हैदराबाद बलात्कार प्रकरणातील संशयिताचा मृत्यू, आत्महत्या की एन्काऊंटर?

पल्लाकोंडा राजू

फोटो स्रोत, Telangana police

फोटो कॅप्शन, बलात्कार प्रकरणातील संशयित पल्लाकोंडा राजू
    • Author, गीता पांडेय,
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली.
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

तेलंगणची राजधानी हैदराबाद येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं होतं. पण याच्या काही दिवसांतच या प्रकरणातील संशयिताचा मृतदेह रेल्वे रुळावर संशयास्पदरित्या आढळून आला आहे.

आरोपीने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

मात्र संशयित आरोपीला बनावट एन्काऊंटरमध्ये मारण्यात आलं आहे, असा आरोप मानवाधिकार संघटनांकडून केला जात आहे.

गेल्या आठवड्यात हैदराबाद येथील एक 6 वर्षीय बालिका तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. काही तासांनंतर तिचा मृतदेह पल्लाकोंडा राजू या संशयित आरोपीच्या घरी आढळून आला होता.

पीडितेच्या शेजारीच आरोपी राहात होता.

शवविच्छेदनात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं तसंच गळा घोटल्याने तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.

या प्रकरणानंतर राज्यात जनक्षोभ उसळला. राजकीय नेते, तेलुगू चित्रपट क्षेत्रातील अभिनेते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

सोशल मीडियावरही या प्रकरणाचे पडसाद दिसून आले. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली जाऊ लागली.

निषेध आंदोलनासाठी एकत्रित आलेल्या जमावाने एकाएकी आरोपीच्या घराकडे धाव घेऊन त्याच्या घराचं नुकसान केलं. त्याच्या घरातील सामान बाहेर फेकून देण्यात आलं.

संशयिताचं 'एन्काऊंटर' करून त्याला यमसदनी धाडा, अशी मागणी लोकांकडून केली जाऊ लागली.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

भारतात व्हिजिलांते स्टाईल म्हणजेच बदल्याच्या भावनेतून पोलिसांकडून केलेल्या हत्येला मोठा पाठिंबा मिळतो. विशेषतः बिभत्स क्रौर्यासह झालेले बलात्कार, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यांसारख्या अतिगंभीर गुन्ह्यांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.

देशात दरवर्षी सरासरी 10 हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद होते.

लोकांच्या मते, न्याययंत्रणेचं कामकाज कासवगतीने चालतं त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते, अशी लोकांची धारणा बनली आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर गेल्या आठवड्यात पोलिसांनी आरोपीचं छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं.

पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं.

पण गुरुवारी (16 सप्टेंबर) या प्रकरणातील आरोपी पल्लाकोंडा राजू याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी बीबीसी तेलुगूला दिली.

ही एक आत्महत्या असल्याचं स्पष्टपणे समजतं, असं पोलिसांनी सांगितलं. मृतदेहाच्या हातावरील टॅटूवरून हा पल्लाकोंडा राजूचाच मृतदेह आहे, अशी ओळख पोलिसांनी पटवली आहे.

आत्महत्येच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी राजूला रेल्वेमार्गावरून चालताना पाहिलं होतं, त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्याला रेल्वेने उडवलं, असंही पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं.

मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांनी आधी राजूला ताब्यात घेतलं. त्याची हत्या केली आणि त्यानंतर ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात आहे, असा आरोप पोलिसांवर करण्यात येत आहे.

राजूच्या पत्नीने पत्रकारांशी बोलताना म्हटलं, "गुरुवारी सकाळी मला एका पोलिसांचा कॉल आला. पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या पतीची भेट घ्या, असं मला सांगण्यात आलं होतं."

याव्यतिरिक्त राज्यातील मंत्री के. टी. रामाराव यांनीही एक ट्विट केलं होतं. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे, असा दावा त्यांनी केला होता. पण नंतर काही वेळातच त्यांनी ते ट्विट डीलिट केलं. पोलीस अजूनही आरोपीचा शोध घेत आहेत, असं ते नंतर म्हणाले.

या प्रकारावरही अनेकांनी संशय व्यक्त करत लक्ष वेधलं आहे.

राजूचा मृतदेह पोलिसांना सापडण्याच्या दोन दिवस आधी राज्याचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी केलेलं वक्तव्यही पाहू.

ते म्हणाले होते, "आम्ही त्या बलात्कारी खूनीला पकडून त्याचं एन्काऊंटर करू."

डिसेंबर 2019 मध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींचं एनकाऊंटर झाल्यानंतर करण्यात आलेला जल्लोष

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डिसेंबर 2019 मध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींचं एन्काऊंटर झाल्यानंतर करण्यात आलेला जल्लोष

हैदराबादमध्ये बलात्कार पीडितांना तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी असे एनकाऊंटर केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

डिसेंबर 2019 मध्येही पोलिसांनी एका 27 वर्षीय पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींना एनकाऊंटरमध्ये ठार केलं होतं.

त्यावेळी पोलीस कोठडीत अटकेत असलेल्या चार आरोपींना क्राईम सीन समजून घेण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं.

पण त्यावेळी आरोपींनी पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चकमकीत ते ठार झाले, असं पोलिसांनी म्हटलं होतं.

मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या एन्काऊंटरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. हा एक न्यायबाह्य पद्धतीने करण्यात आलेला खून असल्याचा आरोप करण्यात आला.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. तो तपास अद्याप चालू आहे.

पण ते चार एन्काऊंटर झाल्यानंतर देशभरातून त्याचं कौतुक करण्यात आलं. लोक फटाके उडवून त्याचा आनंद साजरा करताना दिसले.

हैदराबाद पोलिसांना हिरोंप्रमाणे डोक्यावर घेतलं गेलं. त्यांचे सार्वजनिक सत्कारही झाले.

याविषयी प्रा. कन्नबिरन यांनी बीबीसीला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणतात, "आरोपींना रस्त्यांवर ठार करून तुम्ही बलात्कार रोखू शकणार नाही. डिसेंबर 2019 मध्ये तुम्ही चार आरोपींना गोळ्या घालून ठार केलं. पण त्यामुळे बलात्कार व्हायचे थांबले का?"

"आंधळेपणाने बदला घेऊन पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रकार चुकीचा आहे. अशाप्रकारे रस्त्यांवर आरोपींना पळायला लावून हत्या करणं हा न्यायाचा अर्थ आहे का," असा प्रश्नही कन्नबिरन यांनी विचारला.

"पोलिसांना सोपा मार्ग काढायचा आहे. असं केल्यास योग्य पद्धतीने तपास करण्याची, मजबूत पुरावे आणि खटला तयार करण्याची गरज नाही. एखाद्या प्रकरणात पूर्ण आणि निःपक्षपाती तपास होतो, तेव्हाच त्या पीडितेला न्याय मिळतो. अन्यथा ही एक अत्यंत दयनीय अवस्था आहे," असं मत कन्नबिरन नोंदवतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)