कोव्हिड काळात घर हे लहान मुलांसाठी कोंडवाडा झालं आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राजक्ता धुळप,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
कोव्हिड संकट आणि लॉकडाऊनमुळे एरव्ही घरातल्या चार भिंतीच्या आत घडणारे अनेक संघर्ष ऐरणीवर आले. महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांमध्ये गरीब घरातल्या कुटुंबामधील किशोरवयीन मुलांचं जगणं अधिकच गुंतागुंतीचं होत गेलं. त्याच्या या काही प्रातिनिधीक कहाण्या.
शाळा बंद असल्याने घरात राहणंच भाग होतं. अनेकांचा त्यामुळे मानसिक कोंडमारा झाला. तज्ज्ञांच्या मते शाळा सुरू झाल्या तरी लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेले प्रश्न संपणार नाहीत.
बीबीसी मराठीची टीम दीपक आणि त्याच्या बहिणींना भेटली, त्याच दिवशी ते तिघेही जण घरी परतत होते. घरातून पळून गेल्याला दोन महिने झाले होते. इतक्या दिवसांनी आईला भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तर मुलं मिळाल्याचं समाधान असूनही आईच्या चेहऱ्यावरच्या वेदना लपत नव्हत्या. आपली मुलं न सांगता कशी पळून गेली या विचाराने त्या अस्वस्थ होत्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
दहा वर्षांचा दीपक (बदललेलं नाव) सहावीत आहे. त्याची बहीण रेशमा आठवीत तर लहान प्रिया सात वर्षांची आहे. तिन्ही भावंडं जवळच्या सरकारी शाळेत जात होती. लॉकडाऊन लागलं तसं शाळा बंद झाली. त्यावेळी पहिल्यांदाच सगळेजण घरात सलग वर्षभर राहिले.
रेश्मा सांगते, "वाटायचं घरात मला कोणीतरी कोंडून ठेवलंय. मी घरात फक्त कामच करत होते. आई आजारी असायची. तिचं औषधपाणी करावं लागायचं."
त्यांचे वडील ड्रायव्हरचं काम करत असल्याने त्यांचं काम थांबलं होतं आणि कमाई देखील थांबली.
दीपक सांगतो, "घरात पप्पांचा पगार झाला की मला ते क्वार्टर (दारु) आणायला सांगायचे. कधी-कधी तर मी सकाळी सातच्या शाळेला निघायचो तेव्हा मला क्वार्टर आणायला सांगायचे, शिव्या द्यायचे आणि मी नाही म्हटलं तर खूप मारायचे. लॉकडाऊन सुरू झालं तसं त्यांचं पिण्याचं प्रमाण वाढलं. इतकं वाढलं की कसलंही निमित्त झालं की मला आणि माझ्या बहिणीला मार पडायचा."
रेश्माच्या मनात वडिलांविषयी राग?
घरात लहान-सहान गोष्टींवरुन कलह सुरू झाला. ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांची कमाई 8 हजार रुपये, लॉकडाऊननंतर कमाई अनियमित होत गेली.
रेश्माच्या आणि दीपकच्या मनात घरातल्या हिंसेविरोधात संतापाची ठिणगी पडू लागली. नुकत्याच वयात आलेल्या रेशमाला वडिलाचं वागणं वारंवार खटकायचं.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
"मी माझ्या भावाला म्हणाले, बाजूला हो, मी पप्पांना मारतेच जाऊन. पप्पा असून इतकं मारतात का?" नुकत्याच वयात आलेल्या रेश्माला आपल्या बंदिस्त जगाविषयी अधिकच राग येऊ लागला. घरातला ताण वाढल्याने दीपकला घरात थांबावसं वाटायचं नाही, लॉकडाऊन जरा शिथिल झाल्यावर तो मित्रासोबतच जास्त असायचा.
