कोव्हिडची लस घेतल्यावर मासिक पाळीत बदल होतात का, याविषयी संशोधनाची मागणी

मासिक पाळी, कोरोना, लस, रोगप्रतिकारक्षमता, सोशल मीडिया, महिला

फोटो स्रोत, JOHN CAIRNS/UNIVERSITY OF OXFORD

फोटो कॅप्शन, कोरोना लस
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

कोव्हिडची लस घेतल्यावर पाळीतील बदल आणि अनपेक्षित रक्तस्रावाच्या घटनांवर अधिक संशोधन व्हायला हवं, म्हणजे महिलांना लशीविषयी अधिक खात्री पटेल, अशी मागणी एका आघाडीच्या संशोधकानं केली आहे.

लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या डॉ. व्हिक्टोरिया मेल या एक immunologist म्हणजे रोगप्रतिकारक तज्ज्ञ असून प्रजनन आणि गरोदरपणातील रोगप्रतिकारक क्षमतेवर त्यांनी अभ्यास केला आहे.

द बीएमजे या मेडिकल जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखात व्हिक्टोरिया सांगतात, की पाळीतील बदलांमागे लशीतील घटकांपेक्षा, शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीनं लशीवर दिलेली प्रतिक्रिया कारणीभूत असू शकते.

लशीचा गरोदरपणावर किंवा प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होत असल्याचा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही.

युकेमधील अधिकाऱ्यांकडे 30,000 हून अधिक महिलांनी पाळीशी निगडीत समस्यांविषयी तक्रार केली आहे.

त्यात कोव्हिडच्या काही लशी घेतल्यावर नोंदवलेल्या साईड इफेक्ट्समध्ये पाळीच्या दिवसांत नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव, पाळी उशीरानं येणं, अनपेक्षित रक्तस्राव होणं अशा तक्रारींची नोंद झाली आहे.

पण युकेमध्ये 4 कोटी 70 लाखांहून अधिक महिलांना लस देण्यात आली आहे, म्हणजे जवळपास 0.06 टक्के महिलांनीच पाळीशी निगडीत तक्रारी नोंदवल्या आहेत.

या अहवालांची पडताळणी केल्यावर, कोव्हिडच्या लशी आणि या लक्षणांमध्ये काही संबंध असल्याची पुष्टी होत नाही, असं युकेमधील मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी अर्थात MHRAनं स्पष्ट केलं आहे.

पाळीत अनियमितता ही अतिशय सामान्यपणे आढळून येते, त्यामागे अनेक कारणं असू शकतात आणि लसीकरणानंतर असा परिणाम झालेल्या महिलांची संख्या अत्यंत कमी आहे, असं या संस्थेनं म्हटलं आहे.

मासिक पाळी, कोरोना, लस, रोगप्रतिकारक्षमता, सोशल मीडिया, महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मासिक पाळी

कोरोना व्हायरसची लागण होऊन गेलेल्या तसंच 'लाँग कोव्हिड'चा त्रास होणाऱ्या काही महिलांनीही पाळीतील बदलांविषयी तक्रारी केल्या आहेत.

म्हणूनच बीएमजेमध्ये लिहिलेल्या लेखात डॉ. व्हिक्टोरिया मेल म्हणतात, की याविषयी आणखी सखोल संशोधन व्हायला हवं, म्हणजे लसीकरणाविषयी गैरसमज रोखण्यात मदत होईल.

त्या म्हणतात, "लस घेतल्यावर भविष्यातील गर्भारपणावर परिणाम होईल, या गैरसमजुतीमुळे अनेक तरूण महिला कोव्हिडची लस घ्यायला कचरतायत. याविषयी सखोल संशोधन झालं नाही, तर ही भीती आणखी पसरत जाण्याची शक्यता आहे."

"लसीकरण आणि पाळीतील बदलांचा संबंध असल्याचं संशोधनातून सिद्ध झालं, तर ही माहिती महिलांना पाळीतील संभाव्य बदलांना सामोरं जाण्यासाठी तयारी करण्यात मदत करू शकते." असंही डॉ. मेल सांगतात.

मासिक पाळी, कोरोना, लस, रोगप्रतिकारक्षमता, सोशल मीडिया, महिला

फोटो स्रोत, Getty Images

ज्या महिलांना आपली पाळी नेमकी कधी येणार आहे, या माहितीवर अवलंबून राहावं लागतं, त्यांच्यासाठी असं नेमकं आणि विश्वसनीय संशोधन महत्त्वाचं ठरू शकतं.

