जनरल गिल : इंदिरा गांधींसोबतची बैठक अर्ध्यावर सोडली, सॅम माणेकशॉंनाही सुनावलं...

फोटो स्रोत, पेंग्विन वाइकिंग
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
पाकिस्तानविरोधातील 1971 सालच्या लढाईमध्ये चीन त्यांच्या बाजूने हस्तक्षेप करून भारतावर हल्ला करेल की काय, अशी भीती कायमच होती. अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी जनरल माणेकशॉ यांनी 167, 5 व 123 या माउन्टन ब्रिगेडना भूतानच्या सीमेवर तैनात ठेवलं होतं.
पूर्व कमांडचे चीफ ऑफ स्टाफ जनरल जेकब यांनी दिल्लीत लष्कर मुख्यालयाचे संचालक (सैनिकी कारवाई) जनरल इंदरजीत सिंग गिल यांनी कळवलं की, भूतानच्या सीमेवरील या ब्रिगेड तिथून काढून बांग्लादेशासाठीच्या लढाईमध्ये वापरल्या जाणार आहेत.
माणेकशॉ यांनी विरोध केलेला असतानाही इंदरजीत यांनी या प्रस्तावाला संमती दिली. पूर्व कमांडचे प्रमुख जनरल जगजीत सिंग अरोडा यांना याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी याबद्दल जनरल माणेकशॉ यांना लगेच माहिती दिली.
दोन तासांमध्ये माणेकशॉ यांचं उत्तर आलं, "मी तुमची एखाद्या स्त्रीपेक्षाही जास्त काळजी घेतली आहे. या ब्रिगेड्सना उत्तरेकडील सीमेवरून हटवायला तुम्हाला कोणी सांगितलं? आत्ताच्या आत्ता त्यांनी परत आधीच्या जागी पाठवा."
हे ऐकल्यावर जनरल अरोरांच्या पायाखालची जमीन सरकली, असं म्हटलं जातं. त्यांनी माणेकशॉ यांचा संदेश जनरल जेकब यांच्यापर्यंत पोचवला.
जनरल जेकब यांनी 'सरेंडर अॅट ढाका: बर्थ ऑफ अ नेशन' या पुस्तकात लिहिलं आहे की, "मी इंदर गिल यांना फोन केला आणि त्या ब्रिगेड्स आता परत पाठवता येणार नाहीत, कारण तसं करायचं तर त्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागेल, असं कळवलं."

फोटो स्रोत, पेंग्विन वाइकिंग
"चीन या लढाईत हस्तक्षेप करणार नाहीत, हे माणेकशॉ यांना पटवून देणं हाच चांगला मार्ग आहे. गिल यांना माझं म्हणणं पूर्णतः मान्य होतं. पण त्यांची संमती मिळाल्याशिवाय या ब्रिगेडींमधील सैनिकांच वापर मी पूर्व पाकिस्तानमध्ये करणार नाही, असं वचन त्यांनी माझ्याकडून घेतलं."
"मी आणि इंदर गिल यांनी वारंवार समजूत काढल्यानंतर 8 डिसेंबरला माणेकशॉ यांचीही खात्री पटली की, चिनी या लढाईत सहभागी होणार नाहीत. त्यानंतर मग त्यांनी 5 आणि 167 माउन्टन ब्रिगेड वापरायची परवानगी दिली."
"तत्पूर्वी इंदर गिल यांच्या सांगण्यावरून 123 माउन्टन ब्रिगेडला हवाई मार्गाने पश्चिमेकडील सीमेवर पाठवण्यात आलं होतं. तिथे भारतीय सैनिकांची कामगिरी म्हणावी तितकी चांगली होत नव्हती. परिस्थिती समजून घेण्याची, जबाबदारी पेलण्याची आणि परिणामकारक निर्णय घेण्याची विलक्षण क्षमता आपल्यात असल्याचं इंदर गिल यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं."
माणेकशॉ यांचा संताप
एस. मुथय्या जनरल इंदरजित सिंग गिल यांच्या 'बॉर्न टू डेअर' या चरित्रात लिहितात, "इंदर यांना माणेकशॉ यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं, पण ते स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले."
"सहा डिसेंबरला जेकब यांनी ढाक्यावर दबाव वाढवण्यासाठी या ब्रिगेडींचा वापर करण्याबाबत मागणी केली, तेव्हा इंदर यांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्यांना असं करण्यासाठी संमती दिली. पण माणेकशॉ यांना इतर कुठे या ब्रिगेडींचा वापर करायचा असेल तर त्या सैनिकांना तत्काळ मोकळं करावं, अशी अटही इंदर यांनी घातली."

