शेती: विदर्भातल्या काही भागात दुबार पेरणीचे संकट, कशी आहे पावसाची स्थिती?

पेरणी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी, अमरावतीहून
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अपुऱ्या पावसामुळे विदर्भातील अमरावती विभागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पावसाचा खंड आणि विखुरलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. सुरुवातीलाच काही भागात 100 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील पळसखेड गावातील शेतकरी उत्तम शेलोकार यांनी 5 एकरात सोयाबीनची लागवड केली. बियाणे धरून पेरणीसाठी 50 हजाराचा खर्च आला.

जोरदार पाऊसही झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पेरलेलं अंकुर फुटलेच नाही. आता त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आहे.

शेलोकार म्हणतात "आता दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. पेरलेलं शेत मोडून पुन्हा सोयाबीनची लागवड करावी लागेल. कारण पावसाच्या आठवडाभऱ्याच्या विश्रांतीनंतर जमिनीवरचा भाग डांबरासारखा कडक झाला आहे. त्यावर ओलावा नसल्यामुळं जमिनीतील बियाणं जमिनीतच सडली."

"काही ठिकाणी अंकुर फुटलेत ते कामाचे नाही. आता पाऊस येऊनही फायदा नाही. त्यावर अंकुर फुटणे कठीण आहे. त्यामुळं हे सगळं मोडून पुन्हा सोयाबीनची पेरणी करावी लागेल. नाहीतर तुरीच्या लागवडीसाठी वाट बघावी लागेल.

"दुबार पेरणींनंतरही सरासरी पीक येईल याची शक्यता नाही. निसर्गापुढं आम्ही हात टेकले," असं शेतकरी शेलोकार हतबल होत सांगतात.

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे.

अमरावती विभागात 10 जूनला मोसमी पावसाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत सरासरीच्या 205 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

त्यात बुलढाणा 183.5 MM, अकोला 95.3 MM, वाशिम 241.0 MM, अमरावती 215.5 MM आणि यवतमाळ जिल्ह्यात 292.3 MM पावसाची नोंद आहे.

शेती, शेतकरी, पाऊस, पेरणी
फोटो कॅप्शन, पेरणी

विभागात सरासरी खरीप हंगाम क्षेत्र 32.28 लाख हेक्टर असून तुलनेत 23.29 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. विभागात ऐकून 72.2 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

बुलढाणा 5.14 लाख हेक्टर (70 %), अकोला 2.16 लाख हेक्टर (44.8 %) वाशिम 3.57 लाख हेक्टर (87.9 %) अमरावती 4.35 लाख हेक्टर (63.2 %) यवतमाळ 8.07 लाख हेक्टर (88.1 %)

आकडेवारीनुसार अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. अकोला जिल्ह्यात पावसाअभावी 56 टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत.

शिवाजी कृषी विद्यापीठाचे निवृत्त कृषी शास्त्रज्ञ राजेंद्र जाणे यांच्यामते "जे शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत ते 15 जुले पर्यंत पेरणी करू शकतात. पण पेरण्यासाठीही त्यांनी आणखी 100 MM पावसाची गरज आहे.

"मात्र ज्यांच्या पेरण्या झाल्या आहेत त्यांना आठवडाभरात पावसाची नितांत गरज आहे. कारण सध्या सोयाबीन ऑक्सिजन वर आहे."

शेती, शेतकरी, पाऊस, पेरणी
फोटो कॅप्शन, पेरणी

"अंकुर फुटलेल्या सोयाबीनला नवसंजीवनी हवी असेल तर येत्या आठवडाभरात पाऊस गरजेचं आहे. नाही तर सोयाबीनच पीक हातातून जाण्याच्या मार्गावर आहे.

"कापूस तग धरून आहे. पण कापसालाही पावसाची आवश्यकता आहे. 15 जुले नंतर मात्र सोयाबीन आणि कापसाला पर्याय म्हणून तुरीची लागवड शेतकरी करू शकतात," जाणे सांगतात.

शेती, शेतकरी, पाऊस, पेरणी

फोटो स्रोत, SACHIN NAGRE

फोटो कॅप्शन, पेरणी

"हवामान विभागाच्या अंदाजानुसार 8 जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे," अशी माहिती जाणे यांनी दिली.

कृषी विभागाच्या माहितीनुसार अमरावती विभागात सरासरीच्या 82 टक्के क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. तर 77 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सद्यस्थितीमध्ये पीक हे रोप अवस्थेत असून 28 आणि 29 जून या दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा आहे.

तसेच काही ठिकाणी पिकामध्ये दोन वेळा डवरणीचे काम झाले असल्यामुळे आणखी 7-8 दिवस पीक पावसाविना तग धरू शकते. मात्र येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते.

पावसाने खंड दिल्यामुळे हलक्या शेत जमिनीवर मोठा फटका बसू शकतो अशी माहिती प्रभारी कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी दिली ते म्हणतात, "मध्यम आणि भारी शेतजमिनीतील पीक पुढील आठ दिवस तग धरू शकतात. मात्र हलक्या शेत जमिनीला पावसाची अत्यंत आवशकता आहे."

"सिंचनाची व्यवस्था असणाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेऊन स्प्रिंकलरने पाणी द्यायला पाहिजे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार लवकरच पाऊस पडायला हवा अशी देवाकडे प्रार्थना करूया," तोटावार म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)