दुसऱ्या लॉकडाऊननंतर परिस्थिती इतकी विकोपाला गेली घरात असुरक्षित वाटल्याने या तिन्ही भावंडांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वेस्टेशन गाठलं. घरातली भीती आणि दडपणापासून तिघंही मुक्त झाली होती, पण बाहेरच्या जगात असं वावरणं सोपं नव्हतं.
अगदी दोनच दिवसांमध्ये रेल्वे सुरक्षा बलने त्यांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. नीट काळजी घेत त्यांची आईशी भेट घालून देण्यात आली.
पण मुलांना अजून काही महिने घरी जायची इच्छा नव्हती. त्यांनी संस्थेत महिना-दोन महिने राहायची इच्छा व्यक्त केली. "घरातल्या दडपणाचा सामना करावा लागणार, हे संकट मोठं वाटत होतं." रेश्मा सांगते.
आम्ही या कुटुंबाला भेटलो तेव्हा त्यांची तगमग संपलेली नव्हती. पुढे काय हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता.
किती मुलं घरातून पळाली?
दीपक आणि रेश्मासारख्या अनेक मुलांनी घरातल्या अभूतपर्व परिस्थितीत घरातून पळून जाण्याचा मार्ग पत्करला. महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांमुळे घरातून पळून जाणाऱ्या मुलांची संख्या लॉकडाऊनमध्येही लक्षणीय होती.

फोटो स्रोत, Getty Images
मध्य रेल्वेने गेल्या सात महिन्यांमध्ये म्हणजेच जानेवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत चाईल्डलाईन सारख्या हेल्पलाईनच्या मदतीने 477 मुलांना रेस्क्यू करुन घरी पाठवलं.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं, "ट्रेनमध्ये किंवा स्टेशन परिसरात मुलं गोंधळलेल्या अवस्थेत दिसतात. घरातली भांडणं, किंवा शहराचं ग्लॅमर अशा कारणांमुळे मुलं घरातून बाहेर पडतात. अशा मुलांना कोव्हिडच्या काळात आमच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी हेरलं. मग त्यांची त्यांच्या पालकांसोबत भेट घडवून आणली, तर काहींना पुनर्वसन करण्यासाठी संस्थेकडे सोपवण्यात आलं. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या पाच प्रभागांमधून सापडलेल्या मुलांची त्यांच्या पालकांसोबत भेट घडवून आणली गेली. यात सर्वाधिक म्हणजे 171 मुलं पुणे प्रभागातून सापडली."
'हे माझे खरे आई-वडील नाहीत'
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीकडे गरीबच नाही तर मध्यमवर्गीय कुटुंबातील किशोरवयीन मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या तक्रारी येत होत्या. अशाच एका तक्रारीत 14 वर्षांचा जयेश घरात अबोल झाला.
सुरुवातीचे काही महिने आई-वडील आणि बहिणीशी वाद होत. पालकांची तक्रार असे की जयेश ऐकत नाही. आणि जयेशचं म्हणणं होतं की, घरातले सगळे माझे शत्रू आहेत.

फोटो स्रोत, Puneet burnala/BBC
पहिल्या लॉकडाऊननंतर घरातले वाद टोकाला गेले होते. जयेशने कारणं सांगून जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहणं पसंत केलं.
ऑनलाईन शिकवणं कळत नव्हतं आणि अभ्यासावरचं लक्ष पार उडालं होतं. मुलगा हाताबाहेर गेला म्हणून वडील संतापू लागले. जयेशने हे माझे खरे आई-वडिल नसल्याने त्यांच्यासोबत राहायचं नाही अशी तक्रार केली.
अखेर समुपदेशन करुन पालक आणि मुलामध्ये सुसंवाद घडवून आणण्यात यश आलं.
आई अभ्यासासाठी सारखी मागे लागते म्हणून रागाच्या भरात 15 वर्षांच्या मुलीने आईची हत्या केली.
