उत्तर प्रदेश : बिजनौरमध्ये महिला खो-खो खेळाडूची निर्घृण हत्या, बलात्काराचा संशय

बबली राणी

फोटो स्रोत, FAMILY PICTURES

    • Author, शहबाझ अन्वर
    • Role, बिजनौरहून बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

उत्तर प्रदेशच्या बिजनौर रेल्वे स्थानकावर गेल्या शुक्रवारी (10 सप्टेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक तरुणीचा मृतदेह आढळला होता. तरुणीची ओळख पटली असून, रेल्वे स्थानकाजवळच्या सर्वोदय कॉलनीत राहणारी राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू 24 वर्षीय बबली राणी हिचा तो मृतदेह होता.

"माझी बहीण शुक्रवारी सकाळी 11:40 वाजता घरून निघाली होती, पण नंतर तिचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळल्याची माहिती आम्हाला मिळाली," असं बबलीची मोठी बहीण ललिता यांनी सांगितलं.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जीआरपी एसपी अपर्णा गुप्ताही घटनास्थळी पोहोचल्या.

"मृतदेहाचं शवविच्छेदन केलं आहे. बलात्कार झाल्याच्या संदर्भात अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही," असं अपर्णा गुप्ता म्हणाल्या.

"कुटुंबीयांनी बबलीबरोबर बलात्कार झाला असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळं त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. बलात्काराचं प्रकरणही दाखल करण्यात आलं आहे. तसंच हे प्रकरण पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे."

"बबलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कार किंवा इतर गुन्हा झाल्याचं आढळलेलं नाही,'' असं बिजनौरचे पोलिस अधीक्षक डॉक्टर धर्मवीर म्हणाले.

''तरुणीच्या मृत्यूचं कारण, गळा दाबणं हे असल्याचं समोर आलं आहे. दोन डॉक्टरांच्या पॅनलनं शवविच्छेदन केलं आहे. त्याचं व्हीडिओ शूटिंगही करण्यात आलं आहे. या पॅनलमध्ये एक महिला डॉक्टरही होत्या. या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथकं तैनात करण्यात आली आहेत," असं ते म्हणाले.

बबली राणी ही दलित कुटुंबातील होती.

नातेवाईकांच्या आरोपानुसार बलात्कारासंदर्भातही तपास केला जात असल्याचं, बिजनौर जीआरपीच्या पोलिस अधीक्षक अपर्णा गुप्ता म्हणाल्या.

दोन तासांमध्ये घडला गुन्हा

फिकट पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या ट्राऊझरमधील बबलीचा फोटो समोर आला आहे. दुर्घटनेच्या काही वेळानंतर काढलेल्या या फोटोवरून तिची ट्राउझर बळजबरी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, हे स्पष्ट होतं.

बबलीच्या मानेवर कसल्या तरी खुणादेखील होत्या.

बिजनौर, बबली राणी

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR

त्यांचा चेहरा रक्तानं माखलेला होता तसंच टी-शर्टवरही रक्ताचे शिंतोडे उडालेले होते. मृतदेहाच्या जवळ एक चप्पल आणि जेवणाचा डबा आढळला असून, बबलीचा मोबाईल मात्र सापडलेला नाही.

बबली घरातून सकाळी 11:40 वाजता निघाली होती. त्यानंतर दुपारी दोन वाजता तिचा मृतदेह आढळल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यामुळं बबलीबरोबर दुपारी 11:45 पासून दुपारी दोन वाजेच्या दरम्यानपर्यंत हा गुन्हा घडला असण्याची शक्यता आहे.

बबलीची मोठी बहीण ललिता या कुपनलिका विभागात कुपनलिका चालक आहेत. "आमचं कुणाशीही काहीही शत्रुत्व नाही. माझी बहीण तर या रस्त्याने रोज येत - जात होती. तिची हत्या कोणी केली माहिती नाही," असं ललिता म्हणाल्या.

