कोरोनाचे 5 पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील होणार : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात?
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास पालिकेकडून इमारत सील करण्यात येणार आहे.
रुग्णसंख्या कमी झाल्याने मुंबई महापालिकेकडून गेल्या काही काळात इमारत किंवा मजला सील करण्यात येत नव्हता. पण आता पुन्हा एकदा पालिकेने ही मोहीम सुरू केली आहे. याबाबत कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. यासंदर्भात आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक घेतली.
सील झालेल्या इमारतींमध्ये घरकाम करणाऱ्या महिला, कामाकाजासाठी बाहेरुन येणारे कामगार अशा कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी नसेल. तसंच या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना देखील अत्यावश्यक काम वगळता बाहेर पडता येणार नाही.
2. 'हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा,' मनसे नेत्याचं आव्हान
दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यावरुन ठाकरे बंधू आमने-सामने आले आहेत. ठाकरे सरकारची परवानगी नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिहंडीचे थर लावण्यावर ठाम आहे. ठाण्यातील मनसेचे शहाराध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
ते म्हणाले, "हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि या मंडप उखडायला. तुम्हाला दाखवतो महराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे ते."
ठाण्यातील भगवती मैदानात मनसेने दहिहंडीचं आयोजन केलं आहे. याठिकाणी मंडप देखील उभारण्यात आला आहे. सोमवारी (30 ऑगस्ट) या प्रकरणी पोलिसांनी अविनाश जाधव आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. यावरुन मनसे अधिक आक्रमक झालेली दिसली.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या आठवड्यात युवा सेनेने नारायण राणे यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. त्यावेळी कोरोना प्रतिबंधक नियम कुठे गेले होते? असा प्रश्नही मनसेने उपस्थित केला आहे.
3. मुस्लीम समाजाला 5% आरक्षण द्या, वंचित बहुजन आघाडीची मागणी
मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण द्या अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी त्यांनी औरंगाबाद येथे आंदोलन केलं. टिव्ही 9 ने याबाबत वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/PRAKASH AMBEDKAR
औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जवळपास दोन तास हे आंदोलन चालले. यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून विभागीय कार्यालयात यासंदर्भात निवेदन देण्यात आलं.
राज्यात आधीच मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राजकारण तापलं असताना वंचित बहुजन आघाडीकडून मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. यावर कार्यवाही करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.
4. 'भारतीय वाद्यांच्या आवाजाचा हॉर्न वापरता येण्यासाठी कायदा आणणार' - नितीन गडकरी
वाहनांच्या हॉर्नचा आवाज बदलण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक नवीन कायदा घेऊन येणार आहे. कर्कश हॉर्नऐवजी भारतीय वाद्यांचं संगीत हॉर्नसाठी वापरता येईल असा कायदा आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गाड्यांचे हॉर्न मधुर आणि सुरेल असावेत यासाठी हा कायदा आणला जाणार आहे. त्यासाठी भारतीय वाद्यांचा आवाज निवडता येऊ शकतो असंही ते म्हणाले. तबला, पेटी या वाद्यांचा आवाज हॉर्नसाठी वापरता येईल का याबाबत कायदा आणला जाणार आहे.
नितीन गडकरी म्हणाले, "मी यापासून अनभिज्ञ होतो. नागपुरात मी अकराव्या मजल्यावर राहतो. माझ्या तेव्हा लक्षात आले जेव्हा रोज सकाळी प्राणायाम करताना कर्कश हॉर्नचा आवाज येतो. कर्कश आवाज बदलण्यासाठी मी हा कायदा आणणार आहे."
5. अनिल परब आज ईडी कार्यालयात हजर राहणार?
परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांना ईडीने आज (31 ऑगस्ट) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात त्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. परंतु आज अनिल परब ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

ईडीने पाठवलेल्या नोटीसीत नेमकी कोणत्या प्रकरणी चौकशी होणार आहे हे स्पष्ट नसल्याने हजर न राहता त्याबाबत विचारणा करण्यात येणार असल्याचे समजते. याबाबत ते ईडीकडून स्पष्टीकरण मागवणार असल्याचे समजते.
या नोटीसीत 'इन्वेस्टीगेशन पार्ट' एवढाच उल्लेख करण्यात आला असून मंगळवारी सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सचिन वाझे प्रकरणातही अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले होते. तसंच नारायण राणे प्रकरणातही त्यांचा कथित व्हीडिओ व्हायरल झाल्याचं समोर आलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























