गणेशोत्सव : गणपती बाप्पांच्या आरतीच्या वेळी सॅनिटायझर वापरणं खरंच धोक्याचं आहे का?

फोटो स्रोत, Ani
- Author, ऋजुता लुकतुके,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
सॅनिटायझर आणि मास्क या सध्या आपल्या दैनंदिन गरजा आहेत. बाहेर पडताना या दोन्ही गोष्टी आपण जवळ बाळगतोच.
आता गणेशोत्सव जवळ आला असतानाही कोव्हिडचे नियम पाळूनच हा सण आपल्याला साजरा करायचा आहे. मास्क ठिक आहे. पण, गणेशोत्सवाच्या काळात सॅनिटायझर सुरक्षित आहे का?
अलीकडे वॉट्सॲपवर किंवा इतर सोशल मीडियावर एक संदेश फिरतो आहे. गणेशाच्या आरतीच्या वेळी हातावर सॅनिटायझर असेल तर दिव्याला नमस्कार करताना हात पेट घेऊन भाजू शकतो.
किंवा गणपती बसलेल्या घरी किंवा सार्वजनिक मंडपात सॅनिटायझरच्या बाटल्या अग्नीच्या संपर्कात आल्या तरी अनर्थ होऊ शकतो. तेव्हा गणेशोत्सवाच्या काळात सॅनिटायझर जपून वापरा किंवा वापरु नका.
पण, या संदेशात नेमकं किती तथ्य आहे हे जाणून घेऊया.
गणेशोत्सव आणि सॅनिटायझर
गेल्यावर्षी, अनेक मूर्तीकारांनी सॅनिटायझर गणपती घडवला. गणेशाची ही मूर्ती एखादी कळ दाबताच सॅनिटायझरचा फवारा करायची. थोडक्यात श्रीगणेशाकडून प्रसाद म्हणून तुम्हाला सॅनिटायझर मिळायचं. कारण, सॅनिटायझर वापरणं आवश्यक आहे असंच सरकार आणि कज्ज्ञांचं सांगणं होतं.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झालेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही कोरोनाची नियमावली सांभाळून बाप्पा बसवायला परवानगी मिळालीय. पण, या नियमावलीतलाच एक घटक म्हणजे हात वारंवार सॅनिटाईझ करणे किंवा स्वच्छ करणे. पण, तज्ज्ञांच्या मते गणेशोत्सवाच्या काळात सॅनिटायझर वापरणं धोक्याचंही ठरू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
आतापर्यंत सोलापूर, नागपूर आणि पुण्यात अग्निशमन दलाचे अधिकारी आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाने काढलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गणपतीची आरती करताना सॅनिटायझर न वापरण्याचा आणि जवळ न बाळगण्याची सूचना केलीय. त्यांच्या मते,
सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं. आणि हातावर सॅनिटायझर असताना हात आरती जवळ गेला तर हात पेट घेण्याची शक्यता असते
घरात किंवा मंडपात सॅनिटायझरच्या बाटल्या पडलेल्या असतील आणि कुणाचं लक्ष गेलं नाही तर नकळत छोटी-मोठी आग लागण्याचे प्रसंग धडू शकतात.
सॅनिटायझरमुळे लागणाऱ्या आगीला रंग नसतो. त्यामुळे आग लगेच लक्षातही येत नाही
थोडक्यात, बाप्पासमोर सॅनिटायझर वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. पण, सॅनिटायझर खरंच इतकं धोकादायक आहे का?
बाप्पांच्या आरतीच्या वेळी सॅनिटायझर नकोच?
