IPL 2021 : आजपासून प्लेऑफचे सामने, कोण पोहोचणार अंतिम फेरीत?

विराट कोहली

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, विराट कोहली
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आयपीएलमध्ये प्लेऑफमधील संघांमध्ये आजपासून (10 ऑक्टोबर) सामने सुरू होतील. यातून विजयी झालेले दोन संघ अंतिम फेरीत धडक मारतील.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या प्लेऑफमध्ये चार संघांनी जागा मिळवलीय. यात गेल्यावेळचा उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स, तीनवेळा चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ, चॅम्पियन बनण्याची आशा बाळगून असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि दोनवेळा चॅम्पियन ठरलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ यांचा समावेश आहे.

आज म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी अंतिम फेरीसाठीचा पहिला सामान दिल्ली विरुद्ध चेन्नई यांच्यात होईल, तर उद्या म्हणजे 11 ऑक्टोबर प्लेऑफमधील दुसरा सामना कोलकाता विरुद्ध बंगळुरू असा होईल.

बंगळुरूचा सामना कोलकात्याशी

सोमवारी म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी बंगळुरूचा सामना कोलकात्याशी होणार आहे.

बंगळुरूने आतापर्यंत एकदाही आयपीएलचं चषक जिंकला नाहीय. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे यंदा सगळ्यांचं लक्ष आहे.

विराट कोहली कर्णधार असलेल्या बंगळुरू संघानं गेल्यावेळच्या उपविजेत्या दिल्लीला पराभूत करून प्लेऑफमध्ये जागा मिळवली.

विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

श्रीकर भरतने नाबाद 78 धावांची खेळी केली. त्याला ग्लेन मॅक्सवेलनं नाबाद 51 धावा करत साथ दिली.

मॅक्सवेलनं संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली. विशेषत: युएईमध्ये आयपीएल खेळवली जाऊ लागल्यानंतर मॅक्सवेलचा खेळ अधिक चांगला दिसून आला. आतापर्यंत 14 सामन्यात सहा अर्धशतकांच्या मदतीने 498 धावा नावावर केल्यात. तर गोलंदाज हर्षल पटेलनं 14 सामन्यात 30 विकेट्स घेतल्या आहेत.

सलामीवीर देवदत्त पड्डीकलनेही विराट कोहलीची चिंता कमी केलीय. 13 सामन्यात त्याने 390 धावा केल्यात.

मात्र, बंगळुरूसमोर लढणारी कोलकाताही मागे नाहीय. क्रिकेट समीक्षक अयाज मेमन हे बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "आयपीएलच्या या हंगामाचा दुसरा टप्पा यूएईत होतोय, या दुसऱ्या टुप्प्यात कोलकात्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. जबरदस्त कामगिरी करत कोलकात्याने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलंय."

कोलकाता

फोटो स्रोत, BCCI/IPL

"दुसरा टप्पा सुरू झाला तेव्हा मुंबई चौथ्या, तर कोलकाता सातव्या स्थानी होती. मात्र, कोलकात्यानं आपल्या कामगिरीच्या जोरावर चौथ्या क्रमांकावर उडी मारली. धोका पत्कारून नव्या खेळाडूंना सलामीला पाठवण्याचा निर्णयही कोलकात्याच्या संघानं घेतला," असं अयाज मेमन सांगतात.

दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या चार संघातील कुठला संघ 15 ऑक्टोबरला होणाऱ्या अंतिम फेरीत दाखल होतो, हे आजपासून ठरेल.

आतापर्यंत पाचवेळा आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्स मात्र यावेळी प्लेऑफमध्ये स्थान पटकावू शकली नाहीय.

मुंबई इंडियन्स का बाहेर पडली?

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जोर पकडल्यानंतर आयपीएल स्पर्धा 2 मे 2021 रोजी थांबवण्यात आली. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी चेन्नई विरूद्ध मुंबई या सामन्यासह दुबईत ही स्पर्धा पुन्हा सुरू झाली.

रोहित शर्मा

फोटो स्रोत, ROBERT CIANFLONE

या सुरुवातीच्या सामन्यातच मुंबईला 20 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर कोलकात्यानेही मुंबईला 7 विकेट्सनी पराभूत केलं. त्यापाठोपाठ बंगळुरूने 54 धावांनी मुंबईला पराभूत करून मुंबईला पराभवाची हॅटट्रिक पाहायला लावली.

त्यानंतर पंजाबला 6 विकेट्सनी पराभूत करत पुनरागमनाचा प्रयत्न मुंबईने केला खरा, पण दिल्लीने 4 विकेट्सनी पराभूत करत पुन्हा मागे सारलं. दिल्लीविरोधात मुंबईचा संघ 8 विकेट्स देऊन केवळ 129 धावा करू शकला होता.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. तसंच, गेल्यावेळी मुंबईला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बाजवणारे सूर्यकुमार यादव, इशान किशन, पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांची फलंदाजीही फार चालली नाही. परिणामी मुंबई मागे पडत गेली. शेवटचे दोन सामने मुंबईने जिंकले खरे, पण प्लेऑफमध्ये जाण्यास ते पुरेसे ठरले नाहीत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)