नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेचे 5 अर्थ

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाही. तुमच्या प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सगळ्यांना मी पुरुन उरलो आहे," असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला पुन्हा आव्हान दिलं, पण याच वेळी ते म्हणाले इथून पुढे जपून बोलणार आहे.

मंगळवारी (24 ऑगस्ट) झालेली अटक आणि नंतर मिळालेला जामीन या राजकीय नाट्यानंतर नारायण राणे यांनी आज (25 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली.

या संपूर्ण परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन टीका केली नाही.

त्यामुळे नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील विधानांचा नेमका अर्थ काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्याचबरोबर ठाकरे सरकारसमोर नारायण राणे कोणती आव्हानं उभी करू शकतात? देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन स्वीकारेन असं राणे यांना का म्हणावं लागलं? या प्रश्नांचीही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला.

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेचे 5 अर्थ कसे लावता येतील?

1. थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेणं टाळलं

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वितुष्ट जगजाहीर आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर तर नारायण राणेंनी ठाकरे कुटुंबावर आरोप किंवा टीका करण्याची आतापर्यंत एकही संधी सोडली नाही असं दिसून येतं.

काही महिन्यांपूर्वीपासून तर दिशा सॅलियन मृत्यू प्रकरण आणि कोरोना आरोग्य संकटातही राणे पिता-पुत्र सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दिसत होते. पण नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मात्र उद्धव ठाकरेंचं एकदाही नाव घेतलं नाही.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि ठाकरे सरकारकडून थेट नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यात आली. 24 तासांत राणेंना अटक झाली आणि त्याच रात्री जामीन मिळाला.

हा घटनाक्रम पाहता नारायण राणे आज उद्धव ठाकरे यांच्यावर बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण तसे काही घडले नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी 'महाशय' हा शब्द वापरला. 'मुख्यमंत्री' असाच उल्लेख केला

ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "नारायण राणे यांचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे तसंच कोर्टाने राणेंवर काही मर्यादा आणल्या आहेत. ते अशी वक्तव्य करू शकणार नाहीत. म्हणून त्यांनी थेट नाव घेणं टाळलं असावं."

नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टानं 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेबरला रायगडच्या पोलीस अधीक्षकांकडे हजारी लावण्याचे आदेश दिलेत, तसंच नारायण राणे यांना भविष्यात असं वक्तव्य न करण्याची ताकीद कोर्टानं दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, AFP

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "जे.पी नड्डा वगळले तर राणेंना केंद्रातून इतर कोणत्याही बड्या नेत्याचा पाठिंबा मिळाला नाही. आजही पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे प्रमुख नेते नव्हते. त्यामुळे राणेंना अशा वक्तव्यांबाबत पक्षाकडून समज दिली गेली असावी. देंवेंद्र फडणवीस यांनीही नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही असं म्हटलं होतं."

2. वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणेंनी टोकाची टीका करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. पण तरीही उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर कारवाई केली.

शिवसेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल पण नारायण राणे यांना अटक करेल असं वाटलं नव्हतं, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे नारायण राणे सुद्धा यासर्व प्रकरणाबाबत सविस्तर आणि स्पष्ट बोलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण पत्रकार परिषदेत त्यांनी या संपूर्ण वादावर कोणतही अधिक भाष्य करणं टाळलं.

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी याविषयी फार काही बोलणार नाही असं राणेंनी सुरुवातालाच स्पष्ट केलं होतं. पण ठाकरे सरकारवर पलटवार करण्यासाठी नारायण राणे कालच्या घटनाक्रमाबद्दल काहीतरी बोलतील, असा अंदाज असूनही त्यांनी या वादावर पडदा टाकणंच पसंत केलं.

3. ठाकरेंसमोर कोणती आव्हानं उभी करू शकतात?

नारायण राणेंची आजची पत्रकार परिषद तुलनेने मवाळ असली तरी नारायण राणे यांनी आपल्या बोलण्यातून शिवसेनेच्या अनेक नेत्यांना थेट आव्हान दिलं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मी 17 सप्टेंबरनंतर उत्तर देईन असं राणे म्हणाले. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी संपादकीय लिहितात असंही ते म्हणाले.

सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांचा गँगस्टर असा उल्लेख करण्यात आल्याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, "मी गँगस्टर होतो तर मला शिवसेनेने मुख्यमंत्री का केलं? आता जे मंत्री आहेत ते पण मग असेच असतील."

शिवसेना

फोटो स्रोत, facebook

शिवाय त्यांनी पुन्हा एकदा दिशा सॅलियन प्रकरणाचा उल्लेख केला. कोणत्या मंत्र्याचा यात सहभाग आहे?, पूजा चव्हाण प्रकरणाचा छडा लावणार असं म्हणत राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही स्पष्ट सांगितलं.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आहेत की अनिल परब असा टोला राणे यांनी लगावला. अनिल परब यांच्या सीडीचाही त्यांनी उल्लेख केला.

त्यामुळे आता शिवसेनेचे मंत्री, नेते आपल्या रडारवर असतील असे संकेत त्यांनी दिले.

4. डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न?

परिषदेच्या सुरुवातीलाच राणेंनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. पक्षश्रेष्ठींनी केंद्रीय मंत्र्यांना जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सांगितल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं.

लोकांमध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती पोहचवणार असल्याचंही राणे म्हणाले. त्यामुळे भाजपने केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्यानंतर राणेंना झालेली अटक आणि जामीन यामुळे पक्षाच्या प्रतिमेला निश्चितच धक्का पोहचू शकतो, असंही हेमंत देसाई सांगतात.

नारायण राणे, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

तसंच आपल्या तोंडून निघालेलं वक्तव्य देशप्रेमामुळे होतं असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. "देशाचा स्वातंत्र्य दिन ज्याला माहीत नाही त्यामुळे माझ्या तोंडून ते वाक्य आलं. आता जपून पावलं टाकली पाहिजेत. परवापासून जनआशीर्वाद यात्रा सुरू करणार."

5. 'देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन स्वीकारेन'

नारायण राणे ज्या कोणत्या पक्षात प्रवेश करतात तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ज्येष्ठतेनुसार त्यांच्या काही महत्त्वाकांक्षा सुद्धा असतात.

देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचं वक्तव्य चुकीचं होतं असं म्हटलं असलं तरी मी काही चुकीचं बोललो नाही, असं राणे म्हणाले. पण मी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन स्वीकारेन असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "असं बोलण्याशिवाय नारायण राणे यांच्याकडे दुसरा पर्याय काय आहे? देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींचे विश्वासू आहेत. मोदी यांच्या मान्यतेमुळे राणे पक्षात असून त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं आहे. ते राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना जाहीरपणे तरी हे मान्य करावेच लागेल."

गोपीचंद पडळकर यांनी जेव्हा शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली तेव्हा त्यांनाही समज दिल्याचं फडणवीस म्हणाले होते. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इथल्या प्रक्रिया आणि नियम मान्य करावं लागेल असंही पक्षाकडून अनेकदा सांगण्यात येतं असंही हेमंत देसाई सांगतात.

ते म्हणाले, "राजकारणात राहणे ही नारायण राणे यांची अपरिहार्यता आहे. ते आता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाहीत. तेव्हा भाजपशी जुळवून घेण्याशिवाय त्यांच्याकडेही पर्याय नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)