Aryan Khan : 'मुलगा कोणाचाही असो कायदा सर्वांना समान' - अजित पवार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, TWITTER
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. मुलगा कोणाचाही असो कायदा सर्वांना समान- अजित पवार
मुलगा कोणाचाही असो, कायदा सर्वांना समान आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
रविवारी (3 ऑक्टोबर) ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना आर्यन खानला रेव्ह पार्टीप्रकरणी झालेल्या अटकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटलं की, मुलं मोठ्यांची असू दे की आणखी कोणाची... प्रत्येकाला कायदा, नियम सारखे ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी.
लोकमतनं ही बातमी दिली आहे.
दरम्यान, आर्यनवरील कारवाईनंतर रविवारी रात्री उशीरा अभिनेता सलमान खान हा शाहरूखची भेट घेण्यासाठी त्याच्या 'मन्नत' बंगल्यावर पोहोचला.
सलमानची गाडी पाहिल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला, मात्र सलमान कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट आतमध्ये गेल्याचं महाराष्ट्र टाइम्सनं आपल्या बातमीत म्हटलं आहे.
2. झायडस कॅडिलाच्या एका लशीची प्रस्तावित किंमत 1900 रुपये?
'झायकोव्ह-डी' या कोरोना प्रतिबंधक लशीच्या किमतीबाबत केंद्र सरकार आणि झायडस कॅडिला कंपनी यांची चर्चा सुरू असतानाच, तीन मात्रांच्या या लशीसाठी 1900 रुपये किंमत या कंपनीने सुचवली असल्याचं वृत्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ही किंमत कमी करण्याबाबत सरकार वाटाघाटी करत असून, याबाबत अंतिम निर्णय या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता असल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
झायडस कॅडिलाच्या पहिल्या डीएनएवर आधारित सुईविरहित करोना प्रतिबंधक लशीचा लवकरच देशव्यापी लसीकरण मोहिमेत समावेश केला जाईल, असं सरकारने गुरुवारी (30 सप्टेंबर) सांगितलं होतं.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
3. अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचं चित्र आहे. परंतु तिसऱ्या लाटेचं संकटही अजून कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेत.

फोटो स्रोत, Getty Images
मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढलेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 11 तालुक्यांतील 61 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा यात समावेश आहे. 4 ऑक्टोबरपासून 13 ऑक्टोबरपर्यत हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे.
टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
4. रोहित पवारांची स्वराज ध्वज यात्रा पंढरपुरात, कोरोना नियमाचे तीन-तेरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याची स्वराज ध्वज यात्रा रविवारी (3 ऑक्टोबर) पंढरपूरमध्ये दाखल झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याने कोरोना नियमाचे तीन तेरा वाजल्याचे चित्र दिसत होतं.
अजूनही कोरोनाचे संकट पंढरपूर परिसरात सुरु असून तिसऱ्या लाटेचा धोका असताना गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करत असताना स्वराज ध्वजाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफानी गर्दी करत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले.

फोटो स्रोत, Getty Images
हिंदवी स्वराज्याची शेवटची लढाई झालेल्या खर्डा या गावी हा तरुणाईला प्रेरणा देणारा देशातील सर्वात उंच भगवा ध्वज दसऱ्यादिवशी फडकावला जाणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
या ध्वज स्तंभाचं वजन 18 टन असून नुसत्या ध्वजाचे वजन 90 किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचं आकर्षण ठरणार आहे. सध्या अयोध्या मथुरापासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 12 हजार किलोमीटरचा प्रवास करत 96 शक्तीपीठांमध्ये पूजन करून हा ध्वज विठुरायाच्या दारात आला असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं.
एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
5. कोरोनामुळे निराधार झालेल्या 306 बालकांच्या खात्यात 15 कोटी रुपये
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलांनी आपल्या पालकांना गमावलं आहे. महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे पालकांचं छत्र गमावलेल्या 306 बालकांच्या खात्यात 15 कोटी रुपये जमा केले आहेत.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे अशा बालकांच्या खात्यात 5 लाख रुपये जमा केले असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे अनाथ बालकांची राज्यातील एकूण संख्या सुमारे सहाशे इतकी असून उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा करण्यात येतील, अशी माहितीही ठाकूर यांनी दिली आहे.
न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























