NEET-PG च्या समुपदेशनाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, काय आहे कारण?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

NEET-PG साठीच्या समुपदेशनाला सध्या स्थगिती द्यावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायायालयानं केंद्र सरकारला केली आहे.

सरकारच्या ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील (EWS) विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाची वैधता जोपर्यंत ठरवली जात नाही, तोपर्यंत समुपदेशनाला सुरूवात करू नये, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं की, 'न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी जर काऊन्सिलिंगला सुरूवात झाली, तर विद्यार्थ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.'"आम्ही जोपर्यंत कोणत्याही एका निष्कर्षापर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्ही समुपदेशन सुरू करणार नाही, असं आम्ही ग्राह्य धरू," असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

वैद्यकीय 'नीट' परीक्षेतील 10 टक्के आर्थिक दुर्बल आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर सात ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला आर्थिक निकषांबाबतचे स्पष्टीकरण करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, केंद्र त्यामध्ये अपयशी ठरले.

'आर्थिक दुर्बल आरक्षणासाठी निश्चित केलेला आठ लाख रुपये उत्पन्नाचा आकडा तुम्ही आणला कुठून?' असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारला होता.

आठ लाख रुपयांच्या क्रिमीलेअरचा निकष ठरवताना ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांच्या उत्पन्न व संपत्तीत तफावत असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला होता.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी NEET-PG साठीचे समुपदेशन 24 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच ही प्रक्रिया पार पडत असल्यानं कोर्टानं हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

NEET परीक्षा म्हणजे काय?

NEET म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी या केंद्रीय संस्थेमार्फत या परीक्षा घेतल्या जातात.

NEET परीक्षा इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेत देता येऊ शकते. पात्र विद्यार्थी देशात कोणत्याही सरकारी किंवा संस्थांतर्गत कोट्यासाठी पात्र असतात. यात माध्यमांची दखल घेतली जात नाही.

12 वी शास्त्र विषयात शिकलेले विद्यार्थी NEET परीक्षा देऊ शकतात. त्यांनी आपल्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेतलेले असणं यासाठी महत्त्वाचं आहे. शिवाय 12 वीतील गुणांच्या टक्केवारीचाही विचार प्रवेशासाठी केला जातो.

NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवाराचं वय 17 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत विद्यार्थी नीट परीक्षेमार्फत महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)