डॉ. मेल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात : भविष्यात कुठल्याही वैद्यकीय प्रक्रीयेचा पाळीवरील परिणाम याविषयीचं संशोधन हा मागाहून सुचलेला विचार नसावा. अर्थात, कुठल्याही संशोधनात एखाद्या गोष्टीचा पाळीवर काय परिणाम होईल, यावरही भर द्यायला हवा.

रोगप्रतिकारक संस्थेचा पाळीशी काय संबंध?

लसींमुळे काही महिलांच्या पाळीवर परिणाम कसा होत असावा, याविषयी शास्त्रज्ञांकडे अजून नेमकी माहिती नाही. पण रोगप्रतिकार संस्थेच्या हार्मोन्सवरील परिणामांमुळे असं होऊ शकतं. लसीचा परिणाम आपल्या याच रोगप्रतिकार संस्थेवर म्हणजे इम्युन सिस्टिमवर होत असतो.

गर्भाशयाच्या पडद्यातील रोगप्रतिकारक पेशींमध्ये झालेल्या बदलांमुळेही असं होऊ शकतं.

ह्युमन पॅपिलोमाव्हायरस अर्थात HPV सारख्या इतर काही लशींचा पाळीतील बदलांशी संबंध जोडला जातो, पण हे का आणि कसं होतं याविषयी फारसं संशोधन झालेलं नाही.

'लस हे सर्वात मोठं संरक्षण'

एका गोष्टीत मात्र वैज्ञानिकांचं एकमत आहे. लसीकरणाचा महिलांच्या गर्भधारणेच्या आणि मूल जन्माला घालायच्या क्षमतेवर परिणाम होत नाही. लशींच्या चाचणीतून हे दिसून आलंय. पुरुषांच्या बाबतीतही लशीचा शुक्राणूंवर काही परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे.

डॉ. जो माऊथफील्ड रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्ट्रिशियन्स अँड गायनेकॉलॉजिस्ट (RCOG) मध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्या सांगतात, की लस घेतल्यावर पाळीतील बदलांमुळे काळजी वाटू शकते. पण सामान्यतः एक-दोन महिन्यांपर्यंतच ही लक्षणं दिसून येतात.

एखाद्या महिलेला नेहमीपेक्षा खूप जास्त रक्तस्राव होत असेल, विशेषतः मेनोपॉजनंतर असं घडत असेल, तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असं त्या सांगतात. पण असा परिणाम फारकाळासाठी राहण्याचा धोका कमी आहे असंही त्या नमूद करतात.

"अशा तात्पुरत्या बदलांचा एखाद्या व्यक्तीच्या प्रजननक्षमतेवर परिणाम झाल्याचा कुठलाही पुरावा नाही."

मासिक पाळी, कोरोना, लस, रोगप्रतिकारक्षमता, सोशल मीडिया, महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मासिक पाळी

इतकंच नाही, तर लस ही कोरोना विषाणूविरुद्धचं सर्वोत्तम संरक्षण कवच असल्याचं RCOG नं स्पष्ट केलं आहे. विशेषतः मूल जन्माला घालण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या महिलांसाठी लसीकरण अधिक महत्त्वाचं आहे, कारण लस न घेतलेल्या गरोदर महिलांना इतरांपेक्षा कोव्हिडमुळे जास्त गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की लस घेतल्यावर महिलांना पाळीमध्ये बदलांचा सामना करावा लागतो का, आणि कशामुळे याविषयी अधिक संशोधन गरजेचं आहे.

भारतातील तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

भारतातही पाळीच्या काळात लस घेऊ नये, असे मेसेजेस व्हायरल झाले होते. पण फेडरेशन ऑफ ऑबस्ट्रेटिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडियानं एप्रिलमध्येच ते खोडून काढले होते आणि म्हटलं होतं, की "अशा दाव्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. पाळीच्या दिवसात लसीकरणानं शारीरिक, हार्मोनल किंवा रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होत नाही."

एरवी लशीची चाचणी ही वर्षानुवर्ष केली जाते आणि त्यात वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या वयांच्या पुरुष आणि महिलांच्या शरिरावर त्या लशीचा काय परिणाम होतोय याचा विचार केला जातो. जागतिक साथीमुळे कोव्हिडवरच्या लशींना लवकर मान्यता मिळाली.

त्यामुळेच भारतासह अनेक देशांत अधिक संशोधन होईपर्यंत गरोदर महिलांना लस देऊ नये, असा नियम करण्यात आला आहे.

पण लशीचा स्त्रियांच्या शरिरावर विशेषतः पाळीवर कसा आणि किती प्रमाणात परिणाम होऊ शकतो, याविषयी गैरसमज जास्त पसरतायत आणि म्हणूनच यावरही संशोधन तज्ज्ञांना गरजेचं वाटतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)