नाना पटोले - 'मुख्यमंत्र्यांशी आता बोलणार नाही, लोकशाही पद्धतीने विरोध करू' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आज वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या पाच बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.

1. मुख्यमंत्र्यांशी आता बोलणार नाही, लोकशाही पद्धतीने विरोध करू- नाना पटोले

आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकशाही पद्धतीने विरोध करू' असं म्हणत आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. तसंच, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार नाही, असंही पटोलेंनी स्पष्ट केलं आहे.

न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. पण, या निर्णयाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार केले जातील, असे स्पष्ट संकेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते.

परंतु महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत, यावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला.

2. अनिल परब यांची ईडीकडून आठ तास चौकशी

परिवहन मंत्री अनिल परब यांची मंगळवारी (29 सप्टेंबर) ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली. सकाळी 11 वाजता अनिल परब ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.

आपण ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिल्याचं अनिल परब म्हणाले. तसंच यापुढेही ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

'आज मला जे समन्स आलं होतं त्या अनुषंगाने ईडीच्या कार्यालयात आलो.अधिकाऱ्यांनी जे प्रश्न मला विचारले त्या सगळ्यांची उत्तरं देता आली. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिली आहेत. ईडी ही एक ऑथॉरिटी आहे. त्यामुळे त्यांना उत्तरं देणं ही माझी जबाबदारी आहे. कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही. यापुढेली मी ईडीला सहकार्य करणार, असं अनिल परब यांनी चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं.

टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

3. मोफत शिवभोजन थाळी बंद, प्रति प्लेट किती रुपये द्यावे लागणार?

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे आणि कामगारांचे हाल सुरू झाले होते. अशा गरजूंसाठी राज्य सरकारने मोफत शिवभोजन थाळी सुरू केली होती.

कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर शासनाने निर्बंध हळूहळू कमी केले आहेत. त्यानंतर आता शासनाने शिवभोजन थाळी मोफत देणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्णयानुसार गरीब आणि गरजूंना शिवभोजन केंद्रांवर 30 सप्टेंबरनंतर मोफत शिवभोजन थाळी मिळू शकणार नाही.

शासनाच्या निर्णयानुसार, आता 1 ऑक्टोबरपासून ग्राहकांना शिवभोजन थाळीसाठी पूर्वीप्रमाणे प्रति प्लेट 10 रुपये द्यावे लागणार आहेत. मंगळवारी (29 सप्टेंबर) राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.

या परिपत्रकानुसार शिवभोजन थाळीची पार्सल सुविधा देखील शिवभोजन केंद्रांवर उपलब्ध होणार नाही.

महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

4. काँग्रेस वाचली नाही, तर देश वाचणार नाही- कन्हैय्या कुमार

'पंतप्रधान फक्त नावाला आहेत, देशाला फक्त काँग्रेसच वाचवू शकते,' असं मत कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केलं आहे.

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैय्या कुमार यांनी मंगळवारी (29 सप्टेंबर) राहुल गांधीच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी बोलताना कन्हैय्या कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं, "जर काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही, असं फक्त मलाच नाही तर देशातल्या सर्व तरुणांना वाटू लागलं आहे. जेव्हा आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षप्रवेशाचा अर्ज भरत होतो, तेव्हा जिग्नेश यांनी त्यांना संविधानाची प्रत भेट दिली आणि मी त्यांना भगतसिंग, गांधी आणि आंबेडकरांची प्रतिमा दिली. कारण आज या देशाला आंबेडकरांच्या समानतेची, भगतसिंगांच्या शूरतेची आणि गांधीच्या एकतेची गरज आहे."

"आज या देशात भारतीय होण्याची जी ओळख आहे, ज्यात सत्तेला आव्हान देण्याचं सामर्थ्य आहे. त्या भारतीय चिंतन परंपरेला वाचवण्याची आज गरज आहे. म्हणून मी काँग्रेसमध्ये सामील झालो आहे. कारण हाच तो पक्ष आहे जो महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, आंबेडकर, नेहरु, भगतसिंग यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. समानता आणि समता ही कोणा एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तो भारताचा इतिहास आहे," असं कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं.

5. आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (29 सप्टेंबर) यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन'चा शुभारंभ केला.

यादरम्यान कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी जे अभियान सुरु आहे, ते आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एका अशा मिशनची सुरुवात होत आहे, ज्यामध्ये भारतातील आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्ती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मला आनंद होतोय की, आजपासून आयुषमान भारत डिजिटल मिशन संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आलं आहे. हे मिशन देशातील गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांच्या उपचारांत येणारे अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे."

"130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाईल सब्स्क्राईबर्स, जवळपास 80 कोटी इंटरनेट युजर्स, जवळपास 43 कोटी जनधन बँक खाती एवढं मोठं कनेक्टेड इंफ्रास्ट्रक्चर जगात कुठेच नाहीये. हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर रेशनपासून प्रशासनापर्यंत, पारदर्शी पद्धतीनं सामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवत आहे," असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

एबीपी माझानं ही बातमी दिलीये.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)