग्रेसमधले सुसंस्कृत असतात, ते दरोडेखोर नसतात अस म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर आरोप केले.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Chandrakant Patil

जयंत पाटील सांगतील भाजपशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर राष्ट्रवादी हा सर्वाधिक बेभरवशाचा पक्ष आहे. ते सकाळ, दुपार, संध्याकाळ राजकारण करत असतात, असंही पाटील म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता, पगारवाढ यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलक शेतकऱ्यांची पाटील यांनी सोलापुरात भेट घेतली. सरकारनं या कर्मचाऱ्याच्या तोंडाला पानं पुसली अशी टीका करत, त्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. लोकमतनं याबाबतचं वृत्तं दिलं आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. अहमदनगरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याच्या हत्येनंतर एसटी कर्मचारी अधिक संतप्त झाले आहेत. एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

4. 3 लोकसभा, 29 विधानसभांच्या जागांच्या पोट-निवडणुकीसाठी मतदान सुरू

देशभरात लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 29 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. 13 राज्यांसह दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील जागांसाठी या निवडणुका होत आहे.

लोकसभेच्या तीन जागा हिमाचल प्रदेशमधील मंडी, मध्य प्रदेशातील खांडवा आणि दादरा आणि नगर हवेली या आहेत. या तिन्ही ठिकाणी खासदारांच्या मृत्यूमुळं जागा रिक्त आहेत.

तर विधानसभेच्या जागांचा विचार करता आसामध्ये पाच, पश्चिम बंगालमध्ये चार तर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयात प्रत्येकी तीन जागांवर मतदान होत आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

महाराष्ट्रात विधानसभेच्या एका जागेसाठी मतदान होत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. दरम्यान मंगळवारी या पोटनिवडणुकांचा निकाल लागेल.

एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

5. मुंबईजवळ पालघरमध्ये होणार विमानतळ, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

मुंबईजवळ असलेल्या पालघरमध्ये विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुंबई विमानतळाचा वापर पूर्ण क्षमतेनं होतं आहे. त्यानंतर नवी मुंबई विमानतळावरील सेवाही कमी पडणार आहेत. त्यामुळं मुंबईजवळ पालघरमध्ये हे तिसरं विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव असल्याचं ते म्हणाले.

कोकणातील सीआरझेड बाबतही जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे, असंही ठाकरे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)