HSC Result: बारावीचा निकाल कधी जाहीर होणार?

HSC Result: बारावीचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर होणार?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बारावीचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर होणार?
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्याने एचएससीचा निकाल कधी जाहीर होणार? असा प्रश्न बारावीचे लाखो विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत. एचएससी बोर्डानेकडून अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

बारावीचा निकाल जुलै अखेपर्यंत जाहीर करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षण मंडळांना केली होती. परंतु राज्यात सलग आठवडाभर पाऊस सुरू होता, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी, दुर्घटना झाल्याने शिक्षकांचे निकालाचे काम रखडले.

पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकण अशा अनेक भागांत वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयात पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे बारावीच्या मूल्यमापनाचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण झालं नाही असं शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे गुण बोर्डाच्या संगणक प्रणालीमध्ये भरण्यासाठी एचएससी बोर्डाकडून शिक्षकांना मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एचएससीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी माहिती बोर्डाकडून बीबीसी मराठीला देण्यात आली.

मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in येथे तसेच mahresult.nic.in या संकेतस्थळावर एचएससीचा निकाल पाहता येईल.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एचएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केली आणि अंतर्गत मूल्यमापनाचे काम 23 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शिक्षकांना दिले होते.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा डेटा भरुन झाला आहे. बोर्डाकडे सर्व माहिती पोहचली आहे. त्यामुळे बोर्डाच्या विभागीय मंडळात निकाल जाहीर करण्याची पर्व तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांत निकाल जाहीर होईल."

अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. पण या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी इंटरनेट, वीज खंडित झाली होती. वाहतुकीची साधने नसल्यामुळे आणि वाहतुकीची कोंडी असल्याने शिक्षक शाळा-महाविद्यालयात पोहचू शकत नाहीत किंवा उशिराने पोहचत आहेत. त्यामुळे निकालाच्या प्रक्रियेत व्यत्यय आला.

शिक्षण मंडळाने बारावीचे गुण भरण्यासाठी 14 ते 21 जुलै अशा तारखा दिल्या तरी त्यात रविवार व आषाढी एकादशी, बकरी ईद या सुट्ट्यांचा विचार केला नाही अशी टीका शिक्षकांकडून केली जात आहे.

विद्यार्थिनी

फोटो स्रोत, BBC/shahid sheikh

फोटो कॅप्शन, विद्यार्थिनी

दरम्यान, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरी इंजिनीअरिंग, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र अशा अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बारावीत किमान गुण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष बारावीच्या निकालाकडे लागलं आहे.

कसा जाहीर होणार निकाल?

7 ते 23 जुलैपर्यंत शिक्षकांना आपआपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण करायचे आहे.

14 ते 21 जुलैपर्यंत प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केल्यानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण एचएससी बोर्डाच्या संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड करायचे आहेत.

निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images

कनिष्ठ महाविद्यालयाने गुण अंतिम केल्यानंतर सीलबंदपद्धतीने ते विभागीय मंडळांकडे 23 जुलैपर्यंत पाठवण्यात आले. .

ही प्रक्रिया झाल्यानंतर बोर्डाकडून अंतिम निकालपत्र तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल.

मूल्यमापनाचा तपशील

एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रमाणे 30:30:40 फॉर्म्युल्यानुसार होणार आहे.

दहावीचे 30% गुण, अकरावीचे 30% गुण आणि बारावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे 40% गुण या आधारावर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल घोषित केला जाईल.

11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%)

12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%)

दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)