World Anaesthesia Day: भूल देणाऱ्या पडद्यामागच्या कलाकाराविषयी या गोष्टी ठाऊक आहेत?

World Anaesthesia Day: भूल देणाऱ्या पडद्यामागच्या कलाकाराविषयी या गोष्टी ठाऊक आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डॉ. नंदिनी लोंढे
    • Role, भूलतज्ज्ञ, पुणे
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

रसिका आजीचा हात घट्ट धरून बसली होती.. कॅन्सरच्या दुखण्यामुळे तिच्या जिवाची होणारी तगमग तिला अगदी बघवत नव्हती! शेवटच्या अवस्थेत असलेल्या कर्करोगाच्या प्रचंड वेदना आजीला पार पोखरून टाकत होत्या!

तेवढ्यात रसिकाची जीवलग मैत्रिण खूप दिवसांनी घरी आली. आजीची अवस्था आणि रसिकाच्या डोळ्यातले अश्रू बघून तिला परिस्थितीचा अंदाज आलाच. ती हळूच म्हणाली, "रसिका, अगं पुढच्या चौकात एक वेदनाशमन केंद्र आहे ना. एक प्रसिद्ध भूलतज्ज्ञ चालवतात. ते नक्की आजीच्या वेदना बघता बघता दूर करतील बघ..!"

रसिकाला उमजेचना... भूलतज्ज्ञ कसे काय कॅन्सरचे वेदनाशमन करणार?

Presentational grey line

16 ऑक्टोबर 1846. बुलफिंच थिएटर. अमेरिका.

WTG मॉर्टनने इथर वापरत जादू केली. गच्च भरलेल्या जमावासमोर सर्व वेदना विसरत पेशंट झोपी गेला आणि "सर, युवर पेशंट इज रेडी!" हे सुमधुर शब्द कानी पडले अन् इतिहासात एक नवं पान लिहिलं गेलं!

2400 वर्षांपासून शस्त्रक्रियेच्या वेळी सहन करीत असलेली वेदना, भीती, आक्रोश आणि रुग्णाची दयेची पुकार सारं सारं इतिहासजमा झालं! टेबलावर पहुडलेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं. आशेचे नवीन किरण दिसू लागले आणि बधिरीकरण शास्त्र अथवा अनेस्थेशिया या नवीन शाखेचा जन्म झाला!

या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून 16 ऑक्टोबर हा 'जागतिक बधिरीकरण दिन' म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येऊ लागला.

भूलतज्ज्ञ करतो तरी काय?

शस्त्रक्रियेइतकेच महत्त्वाचे स्थान असणाऱ्या भूलीच्या या शोधाला जवळजवळ पावणेदोनशे वर्षे लोटली आहेत. पण तरीदेखील भूल, भूलशास्त्र आणि भूलतज्ज्ञ यांबाबतीत सर्वसामान्य जनता अजूनही तितकीच अनभिज्ञ आहे. कारण भूलतज्ज्ञ हा पडद्यामागचा कलाकार असतो.

"डॉक्टर, भूलीचे एक इंजेक्शन दिलं की झालं ना तुमचं काम?" असं आजही असंख्य रुग्ण विचारतात. त्यांना ठाऊक नसतं की शस्त्रक्रियेच्या वेळी मेंदूला आवश्यक तेवढीच निद्रा घ्यायला लावणारा, त्याला जीवनमृत्यूच्या सीमारेषेवर वेदनाविरहित खेळवणारा पण हृदयाला आपल्या कह्यात ठेवणारा असतो तो भूलतज्ज्ञ.

रुग्णाच्या डोक्याशी तो ढाल बनून उभा असतो! शल्यचिकित्सक (म्हणजे surgeon) एका विशिष्ट भागाची शस्त्रक्रिया करीत असतांना जीवनाला प्रवाही ठेवणाऱ्या बाकी अवयवांची काळजी घेणारा हा अतिसंयत मानव असतो भूलतज्ज्ञ.

World Anaesthesia Day: भूल देणाऱ्या पडद्यामागच्या कलाकाराविषयी या गोष्टी ठाऊक आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

रुग्णाला भूल देण्याबरोबरच ती सुखरूपपणे उतरविणे हेही अत्यंत जोखमीचे काम असते. विमान चालवणारा पायलट ज्याप्रकारे कौशल्याने 'टेक ऑफ' घेतो आणि सफाईदारपणे धावपट्टीवर उतरवतो, तसंच काहीसं भूलतज्ज्ञाच्या बाबतीत म्हणता येईल. हे कौशल्य मेहनत घेऊन आत्मसात करावे लागते.

भूल म्हणजे काय?