फोटो स्रोत, मनोहर पब्लिकेशन
"माणेकशॉ यांना हे कळलं तेव्हा त्यांचा संतापाचा पारा गगनाला भिडला. पण गिल त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. आपल्या परवानगीशिवाय पूर्व पाकिस्तानात या सैनिकांचा वापर होणार नाही, असं त्यांनी माणेकशॉ यांना समजावून सांगितलं."
मुक्तीवाहिनीच्या प्रशिक्षणाची योजना
पूर्व पाकिस्तानात कारवाई करण्याची योजना आखली जात होती, तेव्हा जनरल के. के. सिंग सैनिकी कारवायांचे महासंचालक होते. पण ऑगस्ट 1971 मध्ये त्यांची बढती झाली आणि एका विभागाचं जनरल कमांडिंग ऑफिसर करण्यात आलं.
माणेकशॉ यांना त्या जागी मेजर जनरल ए. वोहरा यांना आणायचं होतं, पण त्या वेळी वोहरा ब्रिटनमध्ये एक मोठा सैनिकी अभ्यासक्रम करत होते. तेव्हा इंदर यांना दुसऱ्या पसंतीचा अधिकारी म्हणून कार्यवाह डीजीएमओ करण्यात आलं.
एप्रिल 1971 मध्ये इंदरजीत सिंग गिल सैनिकी कारवायांचे संचालक होते, तेव्हा त्यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीसमोर एक प्रस्ताव मांडला होता. युद्धात यशस्वी होण्यासाठी शरणार्थी म्हणून आलेल्या बंगाली तरुणांना एकत्र करावं, पूर्व पाकिस्तान रायफल्समध्ये काम करणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण द्यावं आणि निर्वासित परिस्थितीत काम करणाऱ्या अवामी लीगच्या सरकारशी सामंजस्याचा करार करावा, असे मुद्दे त्यांनी त्यात नोंदवले होते.

फोटो स्रोत, पेंग्विन वाइकिंग
याचा परिणाम म्हणून सॅम माणेकशॉ यांनी 1 मे 1971 रोजी कारवायीसंदर्भातील सूचना क्रमांक ५२ जारी करून पूर्व कमांडचे प्रमुख जनरल जगजीत सिंग अरोरा यांना पूर्व पाकिस्तानात गनिमी युद्धासाठी मुक्तवाहिनीच्या सैनिकांना प्रशिक्षण पुरवण्याचे व त्यांच्याकडे शस्त्रं सोपवण्याचे आदेश दिले.
लढाई सुरू होण्याआधीच लष्कर पूर्व पाकिस्तानात घुसलं
सुरुवातीला 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार लढवय्यांची गनिमी फौज तयार करण्याचं ध्येय समोर ठेवण्यात आलं. नंतर ही संख्या वाढवून मासिक 12 हजार आणि नंतर मासिक 20 हजार इतकी करण्यात आली.
ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत मुक्तिवाहिनीचे जवान त्यांचं अस्तित्व जाणवेल अशी कामगिरी दाखवू लागले. त्यांनी लहान पूल उडवणं, अनेक जहाजं बुडवणं, सैनिकी जत्थे व पोलीस स्थानकं यांवर हल्ले चढवणं, अशा कारवाया करून पाकिस्तानी लष्कराच्या नाकीनऊ आणले.
पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सेनाधिकारी जनरल ए.ए.के. नियाजी यांनी 'द ब्रिट्रेअल इन ईस्ट पाकिस्तान' या पुस्तकात लिहिलं आहे की, "वास्तविक भारताविरोधातील लढाई 20-21 नोव्हेंबरच्या रात्री, ईदच्या दिवशीच सुरू झाली होती."
"त्याच दिवशी भारताने रणगाडे आणि तोफखाने यांच्यासह स्वतःच्या अनेक बटालियन सीमा ओलांडून पुढे पाठवल्या होत्या. मुक्तिवाहिनीचे जवान त्यांची मदत करत होते. युद्धाची औपचारिक घोषणा ३ डिसेंबरला झाली, तोवर पाकिस्तानी लष्कराचे जवळपास चार हजार सैनिक मरण पावले होते."

