You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लखीमपूर खिरी: वरुण गांधी यांच्यावर सामनातून कौतुकाचा वर्षाव # 5 मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. लखीमपूर खिरीसंदर्भात भूमिका घेतल्याबद्दल वरुण गांधींचे सामनाच्या अग्रलेखातून अभिनंदन
"लखीमपूर खिरी संदर्भात भाजप नेते वरुण गांधी यांनी भूमिका घेतली. जे असंख्य लोक वरुण गांधी यांच्याप्रमाणे बिनधास्तपणे व्यक्त होऊ शकले नाहीत अशा सगळ्यांसाठी आजचा महाराष्ट्र बंद आहे", असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
चार शेतकऱ्यांना भाजपच्या मंत्रिपुत्राने चिरडून मारलं, त्याचा साधा निषेधही करायचा नाही अशी राज्याच्या विरोधी पक्षाच्या वागण्याची रीत आहे. सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा बंद आहे.
शेतकऱ्यांना चिरडणे, ठार मारणे सुरूच आहे. हा जुलूम आहे, दडपशाही आहे. जय जवान, जय किसान हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. तो आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.
उत्तर प्रदेश सरकारने विरोधी पक्षांना घटनास्थळी पोहोचू दिले नाही. कृषिमंत्र्यांनी घटनास्थळी जायला हवं होतं, तेही झालं नाही. भाजप नेते वरुण गांधी यांनी या घटनेचा निषेध केला.
या दोघांना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आलं. लखीमपूर प्रकरणानंतर त्यांचे रक्त तापले. इतर खासदारांच्या रक्तात बर्फाचे पाणी सळसळत आहे का?
राजकीय किंमत चुकवाली लागली तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाट वाहून सत्ताधारी मंडळींचे रक्त थंडच पडले असेल तर देशाला वाचवण्यासाठी नवे स्वातंत्र्य आंदोलन उभारावे लागेल.
2. कोळशाअभावी सहा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद
कोळशाअभावी राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट बंद करण्यात आले असून तूट भरुन काढण्यासाठी हायड्रो प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
जर हीच परिस्थिती राहिली तर शहरी/ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागेल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, अशी विनंती महावितरणने केली आहे.
दरम्यान, देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे.
कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे.
विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी 3 ते 10 व सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
3. फडणवीसांच्या काळात गुंठ्याला 950 रुपये मदत, आताच्या सरकारने 135 रुपये दिले-राजू शेट्टी
राज्यात अतिवृष्टीसाठी मदतीचा निर्णय जाहीर झाला आहे. फडणवीस सरकारच्या काळात गुंठ्याला 950 रुपये मदत मिळाली होती. महाविकास आघाडी सरकारने गुंठ्याला 135 रुपये मदत दिली आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदत तोकडी आहे. सरकारने पैसा उभा करायचा असतो. लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कित्येकांचे रोजगार बुडाले.
"सरकारी नोकरदारांना 5 ते 10 टक्के उपस्थिती संपूर्ण पगार मिळाला. राज्यातला शेतकरी अडचणीत आहे. महाराष्ट्राला वसंतदादांची आठवण येते आहे. तुम्हाला शिवारात आणखी झाडाला लटकलेली शेतकऱ्यांची प्रेतं पाहायची आहेत का?" अशा शब्दांत राजू शेट्टींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
4. पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपी गजाआड
पुष्पक एक्सप्रेस दरोडा बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी 48 तासात गजाआड केलं आहे. आठपैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.
हा दरोडा नियोजित नसला तरी आरोपी हे सराईत आणि गुन्हेगार मानसिकतेचे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ''लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
8 ऑक्टोबरच्या रात्री साडेसात वाजता लखनौ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत आठ जणांनी दरोडा टाकला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल, रोकड लूटली होती.
मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले. हे दरोडेखोर इथेच थांबले नाही तर पतीसोबत प्रवास करणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेवर दोन आरोपींनी बलात्कार केला.
आठपैकी सात आरोपी हे इगतपुरी येथील घोटी टाके येथील आहेत तर एक आरोपी मुंबईचा आहे.
5. मग मुख्यमंत्री तरी गप्प कशाला बसतील- अजित पवार
"सिंधुदुर्गमध्ये विमानतळ उद्घाटन झालं. मी सगळं विकासकामांबद्दल बोललो. विमानतळ झालं हे काही एकट्यादुकट्याचं काम नाही. 25 वर्षं पाठपुरावा केला आणि आता हे नेते उठले. भाषण हाणलं. मग मुख्यमंत्री तरी गप्प कशाला बसतील," असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंवर प्रहार केला.
"तेही काळा तिटा लावायचाय म्हणाले. जशाला तसं उत्तर दिलं. पवारसाहेबांची आम्हाला शिकवण आहे," बारामतीच्या सभेत ते बोलत होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी तब्बल 12 वर्षांनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आले होते. यावेळी मंचावर राणेंनी सिंधुदुर्गचा विकास मीच केल्याचा दावा केला.
"1990 साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. तुझी सिंधुदुर्गाला गरज आहे म्हणाले. मी आलो आणि निवडून आलो. त्यापूर्वी मी कणकवलीच्या चारपाच गावांपर्यंत मर्यादित होतो. मी या जिल्ह्यात फिरलो. तिथे प्यायला पाणी नव्हते, रस्ते नव्हते. गावाचे रस्ते सोडा, हायवेही बरोबर नव्हते.
"शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही ही अवस्था होती. अनेक गावात वीजही नव्हती. इथली मुलं शिकली. मुंबई-पुण्यात नोकरीला यायचे. मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मी या जिल्ह्याचा विकास केला. मी सांगतो. पण हे लोकच ठरवतील. अडीअडचणीला मी धाऊन गेलो. उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने हे काम केलं आहे," असंही त्यांनी सांगितलं.
"कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोलं. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय," असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
"आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सूक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करून द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)