"माझ्या बहिणीचा मृतदेह आढळला त्याठिकाणी अनेक लोक, तंबाखू, गुटखा, बीडीसह नशेच्या पदार्थांचं सेवन करत बसतात,'' असंही ललिता यांनी सांगितलं.

बहिणीवर बलात्कार झाला असल्याची शक्यता ललिता यांनी व्यक्त केली.

बबली राणी

फोटो स्रोत, FAMILY PICTURES

फोटो कॅप्शन, बबली राणी

"माझी बहीण खेळाडू होती. एक किंवा दोन जणांनी तिच्यावर नियंत्रण मिळवणं अशक्य आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट योग्य असेल तर तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता आहे. आरोपी कदाचित परियचातील असतील, त्यामुळं तिची हत्या केलेली असावी," असं ती म्हणते.

"हा सर्व तपासाचा भाग आहे. गुन्ह्यामध्ये कलम 376 बरोबरच 354 चाही समावेश आहे. बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास सुरू आहे. आरोपी आसपासचेच असतील असं मला प्रथमदर्शनी वाटतं. याबाबत अधिक माहिती देणं हे योग्य ठरणार नाही,'' असं ललिता यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना बिजनौरचे पोलिस अधीक्षक डॉ. धर्मवीर सिंह यांनी सांगितलं.

बबलीचा मृतदेह स्लिपर्सच्या (रेल्वे रुळांमध्ये ठेवलेल्या सिमेंटच्या लांब ब्लॉक) ढिगाऱ्यात पडलेला होता. तिथून जवळच सर्वोदय कॉलनी आहे.

शहरात जाण्यासाठी लोकांनी इथून शॉर्टकट तयार केला आहे. मुख्य रस्त्याद्वारे शहरात पोहोचण्यासाठी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागतो. मध्ये एक रेल्वे फाटकही आहे.

मात्र, या अनधिकृत मार्गाने जायला फार तर 10 मिनिटांचाच वेळ लागतो.

बबली राणी

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR

"लोक गैरमार्गाने याठिकाणाहून ये-जा करतात. याठिकाणी रुळांच्या बाजुला स्लिपरचे ढिग लावलेले आहेत. थोडा वेळ वाचवण्याच्या नादात लोक कधी या ढिगाऱ्यांमधून तर कधी त्यावरून रेल्वे रुळावरून जात असतात. ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे,'' असं जीआरपी चौकीचे प्रभारी जितेंद्र कुमार म्हणाले.

''अनेक वेळा अशा लोकांवर कारवाईही केली जाते. याठिकाणापासून प्लॅटफॉर्म बरंच लांबही आहे."

रेल्वे स्थानकापासून अंतरावर असल्यानं ही जागा सामसूमही असते.

लहानशा घरात केवळ मुलीच्या आठवणी शिल्लक

बिजनौरमध्ये नगिना रोड रेल्वे फाटकापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शुगर मिलजवळ बबलीचं घर आहे.

सर्वोदय कॉलनीमध्ये जाट, चौहान, शर्मा अशा संमिश्र लोकसंख्येमध्ये ऋषी पाल यांचं घर आहे.

याठिकाणी असलेल्या साखर कारखान्यात मजुरी करणारे ऋषी पाल बबलीच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले होते, त्यामुळं त्यांच्याशी आमची भेट होऊ शकली नाही.

अरुंद गल्ल्यांमधून पुढं गेल्यानंतर अखेरच्या टोकाला बबलीचं एक लहानसं घर आहे. अंदाजे अवघ्या 200-250 चौरस फुटांचं ते घर असेल.

घराच्या बाहेर छोट्याशा अंगणाच्या कोपऱ्याला एका लहानशा छपराखाली दोन म्हशी बांधलेल्या आहेत.

बिजनौर, बबली राणी

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR

शेजारच्या आणि नातेवाईकांपैकी काही महिला कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी घरात बसलेल्या होत्या.

