महाराष्ट्र पाऊस: 'ज्या मुलाने आम्हाला पळा पळा म्हणून ओरडून आवाज दिला, तोच गेला'

अश्विनी मोहिते

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

फोटो कॅप्शन, अश्विनी मोहिते
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी, चिपळूणहून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

22 जुलैची रात्र ... कोकणात पावसाने थैमान घातलं होतं. रात्री साधारण 10.30 ते 11 ची वेळ होती. खेडपासून साधारण 30 किलोमीटर पोसरे खुर्द गावात दरड कोसळली. आठ घरं दरडीखाली गेली. आसपासच्या शहरात पूर आल्यामुळे दुसर्‍या दिवशी 'एनडीआरफची' टीम गावांत पोहचली. रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं.

पूर ओसरल्यानंतर आम्ही खेड तालुक्यात पोहचलो.

"16 मृतदेह बाहेर काढले आहेत. 1 वयस्कर महिला सापडली नाही. तिला मृत घोषित केलं आहे. 'रेस्क्यू ऑपरेशन' थांबवलं आहे. आता मदतीचं काम सुरू आहे". खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे मला फोनवर सांगत होत्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड, लाल मातीचा चिखल, कुठतरी साचलेलं पाणी यातून वाट काढत आम्ही खेड तालुक्यातील 'पोसरे खुर्द' गावाकडे निघालो. गाडीच्या खिडकीतून उंच हिरवेगार डोंगर दिसत होते. मधेच कुठेतरी छोटी कौलारू घरं, पांढरं शुभ्र वाहणारं पाणी... डोळ्यांना सुखावणारं निसर्गरम्य चित्र दिसत होते. पण या निसर्गाच्या पोटात अनेकांचे संसार गाडले गेले होते. आम्ही गावापासून अगदी काही अंतरावर होतो.

आमच्या बाजूने राजकीय पक्षाचे 'स्टीकर' लावलेल्या गाड्या वेगाने पुढे जात होत्या. या गाड्यांवर मदतीचा हात हे बॅनर झळकत होते. काही गाड्या मदत पोहचवून परतीसाठी निघाल्या होत्या. त्यातले काहीजण हिरव्यागार गवतात, पाण्यात फोटो काढत होते. काही वेळात आम्ही 'पोसरे खुर्द' गावांत पोहचलो.

गावात प्रवेश केल्यानंतर पोलीस, तहसीलदार, प्रांत अधिकारी, पंचायत समितीचे सदस्य घटनास्थळी उपस्थित होते. काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, मदत देण्यासाठी आलेल्या गाड्यांचीही गर्दी होती. त्यातून वाट काढत आम्ही घटनास्थळी पोहचलो.

पोसरे गाव

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

मातीचे मोठमोठे ढिगारे पडले होते. वरच्या डोंगरावरची माती वाहून गेली होती. एकच लाल मोठा दगड असल्यासारखा पोकळ डोंगर दिसत होता. पावसाने खाली चिखल झाला होता. "हे मातीचे ढिगारे आहेत ना तिथे आठ घरं होती. सगळी ढिगाऱ्याखाली गेली". काही सरकारी अधिकारी सांगत होते. इथून वाचलेली लोकं कुठे आहेत? आम्ही विचारल्यावर त्यांनी मागच्या दिशेला बोट दाखवलं. आम्ही घटनास्थळाचं शूट करून तिथल्या लोकांशी बोलायला गेलो.

गावातल्या एका शाळेत या लोकांना ठेवलं होतं. तिथेही गर्दी होतीच. कॅमेरा आणि माईक बघून अनेकजण आमचे फोटो काढा. आम्ही इतकी मदत दिली, आम्ही मदतीसाठी किती लांबून आलो आहे हे सांगू लागले. आम्ही त्यांना टाळून घरं उध्वस्त झालेल्या माणसांना शोधू लागलो.

