उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद आणखीनच शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे.
नारायण राणे यांच्या अटकेचं नाट्य घडल्यानंतर आता या वादाचा पुढचा अध्याय समोर येत आहे.
नारायण राणे यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत 25 ऑक्टोबर 2020 रोजी दसरा मेळाव्यात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. ही बातमी ई-सकाळने दिली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधातही एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
सामनाच्या अग्रलेखातून नारायण राणेंवर अनेक आक्षेपार्ह शब्द वापरत टीका करण्यात आली होती. याविरोधातही भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. ही बातमी थोडक्यातने दिली आहे.
2. आसाममध्ये पुजाऱ्यांना 15 हजार रुपये मदत निधी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रार्थनास्थळे गेल्या दीड वर्षापासून बंदच आहेत. त्यामुळे येथील पुजाऱ्यांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावं लागत आहे.
यामुळे पुजाऱ्यांना 15 हजार रुपयांचा मदत निधी देण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे.

फोटो स्रोत, facebook
मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राज्यातील कोरोनाबाधित हिंदू पुजारी आणि छोट्या मंदिरांना 15 हजार रुपये देण्याची घोषणा केली.
या निर्णयाचं हिंदू जनजागृती समितीने स्वागत केलं असून महाराष्ट्रातही हा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ही बातमी लोकमतने दिली.
3. 'चलनीकरण कशाला म्हणतात, हे राहुल गांधींना माहिती का?'
सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषित करण्यात आलेल्या 'नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाइन' (NMP) कार्यक्रमानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती.
यावर अर्थमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

फोटो स्रोत, Getty Images
"चलनीकरण कशाला म्हणतात हे राहुल गांधींना समजतं का?" असा प्रश्न विचारत सीतारामन यांनी टोला लगावला आहे.
काँग्रेस सरकारनं 8 हजार कोटी रुपये गोळा करण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं मॉनेटायझेशन केलं.
2008 साली नवी दिल्ली रेल्वे स्टेशनसाठी विनंती प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले. स्टेशनसाठी RFP कुणी मागवलं होते? आता त्याचे हक्क 'जीजाजीं'च्या ताब्यात आहेत का?', असा सवाल सीतारामन यांनी विचारला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
4. वैद्यकीय रजेवर असताना गणवेशात येऊन वाद घालणारा पोलीस अधिकारी निलंबित
वैद्यकीय रजेवर असतानाही गणवेशात येऊन हॉटेल मालक आणि मॅनेजर यांच्याशी वाद घातल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, facebook
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक मिलन मुरकुटे असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.
मुरकुटे हे नियंत्रण कक्ष येथे नेमणुकीस होते. मात्र, 21 ऑगस्ट 2021 पासून ते वैद्यकीय रजेवर होते. परंतु 24 ऑगस्ट 2021 रोजी ते रजेवर असताना देखील पुणे पोलीस आयुक्तालयातील मुंढवा येथी हॉटेल कार्निव्हल येथे पोलीस गणवेशात जाऊन हॉटेल मालक आणि मॅनेजरशी हुज्जत घातली.
पुणे पोलिसांनी ही माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिल्यानंतर त्यांनी मुरकुटे यांचं निलंबन केलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. खासगी क्षेत्रात आरक्षण, शासनाकडे अहवाल सादर करणार - प्रणिती शिंदे
"खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यासाठी आम्ही शासनाकडे अहवाल सादर करणार आहोत," अशी माहिती काँग्रेस आमदार आणि अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.
आमदार प्रणिती शिंदे आज अनुसूचित जाती कल्याण समितीच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याबाबत आम्हाला अनेक निवेदनं आले आहेत. याबाबत आम्ही माहिती घेतली आहे. खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यासाठी आम्ही शासनाकडे अहवाल सादर करणार आहोत," असे प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