सॅनिटायझरमध्ये 70% इथाईल अल्कोहोल, 10% ग्लिसरिन, 5% प्रोपिलिन ग्लायकोल, 5% ट्राय इथलोमाईन आणि उर्वरित 5% सुवासिक पाणी असतं. तसं सॅनिटायझर हातावरून काही सेकंदात उडून जातं. पण, ते हातावर असेल तर त्यातल्या अल्कोहोलच्या प्रमाणामुळे ते ज्वालाग्राही असतं. आणि म्हणूनच तबकातल्या आरतीवर आपण हात फिरवतो तेव्हा ते पेट घेऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतल्या नानावटी रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर राहुल तांबे हे सुरुवातीपासून कोव्हिडच्या काळात घ्यायच्या काळजीविषयी जनजागृती करत आहेत. त्यांच्या मते, सॅनिटायझर वापरताना लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
"बाजारात मिळणारे 90% सॅनिटायझर हे अल्कोहोल वापरून केलेले असतात. पण, कोरोनापासून बचाव करण्याची त्यांची क्षमता चांगली असल्यामुळे तज्ज्ञही हेच सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देतात. पण, गणपती किंवा नवरात्री सारख्या सणांना आपण काळजी घेतली पाहिजे. अनेकांना सॅनिटायझर हवेत फवारण्याची किंवा बसण्यापूर्वी खुर्ची, खुर्चीचं हँडल यांनाही सॅनिटायझर लावण्याची सवय असते. सणांच्या काळात एखादी उदबत्तीही आगीला निमंत्रण ठरू शकते. सॅनिटायझर किती ज्वालाग्राही आहे हे प्रमाणावर अवलंबून आहे. जर हातावर कमी प्रमाणात लावलं असेल तर आगीच्या संपर्कात आल्यावर फक्त चटका बसेल. पण, जर सॅनिटायझरचं प्रमाण जास्त असेल ते जास्त जागेवर फवारलं असेल तर हानी मोठी असू शकते." डॉ. तांबे यांनी आपला मुद्दा समजावून सांगितला.
सॅनिटायझरचा अतिवापर होतोय का?
कोव्हिडच्या काळात मागच्या दीड वर्षांत मास्क आणि सॅनिटायझर या दोन अत्यावश्यक गोष्टी झाल्यात.
कापडी मास्क अधूनमधून धुण्याची आणि जुने मास्क टाकून देण्याची काळजी आपण घेतो. पण, सॅनिटायझर हे शेवटी केमिकल आहे. त्याचा जर अतिवापर झाला तर तो त्वचेला अपायकारक नाही का? असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे?
त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रैना नाहर यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये सॅनिटायझरच्या अतीवापरामुळे हात कोरडे पडणारे, हात लाल झालेले लोक बघितले आहेत. म्हणूनच त्या सल्ला देतात निदान घरी असताना सॅनिटायझर ऐवजी साबणाने स्वच्छ हात धुण्याचा.

फोटो स्रोत, Getty Images
"सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं. आणि आपल्या त्वचेवर तैलग्रंथींचं जे संरक्षक पटल असतं, आपल्या त्वचेचा सगळ्यात वरचा थर त्यालाच अल्कोहोलमुळे इजा पोहोचते. आणि तसं झालं की, त्वचेतून इतर बॅक्टेरिया किंवा विषाणू आत घुसायला मोकळे होतात. त्यामुळे त्वचेला वेगवेगळी इन्फेक्शन होऊ शकतात. सोरायसिस सारख्या रोगाचं प्रमाणही सॅनिटायझरमुळे वाढलं आहे." डॉ रैना नाहर यांनी सांगितलं.
सॅनिटायझरचा अतिवापर होतोय हे कसं ओळखायचं हे ही त्यांनी सांगितलं.
"जर हाताला सारखी खाज सुटत असेल, हात शुष्क म्हणजे कोरडे वाटत असतील, पुढे पुढे तळहातावर लाल चट्टे येत असतील तर समजा की, त्वचेच्या वरच्या पटलाला इजा झाली आहे. अशावेळी लगेच त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि शक्यतो अल्कोहोल असलेलं सॅनिटायझर वापरू नका." डॉ नाहर यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.
गणेशोत्सवाचे दिवस आहेत. पण, हवेत कोरोनाही आहे. त्यामुळे कोरोनाचे सगळे नियम पाळून यंदा सुरक्षित गणेशोत्सव साजरा करूया.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