'संवेदना विरहित शरीरावस्था' अशी तिची व्याख्या करता येईल. शस्त्रक्रिया करतेवेळी रुग्णाला वेदना होऊ नयेत, त्याला कसलीच जाणीव होऊ नये म्हणून भूल दिली जाते. रुग्णाची एकूण शारीरिक समता, मेंदू, हृदय, फुप्फुसे, यकृत, मूत्रपिंड यांसारख्या अतिमहत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता आणि शस्त्रक्रियेचा एकूण शरीरावर होणारा परिणाम याचा विचार करावा लागतो.

भूल ही स्थूलमानाने 3 प्रकारांत विभागली जाते.

1. सर्वसाधारण किंवा संपूर्ण भूल- यात रुग्णाला शिरेवाटे औषध देऊन संपूर्ण शरीर बधिर केले जाते. कृत्रिम श्वसनोपचार दिले जातात.

2. क्षेत्रीय भूल- या प्रकारात दोन मणक्यांच्या मध्ये भूलीचे औषध अचूकपणे दिले जाते. शरीराचा विशिष्ट भाग अथवा कमरेखाली बधिरता आणता येते. या प्रकाराचा वापर प्रसूतीवेदना शमन करण्यासाठी तसेच शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना व्यवस्थापनासाठी केला जातो.

3. स्थानिक भूल (नर्व्ह ब्लॉक)- शस्त्रक्रियेसाठी इच्छित ठिकाणी सुन्नता निर्माण करण्यासाठी नसा अथवा नसांच्या गठ्ठ्याजवळ बधिरीकरणाचे इंजेक्शन दिले जाते. यामध्ये सोनोग्राफीचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला जातो. आजकाल या प्रकाराचा वापर खूपच उपयुक्त ठरतो आहे. रुग्णांना वेदनाशमन तर होतेच परंतु शरीराची स्थिती पूर्वपरावर येण्यास लागणारा वेळ खूपच कमी झाला आहे.

ऑपरेशन थिएटरच्या बाहेर...

आता तर भूलतज्ज्ञांनी ऑपरेशन थिएटरच्या चार भिंती ओलांडून आपली उपयुक्तता इतर ठिकाणीही सिद्ध करून दाखवली आहे. अतिदक्षता विभाग (ICU) सारखी अतिसंवेदनशील ठिकाणं अनेकदा भूलतज्ज्ञच सांभाळत असतात.

World Anaesthesia Day: भूल देणाऱ्या पडद्यामागच्या कलाकाराविषयी या गोष्टी ठाऊक आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या धकाधकीच्या जीवनात अपघातांचं प्रमाण खूप वाढलं आहे व जीवनमृत्यूशी झगडणाऱ्या जखमी व्यक्तींना तातडीने वैद्यकिय मदत (emergency resuscitation) देऊन वाचविण्याचे प्रशिक्षण भूलतज्ज्ञांकडे असते. कर्करोग वेदनाशमनासाठी भूलतज्ज्ञ 'पेन क्लिनिक'च्या माध्यमातून आपली सेवा देत असतात.

वेदनाविरहित प्रसूतीमुळे अपत्यप्राप्तीचा सुखकारक अनुभव आज कित्येक जोडपी घेत आहेत. वाढत्या तंत्रज्ञानाच्या बरोबरीने वाढण्याचा प्रयत्न करत भूलतज्ज्ञ रोबोटिक सर्जरीशीही यशस्वीरीत्या दोन हात करत आहेत.

2019 साली कोरोनाने साऱ्या जगाला संकटाच्या खाईत लोटलं तेव्हा इतर डॉक्टरांसोबत भूलतज्ज्ञांनी जिवाची तमा न बाळगता रात्रंदिवस आघाडीवर काम केले. नव्या वाटा धुंडाळत अनेक कोव्हिड रुग्णांना यमाच्या दाढेतून खेचून आणलं! त्यात अनेक भूलतज्ज्ञ लढता लढता धारातीर्थी पडले. पण ही जमात खचली नाही, हिंमत हरली नाही.

आपण सुरवातीला ज्या रसिकाबद्दल बोलत होतो, तिची गोष्ट जाता जाता पूर्ण करूया. तर रसिका आपल्या कॅन्सरग्रस्त आजीला मैत्रिणीच्या सांगण्यावरून भूलतज्ज्ञाकडे घेऊन गेली. सर्व तपासण्या पाहिल्यानंतर भूलतज्ज्ञाने पाठीत एक छोटंसं इंजेक्शन दिलं. तोंडावाटे घ्यायच्या गोळ्या आणि पातळ कागदात घोळवलेले वेदनाशमन औषध स्टीकरसारखं लावलं. आणि काय आश्चर्य! आजीच्या चेहर्‍यावर अनेक दिवसांनी हसू उमललं!

जीवन सुखकर, वेदनाविरहित करणाऱ्या या आधुनिक अश्विनी कुमारांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)