'जयंत पवार त्यावेळी मला विजय तेंडुलकर घराण्याचा समर्थ लेखक वाटला'- अतुल पेठे

    • Author, अतुल पेठे
    • Role, नाट्य दिग्दर्शक
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

'मित्र जाणे म्हणजे आपणही एका कणाने लोप पावणे होय' असं मी कुठेतरी वाचलं होतं. आज ते प्रत्यक्ष अनुभवायला आलं. जयंत पवार हा माझ्या पिढीच्या नाटकवाल्यांचा जागता आणि जागरूक लेखक होता. 'होता' असं आज या क्षणी म्हणताना मला कष्ट होत आहेत.

त्याच्या हृद्य आठवणी उचंबळून वर येत आहेत आणि त्या मी थांबवू शकत नाही. या लेखाचं स्वरूपही म्हणून तसंच आहे.

जयंतचं नाटक 1987 च्या आसपास वाईमध्ये 'प्रतीक थिएटर्स' आयोजित नाट्यस्पर्धेत सादर झालं होतं. जयंतच्या कथेत येतो तसा अचानक पाऊस आला. त्यामुळे नाटक एका वाड्याच्या चौकात झालं. त्या स्पर्धेला मी परीक्षक होतो.

जयंत पवार लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित 'वंश' हे नाटक पाहाणं हा जबरदस्त अनुभव होता. त्या स्पर्धेत या नाटकाला पहिलं पारितोषिक मिळालं. जयंत तिथं प्रथम दिसला. मुळात त्याला निर्विष हसता यायचं हे आजही लक्षात आहे. नाटकाची विषयबांधणी कशी करायची याचं उत्तम ज्ञान त्याला होतं, हे त्या नाटकावरून स्वच्छ कळत होतं.

जयंतची घट्ट गाठ पुढे थिएटर अकादमीनं आयोजित केलेल्या फोर्ड फाउंडेशन नाट्यकार्यशाळेत पडली. महाराष्ट्रातील आम्ही बारा लेखक सलग तीन वर्षं एकमेकांना भेटत होतो. नाटकं ऐकत होतो आणि घमासान चर्चांना सामोरं जात होतो. त्या कठोर चर्चांचा आम्हा साऱ्यांना फायदा झाला.

जयंत हा अस्सल मुंबईकर. लालबाग परळ हा त्याचा परिचित भाग. तिथल्या माणसांची आयुष्य त्यानं अनुभवली होती. याचा स्पष्ट प्रभाव जयंतनं 'अधांतर' नाटक लिहिलं त्यावेळी दिसला. आमच्या पिढीचं एक महत्त्वाचं नाटक त्यानं जन्माला घातलं. जयंतच्या या नाटकाचं वैशिष्ट्य हे की त्यानं कोसळत्या मुंबईचा नव्वदोत्तरीचा कालखंड त्यात अचूक पकडला.

सूत गिरण्या, कामगार, चाळी, तिथले ताणतणाव, कामगारांचं विस्थापन, दलित पँथर, आंबेडकरी चळवळीचं योगदान आणि स्खलन, अनियतकालिकांची चळवळ, पुरोगामी साहित्य, डाव्यांचे लढे आणि हताशपण, काळानुसार कोसळणारे बदल, जागतिकीकरणाचा प्रभाव, गुंडगिरी, जातपातधर्माचं वाढतं प्राबल्य आणि शहरी भकासपण हा भवताल त्याच्या लेखनाच्या केंद्रस्थानी होता.

'अधांतर' मध्ये हे सारं एकवटून आलं होतं. हे नाटक अफाट गाजलं. जयंत त्यावेळी मला विजय तेंडुलकर घराण्याचा समर्थ लेखक वाटला. या नाटकानंतर तो जास्त जबाबदार लेखक म्हणून ठळकपणे जाणवू लागला.

त्याच्या 'काय डेंजर वारा सुटलाय' या अनिरुद्ध खुटवड दिग्दर्शित नाटकात त्यानं बिल्डर लॉबी, राजकारण आणि जागा हडप करणं यावर प्रखर भाष्य केलं होतं. त्यातील अनिल गवस यांनी मुख्य पात्र फार उत्तमपणे साकारून व्यक्तिरेखा जिवंत केली होती.

पण जयंतनं या पुढची उंची त्याच्या कथालेखनात गाठली. त्याची 'तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य' ही कथा वाचली आणि अचंबित झालो. विविध स्तरांवरची ही कथा अजब आहे. रहस्यकथा या फॉर्मला डोक्यावर उभं करून आधुनिक जाणिवांच्या या कथेनं मला झपाटलंच.

