कोरोना : तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी 21 तज्ज्ञांनी सुचवले हे 8 उपाय

फोटो स्रोत, EPA
भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी होत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापासून संरक्षण करण्यासाठी आतापासूनच सावध राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
याप्रकारच्या काही सूचना 'द लॅन्सेट मेडिकल जर्नल'मधील एका लेखात 21 तज्ज्ञांनी दिल्या आहेत.
या तज्ज्ञांमध्ये भारतातील बायोफार्मास्युटिकल कंपनी 'बायोकॉन'च्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ आणि प्रसिद्ध डॉक्टर देवी शेट्टी यांचा सहभाग आहे.
कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू नये, यासाठी या तज्ज्ञांनी जगभरातील देशांना या 8 गोष्टींवर काम करण्याची शिफारस केली आहे.
1. आवश्यक आरोग्य सुविधांचं विकेंद्रीकरण करायला हवं. सगळ्यांसाठी एकच उपाय असू शकत नाही, कारण जिल्ह्यानुसार कोरोनाची प्रकरणं आणि तिथली आरोग्य सुविधांची स्थिती वेगवेगळी असते.
2. सगळ्या आवश्यक आरोग्य सुविधा जसं की रुग्णवाहिका, ऑक्सिजन, आवश्यक औषधी आणि दवाखान्यांमधील उपचाराचा दर, यांवरील मर्यादा निश्चित असली पाहिजे. यासाठी एक पारदर्शक 'राष्ट्रीय मूल्य नीती'ची स्थापना करायला हवी.
दवाखान्यात उपचार घेतल्यामुळे लोकांच्या खिशावर त्याचा भार पडता कामा नये. तसंच यासाठीचा खर्च सगळ्याच लोकांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्यविषयक विमा योजनांनी उचलला पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
3. कोरोना संसर्गाशी संबंधित माहिती स्पष्टपणे आणि पुराव्यासंहित लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांत वाढ केली पाहिजे. यात घरातील देखभाल आणि उपचार, प्राथमिक उपचार, तसंच जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी स्थानिक भाषेत आंतरराष्ट्रीय दिशानिर्देश देण्यात यावेत. यात स्थानिक परिस्थिती आणि क्लिनिकल प्रॅक्टिस यांचाही समावेश असावा.
4. खासगी क्षेत्रासहित आरोग्य यंत्रणेशी निगडित सगळ्या क्षेत्रांमधील मनुष्यबळाला कोरोनाशी लढण्यासाठी तयार करायला हवं. या लढाईसाठी त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात साधनं असायला हवीत. यात सुरक्षाविषयक उपकरणं, वैद्यकीय हस्तक्षेपासाठी मार्गदर्शन, तसंच विमा आणि मानसिक आरोग्यासाठीची मदत असायला हवी.
5. कोरोनाच्या लशीचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी सरकारनं कोरोनाच्या लशीसाठी वेगवेगळ्या गटातील समूहांसाठीची प्राथमिकता निश्चित करायला हवी. लशीचा पुरवठा वाढल्यानंतर याची व्याप्ती वाढवता येऊ शकते. लसीकरण हे सार्वजनिक हितासाठी आहे, याला बाजाराच्या तंत्रावर आपण सोडू शकत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
6. कोरोनाविरोधातल्या लढाईत समाजासोबत मिळून-मिसळून काम करायला हवं. तसंच सार्वजनिक भागीदारीवर लक्ष द्यायला हवं. प्रत्यक्षात काम करत असलेल्या नागरी समाजाच्या आरोग्याची देखभाल करायला हवी.
7. येणाऱ्या आठवड्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यांना त्यासाठी सक्रिय पद्धतीनं तयार करण्यासाठी सरकारी डेटा संग्रह आणि मॉडेलिंगमध्ये पारदर्शकता असायला हवी.
आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या रुग्णांचे वेगवेगळ्या वयाोमानावर आधारित आकडे आणि लिंगआधारित आकडे, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा दर आणि मृत्यू दर, लसीकरणाचं सामाजिक स्तरावरील कव्हरेज, प्रोटोकॉलचा प्रभावीपणा, तसंच दीर्घकालीन परिणामांसाठी डेटाची आवश्यकता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
8. काम बंद आणि नोकरी गेल्यामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यात त्यांच्या आरोग्यालादेखील धोका वाढला आहे. कामगारांच्या खात्यात थेट पैसे जमा करून हे कमी करता येऊ शकतं. काही राज्य सरकारांनी तसं केलं देखील आहे.
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या स्थायी नोकऱ्या टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी या कंपन्यांना सवलती देण्यासाठी सरकारनं पुढं आलं पाहिजे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