फोटो स्रोत, पेंग्विन वाइकिंग
पाकिस्तानी हल्ल्याची पूर्वसूचना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई तीन डिसेंबरला सुरू झाली, परंतु इंदरजीत गिल यांना काही दिवस आधीपासूनच याचा अंदाज आला होता.
सैनिकी प्रशिक्षणाचं संचालकपद सांभाळत असताना गिल सातत्याने परदेशी दूतावासांमधील सैनिकी कामकाजाशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून असायचे. त्यातील अनेक जण त्यांचे मित्र झाले होते.
नंतर गिल सैनिकी कारवायांचे संचालक झाले तेव्हा सरकारने त्यांना परदेशी प्रतिनिधींना भेटण्यापासून मज्जाव केला. परंतु, त्यांची मैत्री शाबूत होती. 30 नोव्हेंबर 1971 च्या संध्याकाळी त्यांच्या घरी ऑस्ट्रेलियन दूतावासातील एका अधिकाऱ्याचा फोन आला.
पाकिस्तानातील सर्व परदेशी दूतावासांमधल्या मुलांना व महिलांना 24 तासांच्या आत पाकिस्तान सोडण्याची सूचना करण्यात आली आहे, त्यामुळे काहीतरी मोठी घडामोड घडणार आहे, असं संबंधित अधिकाऱ्याने गिल यांना कळवलं.
ते गिल यांना म्हणाले, "पाकिस्तानने हल्ल्याची तयारी अंतिम टप्प्यापर्यंत आणली असावी."
इंदरजीत गिल यांनी तत्काळ ही माहिती सॅम माणेकशॉ यांना दिली आणि माणेकशॉ यांनी ही बातमी इंदिरा गांधींपर्यंत पोचवली.
एस. मुथय्या लिहितात, "पाकिस्तानवर 4 डिसेंबरच्या दुपारी दोन वाजता हल्ला करायचा, असं इंदिरा गांधी व माणेकशॉ यांनी ठरवलं. परंतु, 3 डिसेंबरला चहा प्यायच्या वेळीच पाकिस्तानी विमानांनी भारतातील अनेक हवाई तळांवर हल्ला चढवला."
"पाकिस्तानच्या या हल्ल्यांनी भारताचं काही विशेष नुकसान झालं नाही, पण पहिल्यांदा पाकिस्तानने हल्ला केला, भारताने नाही, असं सगळ्या जगासमोर सांगण्याची संधी भारताला मिळाली."
हल्ल्याची माहिती
3 डिसेंबर 1971 रोजी संध्याकाळी पाच वाजता डीएमओ कार्यालयातील ऑपरेशन रूममध्ये इंदरजीत गिल व त्यांचे सहकारी सर्व वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांना तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा सांगत होते.
त्या वेळी माणेकशॉ यांचे सैनिकी सहायक म्हणून काम केलेले देपिंदर सिंग यांनी 'सॅम माणेकशॉ: सोल्जरिंग विथ डिग्निटी' या पुस्तकात लिहिलं आहे की, "अचानक संरक्षण सचिव के. बी. लाल खोलीत आले आणि त्यांनी सांगितलं की, पाकिस्तानी विमानं पश्चिम क्षेत्रातील आपल्या काही हवाई तळांवर हल्ला करत आहेत."
"त्या वेळी सर्व अधिकारी ऑपरेशन रूममध्येच हजर असल्यामुळे पश्चिम कमांडचे प्रमुख कोणत्याही वरिष्ठ सेनाधिकाऱ्याला संपर्क साधू शकले नाहीत. यामुळे त्रस्त होऊन त्यांनी अखेरीस संरक्षण सचिवांना या हल्ल्याची माहिती दिली."
"माणेकशॉ तिथे गेले तेव्हा त्यांनी इंदर गिल यांना आदेश दिला की, ऑपरेशन रूममध्येसुद्धा तत्काळ दूरध्वनीची तजवीज करावी. त्यानंतर लगेचच इंदर गिल आणि त्यांचे सहकारी युद्ध लढण्याच्या कामात गुंतले. आपण रात्री घरी येणार नसल्याचं त्या वेळी गिल यांनी त्यांची पत्नी मोना यांना फोन करून कळवलं."