सुदेश मोहीते

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

फोटो कॅप्शन, सुदेश मोहीते

एका कोपर्‍यात हातात 3-4 वर्षाच्या मुलाला घेऊन एक व्यक्ती उभी होती. कोरडेपणा येऊन लाल झालेले डोळे, दु:खाने आणि चिंतेने ओढला गेलेला चेहरा आणि शून्यात असलेली नजर ... हे सुदेश मोहिते.. पूर्ण कुटुंब गेलं यांचं.. कोणीतरी मागून सांगत होतं. सुदेश मोहिते उभे होते.

त्यांच्या जवळ गेल्यावर ते बोलू लागले, "त्या दिवशी खूप पाऊस होता. रात्री जेवण करून सगळे झोपले होते. साधारण 11 वाजले असतील. मी जागा होतो. तेवढ्यात खूप जोरदार आवाज आला. घरावर दगड माती पडली होती. घरच्यांना आवाज दिला. माझ्या चार वर्षाच्या लहान मुलाला घेऊन मी बाहेर पळालो. मागे वळून पाहिलं तर सगळी घरं माती खाली गेली होती. आमची सगळी माणसं ढिगाऱ्याखाली सापडली होती. आई, वडील, बहीण, भाऊ, बायको, माझा मोठा मुलगा सगळे गेले." कडेवरच्या लहान मुलाला सावरत, दुखा:चा आवंढा गिळत ते सांगत होते.

सुदेश यांच्या बाजूला एक लहान मुलगी घुटमळत होती. राणी तिचं नाव... तिला या घटनेचा मोठा धक्का बसला होता. विषय बदलण्यासाठी मी विचारलं कितवीत शिकतेस ? आठवीत.. तिने उत्तर दिलं. ती पुढे सांगू लागली. "माझा मोठा भाऊ मामाकडे गेला होता. त्याला सोडायला मामा आमच्या घरी आला. मग मला थोडं दिवसांसाठी घेऊन गेला. मी तिकडेच होते. इकडची सगळी कामं झाल्यावर आई पण मामाकडे येणार होती. पण......" राणीच्या डोळ्यात पाणी आलं आणि बोलताना ती तिथेच थांबली.

पोसरे गाव

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

आम्ही त्या शाळेच्या बाहेर आलो. सरकारी गाड्यांची गर्दी वाढली होती. आम्ही अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण काही अधिकारी त्यांना गाड्यांमध्ये बसवून कुठेतरी घेऊन जायची घाई करू लागले. मंत्री महोदय पोहचत आहेत. चला लवकर गाडीत बसा. आम्ही बोलत असलेल्या लोकांपैकी जवळपास सगळ्यांना अधिकार्‍यांनी गाडीत बसवलं. अश्विनी मोहीते एकट्याच उरल्या.

पोसरे गाव

फोटो स्रोत, BBC/ShahidShaikh

अश्विनी मोहिते यांनी या दुर्घटनेत त्यांचा मोठा मुलगा गमावला होता. 29 वर्षांची सून विधवा झालेली बघवत नाही. हे सांगून त्या रडत होत्या. ज्या मुलाने आम्हाला पळा पळा म्हणून ओरडून आवाज दिला, तोच गेला. आम्हीही अडकलो होतो. पण नशिबाने वाचवलं. आम्हाला लोकांनी जिवंत बाहेर खेचलं. पण मुलगा गेला. ती घटना त्यांच्या डोळ्यासमोरून जाणं कसं अशक्य आहे हे जाणवत होतं. तुम्ही नाही जाणार मंत्र्यांना भेटायला? मी विचारल्यावर त्या म्हणाल्या, माझं यादीत नाव नाहीये. ज्यांचं आहे त्यांना बोलवलं आहे.

तोपर्यंत मंत्री, स्थानिक आमदारांचा ताफा पोहचला होता. पीडितांना काही हजारांचे चेक वाटण्यात आले. त्यांचं सांत्वन करून 15-20 गाड्यांचा ताफा चिखल उडवत निघून गेला. हातात पडलेल्या मदतीकडे पाहत सगळी माणसं पुन्हा शाळेकडे निघाली. उध्वस्त झालेल्या घरानंतर गावातली शाळा हाच त्यांचा आसरा होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)