बबलीच्या आई गीता यांचे तर अश्रूच थांबत नव्हते. "माझी मुलगी रेल्वेच्या रुळाजवळ असलेल्या स्लिपरजवळ पडलेली होती. त्याच्या गळ्यावर खुणा होत्या. त्या लोकांनी तिचा गळा दाबला. तिच्या तोंडातून रक्त निघत होतं. कपड्यांवरही रक्त होतं. माझी मुलगी मला परत आणून द्या," असं म्हणत त्या रडत होत्या.

तीन वेगवेगळ्या दिशांना तीन छोट्या खोल्या होत्या. त्यापैकी एक खोली बबलीची आहे. बबलीचा बेड, तिचे मेडल, सर्टिफिकेट, टिव्ही आणि इतर साहित्य सजवून ठेवलेलं स्पष्ट दिसत होतं.

नोकरीच्या शोधात असलेली राष्ट्रीय खेळाडू

बबली सुरुवातीपासून खेळांमध्ये उत्तम होती. तिनं 10वी आणि 12वीचं शिक्षण गव्हर्नमेंट गर्ल्स इंटर कॉलेज बिजनौरमधून 2011 आणि 2013 मध्ये पूर्ण केलं होतं.

त्यानंतर तिनं पदवीचं शिक्षण वर्धमान डिग्री कॉलेजमधून पूर्ण केलं.

"बबलीनं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तरसाठी प्रवेश घेतला होता. पण पहिल्या वर्षानंतर तिनं ते सोडून दिलं. बबली खो-खो शिवाय अॅथलिटही होती. पण खो-खोमध्ये तिनं राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती," असं बबलीची बहीण ललिता यांनी सांगितलं.

"बबली राष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळली होती, ती अत्यंत चांगली खेळाडू होती," असं स्थानिक शिक्षक चंद्रहास म्हणाले.

बबलीची मैत्रीण असलेल्या मोनिकादेखील मैत्रिणीच्या हत्येचा धक्का बसला आहे.

बिजनौर, बबली राणी

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR

"बबली लहानपणापासूनच खेळांमध्ये आघाडीवर होती. ती खो-खो उत्तम खेळायची. 2016 मध्ये ती बिहारच्या टीमकडून खेळण्यासाठी महाराष्ट्रात गेली होती त्याठिकाणी ती अनेकदिवस राहिली. तिला अनेक प्रमाणपत्रंही मिळाली होती, तिनं अनेक पदकंही जिंकले होते. धावण्यातही तिचा वेग प्रचंड होता," असं त्या म्हणाल्या.

"बबली एक अत्यंत मेहनती खो-खो खेळाडू होती. तिनं 2016 मध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि 2017 मध्ये राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता," असं बिजनौर जिल्हा खो-खो संघाचे सचिव मुकुल कुमार म्हणाले.

बबली उत्तराखंडच्या श्रीनगर पौडी गढवालमधील बीपीएडच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. कोरोनाच्या साथीमुळं कॉलेज बंद असल्यामुळं ती घरी आलेली होती.

दरम्यानच्या काळात, क्रीडा शिक्षिका म्हणून तिला नोकरी मिळाली होती. पण आणखी चांगल्या नोकरीच्या शोधात ती होती.

बबली राणी

फोटो स्रोत, FAMILY PICTURES

फोटो कॅप्शन, बबली राणी

घटनेच्या दिवशीही ती घरातून एका शाळेमध्ये इंटरव्ह्यूसाठी जायचं सांगून निघाली होती.

चांगले कपडे परिधान करणं, फोटो काढणं, व्हीडिओ तयार करणं, सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणं हेदेखील बबलीला आवडत होतं. बहीण आणि आई जेव्हाही तिच्या फोटोकडं पाहत होत्या, तेव्हा त्या फोटोला दोघी कुरवाळत होत्या.

शुक्रवारी ज्याठिकाणी बबलीची हत्या झाली, त्याठिकाणीच आधी बबलीनं फोटो काढला होता. तो फोटो घरात एका फ्रेममध्ये लावून ठेवलेला होता.

"बबली, तुला जिथं फोटो काढायची हौस होती, तिथंच तुझी हत्या झाली," असं ललिता त्या फोटोकडं पाहत म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)