फोटो स्रोत, पेंग्विन वाइकिंग
युद्धाचे 13 दिवस गिल यांनी केवळ सँडविच खाऊन भूक भागवली
त्या वेळी गिल यांच्या कार्यालयात लेफ्टनंट कर्नल या पदावर काम केलेले सी.ए. बेरेटो यांनी कालांतराने त्यांची आठवण नोंदवली, ती अशी- "आम्ही लोक काम करायला बसलो, तेव्हा कोणी जेवणाकडेही लक्ष दिलं नाही. वास्तविक सैन्य मुख्यालयाचं कॅन्टिन सहा वाजता बंद होत असे."
"थोड्या वेळाने आम्ही पाहिलं, तर रात्री जेवणाच्या वेळी काही डझन सँडविचं आणि सोबत गरमागरम कॉफी तिथे पोचली होती. गिल यांच्या पत्नी मोना यांनी हे खाणंपिणं तिथे पाठवलं होतं. युद्ध सुरू झाल्याची बातमी ऐकल्यावर लगेचच त्यांनी डबलरोटी, अंडी, सँडविचमधे लावायची सामग्री, इत्यादी गोष्टी मागवल्या आणि घरातील सर्व लोकांना सँडविच तयार करायला बसवलं."
"त्यानंतर युद्ध सुरू होतं तितके दिवस इंदर गिल एकदाही त्यांच्या घरी गेले नाहीत आणि ते दिवस त्यांनी पत्नीने पाठवलेली सँडविच खाऊनच भूक भागवली."
'फटकळ' जनरल इंदरजीत गिल
इंदरजीत गिल यांनी सैनिकी कारवायांचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी स्वतःच्या कार्यालयात नवीन कार्यशैली विकसित केली.
ते स्वतःची ब्रीफकेस घेऊन रोज कार्यालयात जात आणि त्यांचे सहकारी नेगी यांना सांगत की, त्यांना ब्रीफकेस उचलण्यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही.
पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी कार्यालयात काम करणाऱ्या सर्व लोकांना स्वतःच्या हस्ताक्षरातील एक सूचना पाठवली. 'सर्वसाधारण इंग्रजीत मुद्देसूदपणे लिहिलेली टिपणं' आपल्याला आवडतात, असं त्यांनी या सूचनेत म्हटलं होतं. त्यामुळे अवघड इंग्रजी शक्यतो वापरू नये.
गिल यांच्या फटकळपणाचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत.
एस. मुथय्या यांनी गिल यांच्या चरित्रात लिहिलं आहे की, "एकदा संध्याकाळी इंदर त्यांच्या टेबलावर डोळे बंद करून बसल्या-बसल्याच डुलक्या काढत होते. तेव्हा माणेकशॉ खोलीत आले. त्यांनी एका ब्रिगेडच्या हालचालींबद्दल गिल यांना विचारलं."

