काश्मीरमध्ये अल्पसंख्यांकांच्या हत्यांमुळे नाराजी, न्यायाची मागणी

कश्मीर

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, सतिंदर कौर यांचे नातेवाईक
    • Author, रियाझ मसरूर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगर
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मंगळवारी तीन जणांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर, शुक्रवारीही श्रीनगरमध्ये आणखी दोघांची हत्या करण्यात आली आहे.

शयित कट्टरतावाद्यांनी श्रीनगरमधील एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापिका आणि एक शिक्षक अशी दोघांची हत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली आहे.

यापूर्वी मंगळवारी एक प्रसिद्ध केमिस्ट मखनलाल बिंद्रू यांच्याशिवाय इतर दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

शहरातील ईदगाह परिसरात शाळेजवळ राहणाऱ्या नागरिकांनी त्यांना सकाळी शाळेच्या बाजूनं गोळ्यांचा आवाज आल्याचं सांगितलं. या घटनेत शाळेच्या 44 वर्षीय मुख्याध्यापिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांचा मृत्यू झाला आहे.

गोळी लागल्यानंतर या दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं, त्याठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

सतिंदर कौर काश्मीरच्या राहणाऱ्या होत्या अशी माहिती मिळाली आहे. तर दीपक चंद हे काश्मिरी पंडित होते. काही दिवसांपूर्वीच शाळेची नोकरी मिळाल्यानं ते पुन्हा काश्मीरमध्ये परतले होते.

एका आठवड्यात सात मृत्यू

काश्मीरमध्ये एका आठवड्यामध्ये सात मृत्यू झाल्यामुळं अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शहरात पोलीस हाय अलर्टवर असून ठिकठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे.

काश्मीर

फोटो स्रोत, EPA/JAIPAL SINGH

फोटो कॅप्शन, फाईल फोटो

काश्मिरी पंडित समुदायानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुरक्षेत चूक करणाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. समाजाचे नेते सतीश महालदार यांनी दिल्लीत, गृहमंत्री अमित शाह यांना भेटून त्यांच्या मागण्याचं निवेदन दिलं होतं.

"जर सुरक्षेमध्ये अशा प्रकारची चूक झाली तर, कुणाची तरी जबाबदारी निश्चित करावी, अशी आमची इच्छा आहे," असं सतीश महालदार यांनी दिल्लीहून फोनद्वारे बीबीसीला सांगितलं.

शहरात हल्ले होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अनेक ठिकाणी अतिरिक्त सुरक्षाही तैनात करण्यात आली होती, असं पोलीस सुत्रांनी म्हटलं आहे.

आठवडाभरात मृत्यू होणाऱ्यांमध्ये, तीन काश्मिरी मुस्लिमांचाही समावेश आहे. मात्र, मखनलाल बिंद्रू, बिहारमधील एक हातगाडीवाला आणि आज दोन शिक्षकांच्या मृत्यूनं पुन्हा एकदा 1990 च्या दशकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कश्मीर

फोटो स्रोत, EPA

1990 च्या दशकात हजारो काश्मिरी पंडितांना हिंसाचारामुळं काश्मीर सोडून पळून जावं लागलं होतं. देशात अनेक ठिकाणी असलेल्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये त्यांना जावं लागायचं. सरकारनं नुकत्यात काश्मिरी पंडितांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे हजारो लोक परतत आहेत.

कट्टरतावाद्यांचा धोका असूनही 1990च्या दशकात काही काश्मिरी पंडित इथंच राहिले. मात्र, हत्येच्या या ताज्या घटनांनी आता पुन्हा एकदा या हजारो काश्मिरी पंडितांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार यावर्षी विविध घटनांमध्ये आतापर्यंत 30 जण मारले गेले आहेत. याचवर्षी झालेल्या निवडणुकीत पंचायतीचे प्रमुख (मुखिया) म्हणून निवडून आलेले काश्मिरी पंडित राकेश यांचीही हत्या झाली होती.

अल्पसंख्यांकांमध्ये भीती

गेल्या एका आठवड्यात सात जणांचा मृत्यू झाल्यानं काश्मीरमधील अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ओमर अब्दुल्ला

फोटो स्रोत, Twitter

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरमधील अल्पसंख्यांक समूहाला आवाहन केलंय की, त्यांनी काश्मीर खोरं सोडून जाऊ नये.

ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून सविस्तर आपली भूमिका मांडली.

काश्मीरमधील विविध समूहांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी या हत्या केल्या जात असल्याचं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)