ही घटना ऑगस्ट 2021मध्ये नवी मुंबईत घडली. तर त्याच महिन्यात नाशिकमध्ये मुलगा अभ्यास करत नाही म्हणून आईने मुलाचा खून केला आणि आत्महत्या केली. मुलांवर येणारा दबाव त्यांच्या मनात हिंसा जन्माला घालतो, असं मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात.
मुलांचं हरवलेलं जग कसं आणणार?
बाल्यावस्था ते प्रौढावस्था या दरम्यानचा काळ म्हणजेच 11 ते 19 वर्षांपर्यंतचा काळ म्हणजे किशोरवयीन वय. या वयात शारिरीक बदलांसोबत, भावनिक बदल होत असतात त्यामुळे मुलांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं.
कोव्हिड संकटात तर त्यांच्यासमोर अनेक पेच उभे राहिले. त्यांना मानसिक ताण-तणावांचा सामना करावा लागला, त्याचे परिणाम त्यांच्या पुढल्या आयुष्यावर होणार आहेत याकडे बाल मानसोपचारतज्ज्ञ लक्ष वेधतात. अजूनही लॉकडाऊनचे नियम सतत बदलत असल्याने किशोरवयीन मुलांना आपलं भवितव्य अनिश्चित वाटतंय.

फोटो स्रोत, Puneet burnala
प्रसिद्ध बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शेखर शेषाद्री म्हणतात- "काही अशी मुलं असतात त्यांच्यात मूलतःच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग किंवा आजार (disorder) म्हणून भीती (anxiety), अस्वस्थता (distress), चिंता या भावना असतात. त्यात लॉकडाऊनसारख्या अभूतपूर्व परिस्थितीत त्या भावना अधिक तीव्र होतात. तर काहींना पहिल्यांदाच अशा भावनांचा सामना करावा लागत होता.
आरोग्याबद्दलची काळजी, लॉकडाऊन कधी संपेल, शाळा कधी सुरू होईल, परिक्षेचं काय, वर्ष वाया जाईल का? परीक्षा देता येणार नाही का? अशा अनेक प्रकारच्या चिंता आणि काळजीचं त्यांच्या मनात थैमान सुरू झालं."
"मुलांच्या मनातला हा कोलाहल पालकांनी समजून घेऊन त्याला प्रतिसाद देणं गरजेचं असताना, पालकांना स्वतःला देखील अनिश्तिता आणि अनपेक्षित असलेल्या परिस्थितीशी तोंड द्यावं लागत होतं. पालक या परिस्थितीचा कसा सामना करतायत हे मुलं पाहात होते"
डॉ. शेषाद्री कुटुंबांची भूमिका आणि जबाबदारी याविषयी अधिक स्पष्टपणे मांडतात.
"मुलांनी आपली स्पेस गमावल्याचा अनुभव या काळात घेतला. दिनक्रम (routine) , आकृतीबंध (structure), अंदाज (predictability), वर्गात बसून शिकण्याचा अनुभव, सार्वजनिक ठिकाणी वावरणं, समवयस्कांबरोबरची देवाण-घेवाण, खेळ या सर्व गोष्टी मुलांच्या आयुष्याचा अपरिहार्य भाग होत्या.
हे सगळं गमावल्याचा अनुभव त्यांनी घेतला. हे हरवलेलं जग त्यांच्यापर्यंत पोहचवायचं कसं हे आव्हान पालकांसमोर होतं. जेणेकरुन जेणेकरुन मुलांचे विकासात्मक अनुभव आणि त्यांच्या बुद्धीचं पालन-पोषण टिकून राहील."
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही मुलं हेल्पलाईनपर्यंत पोहचू शकली.
हेल्पलाईनची मदत कशी घेतली?
मोबाईल आणि इंटरनेट सहज उपलब्ध असल्याने अनेक मुलांनी मदत मागण्यासाठी 1098 चाईल्डलाईन, iCall अशा हेल्पलाईनशी संपर्क साधला. iCall ही हेल्पलाईन टेलिफोन तसंच इ-मेलवरुन समुपदेशन करते.

