भगतसिंह कोश्यारी: '12 आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का आग्रह धरता' #5मोठ्या बातम्या

भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, विधानपरिषद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भगतसिंह कोश्यारी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का आग्रह धरता- राज्यपाल

बारा सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का आग्रह धरता? अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं.

काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी बारा सदस्यांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली असता राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी राज्यपाल पुण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार गिरीश बापट यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

अचानक रणपिसे यांनी राज्यपालांना यासंदर्भात विचारलं. त्यावेळी मागेच उभ्या असलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवून राज्यपाल म्हणाले, "हे माझे मित्र आहेत. सरकार यासंदर्भात आग्रह धरत नाही तर तुम्ही का धरता?" असा सवाल राज्यपालांनी केला. राज्यपालांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सूचक हास्य केलं. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आहे. या विषयावर नंतर बोलेन असं उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं.

2. इथं प्यायला पाणी नाही आणि नावं कसली बदलता- इम्तियाज जलील

"या शहराचा खूप विकास करा. त्याला फाईव्ह स्टार कॅटेगिरित आणा. पण इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता"? असा सवाल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव बदलून ते संभाजीनगर केले जावे अशी मागणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष आघाडीवर आहेत.

सत्तेत नसताना विशेष रुपाने शिवसेनेकडून ही मागणी केली गेली होती. भाजप तसेच शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी आजही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात.

औरंगाबाद
फोटो कॅप्शन, औरंगाबाद का संभाजीनगर?

दरम्यान औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे करण्यासाठी हीच अनुकूल वेळ आहे असं मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

काही तांत्रिक समस्या असून त्यावर लवकरच तोडगा निघेल असेही ते पुढे म्हणाले. या पूर्वी विभागीय आयुक्तांकडे नामांतराबाबतचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हे पाहता आता औरंगाबादचे संभाजीनगर असे नाव करण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरच राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल असे ते म्हणाले.

3. वादग्रस्त वक्तव्यानंतर दत्तात्रय भरणेंकडून दिलगिरी

सोलापूरमधील एका कार्यक्रमात दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा वादंग निर्माण झाला.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्याची सुरुवात प्रभाग क्रमांक पाचमधील देगाव रोड येथील 43 एकर जागेवर मनपा गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतून झाली. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला.

आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचं भरभरुन कौतुक केलं. त्यांना मुख्यमंत्री व्हा अशा शुभेच्छा दिल्या.

त्यावर पालकमंत्री भरणे यांनी, "चंदनशिवेदादा मला खूप कांही मिळालं आहे.म्हणून तुम्हाला काय द्यायचं आहे तो आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या, असं आवाहन केलं. तर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी एका प्रकल्पासाठी भरणे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे निधी मागा, अशी मागणी केल्यानंतर 'मुख्यमंत्री जाऊद्या मरू द्या...हे काम आपलं आपण करू, नंतर मुख्यमंत्र्यांकडे मोठा निधी मागू", असं वक्तव्य केले. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच पालकमंत्री भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटलं.

4. भारत-इंग्लंड कसोटी रंगतदार अवस्थेत

भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथे सुरू असलेली दुसरी कसोटी रंगतदार टप्प्यावर आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 364 धावा केल्या.

इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल खेळताना 391 धावांची मजल मारली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर 181/6 केल्या आहेत. भारतीय संघ 154 धावांनी आघाडीवर आहे.

पाचव्या आणि अंतिम दिवशी तिन्ही निर्णय शक्य आहेत. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

भारत, इंग्लंड, लॉर्ड्स

फोटो स्रोत, Gareth Copley

फोटो कॅप्शन, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा

दुसऱ्या डावात राहुल-रोहित झटपट बाद झाले. विराट कोहलीने 20 धावा करून तंबूत परतला. मात्र अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी चौथ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी करत डाव सावरला.

पुजारा 45 धावा करून बाद झाला. रहाणेने 61 धावांची सुरेख खेळी केली. रवींद्र जडेजाही झटपट माघारी परतला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत 14 तर इशांत शर्मा 4 धावांवर खेळत आहेत.

मालिकेतली पहिली कसोटी अनिर्णित झाली होती. या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला आव्हानात्मक लक्ष्य देऊन नंतर त्यांचा डाव गुंडाळण्याची संधी भारतीय संघासमोर आहे.

दुसरीकडे भारताचा डाव गुंडाळून लक्ष्य गाठण्याचा इंग्लंडचा निर्धार आहे. ठरलेल्या योजनेनुसार खेळ न झाल्यास दोन्ही संघ अनिर्णित निर्णयावर समाधान मानू शकतात.

5. पवनदीप ठरला इंडियन आयडॉल

पवनदीप राजन इंडियन आयडॉल 12 स्पर्धेचा विजेता ठरला. पवनदीपसह अरुणिता कांजिलाल, निहाल टोरो, सायली कांबळे, मोहम्मद दानिश आणि षण्मुखप्रिया या स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली होती.

पवनदीपने बाजी मारत जेतेपदावर नाव कोरलं. 25 लाख रुपये आणि स्विफ्ट कार बक्षीस मिळालं. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

इंडियन आयडॉल

फोटो स्रोत, Sony TV PR

फोटो कॅप्शन, पवनदीप राजन आयडॉल12 चा विजेता ठरला.

ग्रँड फिनालेला अनू मलिक, सोनू कक्कर, हिमेश रेशमिया या जजेसच्या बरोबरीने उदित नारायण, अलका याग्निक, कुमार सानू, विशाल दादलानी, मिका सिंह, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, जय भानूशाली, खली, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी हे उपस्थित होते.

बारा तासांच्या ग्रँड फिनालेत विजेत्याची घोषणा करण्यात आली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)