नितीन राऊत : वीज बिल वेळेत वसूल केलं नाही तर राज्य अंधारात जाईल

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. वीज बिल वेळेत वसूल केलं नाही तर राज्य अंधारात जाईल - नितीन राऊत
मागच्या सरकारने वीज बिल थकबाकीचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर कोरोना व्हायरसचं संकट आलं. यादरम्यान राज्याची वीज बिल थकबाकी 79 हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचली. त्यामुळे आता वीज बिल वेळेत वसूल केलं नाही तर राज्य अंधारात जाऊ शकतं, असं वक्तव्य उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मंगळवारी (14 सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधताना नितीन राऊत बोलत होते. ते म्हणाले, मागच्या सरकारने उभा केलेला थकबाकीचा डोंगर, चक्रीवादळ, महापूर यांच्याशी झुंज आणि महावितरणची आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींचं विश्लेषण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरस साथीमुळे वीज बिलाची वसुली वेळेत करता आली नाही. ही वसुली वेळेत न झाल्यास राज्य अंधारात जाऊ शकतं, अशी चिंता राऊत यांनी व्यक्त केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
2. पंतप्रधान परदेशातही हिंदी बोलतात, तर आपण का लाजतो? - अमित शाह
भारताला भाषांच्या बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. आत्मनिर्भर असणं म्हणजे केवळ देशात उत्पादन करणं नव्हे, भाषांच्या बाबतीतही आपण 'आत्मनिर्भर' असणं आवश्यक आहे.
जर पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलू शकतात, तर आम्हाला कशाबद्दल लाज वाटते, असा सवाल गृहमंत्री अमित शाह यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हिंदी दिनानिमित्त एका मेळाव्याला संबोधित करताना गृहमंत्री शाह बोलत होते.
ते म्हणाले, "हिंदीत बोलणं हा चिंतेचा विषय होता, ते दिवस आता गेले आहेत. भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषेच्या समन्वयात आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हिंदी दिवसाच्या निमित्ताने, मी सर्व देशवासियांना विनंती करतो की, मूलभूत कार्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेसह हिंदी ही अधिकृत भाषांपैकी एक असलेल्या हिंदीचा उत्तरोत्तर वापर करण्याची प्रतिज्ञा घ्या.
भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषा यांच्या समन्वयात आहे. आपणा सर्वांना हिंदी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, असं शाह यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
3. अब्रूनुकसान प्रकरण : किरीट सोमय्या यांना कोर्टात हजर राहावं लागणार
'गृहनिर्माण विभागातील अधिकारी प्रवीण कलमे हे या विभागातील सचिन वाझे आहेत,' असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं होतं. या प्रकरणी कलमे यांनी अब्रूनुकसानीचा दावा ठोकल्याने किरीट सोमय्या यांना कोर्टात सुनावणीसाठी दाखल राहावं लागणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
किरीट सोमय्या यांनी 1 एप्रिल 2021 रोजी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी प्रवीण कलमे यांना गृहनिर्माण विभागाचे सचिन वाझे म्हणून संबोधलं होतं. या टिप्पणीवर प्रवीण कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा करत याचिका दाखल केली होती.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए आणि म्हाडा या संस्थांमधून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते. हे काम प्रवीण कलमे यांना सोपवण्यात आले होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
यावर आक्षेप घेत प्रविण कलमे आणि अर्थ नावाच्या एका संस्थेकडून या आरोपांविरुद्ध आव्हान देण्यात आलं.
त्यांनी या प्रकरणी मुंबईतील शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने किरीट सोमय्या यांना 22 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही बातमी एबीपी माझाने दिली.
4. 'त्यांनी गाणं म्हटलं तर ती कला, लोककलावंतांनी म्हटलं तर ते नाचे?'
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस वाद शमण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.

फोटो स्रोत, Twitter
दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या टीकेनंतर त्यांना त्यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
'राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 'रंगलेल्या गालाचा' मुका घेणारा पक्ष आहे,' अशी टीका दरेकर यांनी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या मुद्द्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला.
"या वक्तव्यावरून विरोधकांचे वैचारिक दारिद्र्य लक्षात येते. त्यांनी एखादं गाणं म्हटलं, नृत्य केलं तर ती कला. मात्र, लोककलावंतानी हे केलं तर ते नाचे, असे यांचे खालच्या पातळीवरील विचार आहेत," असं चाकणकर म्हणाल्या. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
5. औरंगाबाद ग्रामीण पोलीस पथक राज्यात सर्वोत्कृष्ट
महाराष्ट्र पोलीस महासंचलनालय यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा मान औरंगाबादच्या ग्रामीण जिल्हा पोलीस दलाला मिळाला आहे.
जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीतील कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यांकन करून हा मान औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस दलाला देण्यात आला.
या काळात ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वात औरंगाबाद ग्रामीण युनिटचे काम चाललं. त्यामुळे त्यांचं तसंच ग्रामीण पोलीस दलाचं कौतुक करण्यात येत आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