फोटो स्रोत, Puneet burnala
लॉकडाऊनच्या काळात किशोरवयीन मुला-मुलींनी वेगवेगळ्या कारणांसाठी iCALLशी संपर्क साधला.
भीती वाटतेय, टेन्शन येतंय, कोव्हिड विषयीची माहिती, आई-वडिलांच्या भांडणांमुळे येणारं दडपण, लैंगिक शोषण याविषयीचे प्रश्न घेऊन मुलं हेल्पलाईनकडे आली असं iCallच्या समन्वयक तनुजा बाकरे यांनी सांगितलं.
मुलं पळून गेल्याच्या घटनाही हेल्पलाईनने नोंदवल्या.
तनुजा बाकरे सांगतात, "अनेक वेळा पालकही तक्रार घेऊन येत. मुलं चीडचीड करतात, कोणाशी बोलत नाहीत. लक्ष देत नाहीत. डोकेदुखी,पोटदुखी अशा शारीरिक तक्रारी करतात. तर आयुष्यात कमालीची अनिश्चितता आल्याने मुलांच्या मनात आत्महत्या तसंच स्वतःला गंभीररित्या दुखापत करुन घेण्याचे विचार येतात, असं मुलं सांगत."
या मुलांचं भावविश्व लॉकडाऊनच्या काळात पार विस्कटून गेलं. त्याकडे मनो-सामाजिक परिणाम म्हणून पाहिलं पाहिजे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मनो-सामाजिक परिणाम म्हणजे?
"सर्वात जास्त परिणाम समाजातल्या उपेक्षित लोकांवर जास्त झाल्याचं दिसून येतंय, आणि या परिणामांची तीव्रता लिंग, धर्म, जात, भौगोलिक ठिकाण, सामाजिक-आर्थिक वर्ग या सर्व घटकांवर अवलंबून आहे. कित्येक कुटुंब गरीबीत ढकलले गेले आणि त्याचा मुलांच्या रोजच्या आयुष्यावर झालेला दिसतो." असं तनुजा बाकरे सांगतात.

फोटो स्रोत, Puneet burnala
"गरीबीमुळे मुलांना आरोग्य सेवा, शिक्षण, घर, आहार, स्वच्छ पाणी, स्वच्छता या आवश्यक गोष्टी मिळणं अवघड गेलं. तर दुसरीकडे घरातला हिंसाचार, भेदभाव मुलांना स्वतः करावा लागला किंवा त्यांना पाहावा लागला. त्यांच्या मनावरला हा आघात मोठा होता. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य समजण्यासाठी त्याची मानसिकताच महत्त्वाची नाही तर त्या व्यक्तीची सामाजिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते."
"कोरोनापूर्व काळात दर पाचव्या सेकंदाला पंधरा वर्षांखालील 1 मूल दगावत होतं. तर पाच पैकी एक मूल कुपोषित होतं. त्यामुळे आरोग्यसेवा, पोषण आहार, विकास हे मुद्दे आधीपासूनच गंभीर रुप धारण करून होते. लॉकडाऊनपूर्वी उपेक्षित कुटुंबांची स्थिती आधीच वाईट असल्याने नंतर ती बिकट होत गेली."
हे नमूद करत त्या पुढल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधतात. "शाळागळती, बळजबरीने बालमजूरी, बालविवाह, शोषण, पोषण आहार तसंच मूलभूत गोष्टी न मिळणं याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार आहे."
कोव्हिडचा काळ सुरू होऊन दिड वर्षं लोटून गेलंय. काही ठिकाणी निर्बंधांसह शाळा सुरू होतायत. पूर्वीसारखं आयुष्य जगण्यासाठी या किशोरवयीन मुलांना पोषक वातावरण उपलब्ध करुन देणं हे सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