फोटो स्रोत, पेंग्विन वाइकिंग
"तीन वाजता ती ब्रिगेड दिल्लीच्या पश्चिमेकडील सीमेच्या दिशेने गेली आहे, असं इंदर यांनी त्यांना सांगितलं. पण माणेकशॉ यांनी पुन्हा त्या ब्रिगेडचा ठावठिकाणा विचारला. तेव्हा इंदर यांनी ती ब्रिगेड ट्रेनमध्ये असल्याचं सांगितलं आणि डोळे पुन्हा बंद करून घेतले."
"असंच एकदा ते झोपेत होते, तेव्हा लष्कराच्या उपप्रमुखांनी विविध ठिकाणच्या आघाड्यांवर काय सुरू आहे याबद्दल त्यांच्याकडे फोनवरून चौकशी केली. यावर गिल त्यांना म्हणाले, 'मी बायकोची स्वप्नं बघत होतो. काही रोचक घडामोडी घडल्या तर मी तुम्हाला तत्काळ सांगतो.' असं म्हणून गिल यांनी फोन ठेवून दिला."
इंदिरा गांधींची बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर पडले
अशाच प्रकारची घटना 1971च्या युद्धकाळातील सुरुवातीच्या दिवसांमध्ये घडली. त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधी, संरक्षण मंत्री जगजीवन राम व अनेक वरिष्ठ मंत्री ऑपरेशन रूममध्ये हजर होते.
इंदर गिल यांना त्यांच्या समोर सादरीकरण करायचं होतं. एस. मुथय्या लिहितात त्यानुसार, "इंदर गिल बोलायला उभे राहिले तेव्हा प्रत्येक जण आपल्या शेजारील व्यक्तीशी बोलण्यात मग्न असल्याचं त्यांना दिसलं. अगदी इंदिरा गांधीसुद्धा कोणाशी तरी बोलत होत्या."
"काही मिनिटांनी इंदर गिल सॅम माणेकशॉ यांच्याकडे वळून म्हणाले, 'सॅम, आता पुढची जबाबदारी तुम्ही पार पाडा. या देशात लढाई सुरू आहे, तर तिथे काय घडामोडी घडतायंत ते मी पाहून येतो.'"

फोटो स्रोत, पेंग्विन वाइकिंग
एवढं बोलून गिल खोलीतून बाहेर पडले. नंतर लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही, पण गिल यांच्यात 'दुःसाहस' करण्याची क्षमता होती, असं त्यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात.
जनरल जेकब यांनी गिल यांची प्रशंसा केली
1971 च्या लढाईवेळी सैन्याच्या तीनही दलांमधील समन्वय उत्तम होता. फटकळ, बडबडे व जमिनीवर पाय असलेले जनरल इंदरजीत सिंग यांच्यामुळे हा समन्वय साधला गेला.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व फिल्ड कमांडरांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते.
जनरल जेकब त्यांच्या पुस्तकात लिहितात, "गिल सैन्य मुख्यालयात नसते, तर मला काम करणं जवळपास अशक्य झालं असतं. मुख्यालयात काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा त्यांची पात्रता खूप जास्त होती."
"त्यांनी पश्चिमेकडील व पूर्वेकडील दोन्ही आघाड्यांवरच्या कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. मुख्यालयात असताना त्यांनी कायम माझी साथ दिली."

फोटो स्रोत, पेंग्विन वाइकिंग
जनरल इंदरजीत सिंग यांना 1971 च्या युद्धादरम्यान बजावलेल्या सेवेबद्दल 'पद्मभूषण' या किताबाने सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान मिळणारे ते केवळ एकटेच मेजर जनरल पदावरील अधिकारी होते.
एप्रिल 1973 मध्ये सॅम माणेकशॉ यांना भेटण्यासाठी ते इन्सपेक्शन बंगल्यावर गेले.
त्यांनी आपापल्या ग्लासांमध्ये ड्रिंक ओतलं होतं, इतक्यात इंदर यांच्यासाठी एक फोन आला. फोनवर बोलून परतल्यावर सॅम यांच्याकडे पाहून गिल यांनी अतिशय दुःखाने केवळ एकच शब्द उच्चारला- 'सिक्कीम'.
त्यांनी सॅम माणेकशॉ यांचा निरोप घेतला आणि तत्काळ त्यांच्या कार्यालयात गेले. तिथे त्यांनी रात्रभर काम केलं.
जनरल इंदरजीत सिंग गिल या पदावर वर्षभर होते. त्यानंतर त्यांच्याकडे पूर्वेकडील '4 कोअर'ची धुरा सोपवण्यात आली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