विविध स्तरांवरील माणसांचं स्खलन हा कथेचा गाभा होता. वास्तव आणि अवास्तव यांची बेमालूम सांगड घालत रचलेला रहस्यमय गुंता त्यात होता. प्रत्येक गोष्टीला कारण असतं आणि ते आत्ताच्या अनाकलनीय काळात कुठूनही उद्भवतं हे त्यात सूत्र होतं. ही कथा एखाद्या जायंट व्हील सारखी आहे. मी त्या कथेचा अभिवाचन प्रयोग केला. त्याचे पन्नास प्रयोग केले.

याकाळात जयंतच्या मी अधिक जवळ गेलो. खूप गप्पा झाल्या. त्यानं आणि संध्यानं अतिशय प्रेमानं आम्हाला जेवूखाऊ घातलं. त्याची 'वरणभात लोंन्चा कोन नाय कोंन्चा' ही कथाही अशीच थोर आहे.

कामगारांचं आणि अनुषंगानं त्या संस्कृतीचं उच्चाटन होणं ही किती उन्मळून टाकणारी गोष्ट आहे हे ही कथा वाचताना उमजतं. जयंतच्या कथा या काहीवेळा तर आदिवासी बोधकथेसारख्या मला वाटत. अशा तऱ्हेचं नाटक तो माझ्याकरता लिहीत होता.

त्या नाटकावर कितीतरी चर्चा झाल्या. त्यानं पहिला लिखित खर्डा मला पाठवला. त्यावर घमासान चर्चा झाल्या. त्याची जिद्द अशी की त्यानं दुसरा खर्डा लिहायला घेतला. मनासारखं होईना म्हणून त्यावर कथा लिहून पाहायचं ठरवलं. या साऱ्या प्रवासात त्याला शारीरिक त्रास होत होता पण त्याबद्दल चकार शब्द त्यानं कधी काढला नाही. आज ती नाट्यसंहिता माझ्याजवळ आहे. अजब तर्कट असलेलं ते नाटक मला करायची इच्छा आहे.

जयंतची नाट्यपरीक्षणं म्हणजे तमाम नाटकवाल्यांकरता बिरुद असे. तो नाटकाला किती 'स्टार्स' देतो यावर लोकांचं लक्ष असे. नाटकाचे यथोचित कौतुक करताना तो चुकाही सभ्यपणे दाखवत असे. त्यानं केलेली टीका वाचताना त्यात मत्सर, द्वेष अथवा राग नसल्याचे जाणवे. नाटक करणाऱ्यांविषयी ममत्व राखून तो लेखन करत असे.

नयनतारा सेहेगल यांना आयत्यावेळी साहित्य संमेलनात न बोलावून अपमान केला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली गेली. त्याचा निषेध म्हणून अमोल पालेकरांनी मुंबईत सभा आयोजित केली होती.

त्या सभेत नयनतारा सेहेगल स्वतः हजर होत्या. त्यांच्या सभेत जयंतचं भाषण मुक्त विचार आणि लेखन स्वातंत्र्याच्या विषयी होतं. ते अत्यंत परखड आणि मर्मग्राही होतं. आजच्या काळातील लेखकांपुढची आव्हानं त्यात स्पष्टपणे अधोरेखित केली होती.

जयंतला बोलायला आणि वाचायला कठीण जात होतं म्हणून आयत्यावेळी त्यानं मला ते वाचायला सांगितलं. शिवाजी मंदिरात रंगमंचावर केंद्रस्थानी असलेल्या खुर्चीवर तो शांत बसला होता.

कोपऱ्यात उभा राहून मी त्याचं ते भाषण वाचून दाखवलं. सर्वजण चित्त एकवटून ऐकत होते. जयंतच्या वस्तुनिष्ठ आणि निर्भीड लेखनाला दाद देत होते. ते भाषण अत्यंत कळीच्या प्रश्नांना भिडणारं होतं. माझ्याकरता हा प्रसंग फार हृद्य होता.

'शब्दांची रोजनिशी' हे कदाचित त्यानं पाहिलेलं आणि परीक्षण केलेलं शेवटचं नाटक असेल. आजारी असतानाही तो प्रयोगाला आला. भेटला. बोलला. त्यावेळी आम्हाला आतून खूप भरून आलं. असे मित्र प्रेक्षक म्हणून लाभले तर नाटक करायचं सार्थक होतं.

जयंतला होणारा त्रास मी अनेक वर्षं पाहात होतो. पण त्याचं निघून जाणं पचवायला मला माझी उरलेली वर्षं कमी पडतील.

मित्रा, तुला सलाम.

(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक स्वरुपाची आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)