OBC Reservation: विजय वडेट्टीवार म्हणतात, 'वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो' #5मोठ्याबातम्या

विजय वडेट्टीवार

फोटो स्रोत, Twitter

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो, विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला टोला

'वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो,' असं म्हणत महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी लोणावळ्यात पार पडलेल्या ओबीसी चिंतन बैठकीतून शिवसेनेला टोले लगावले. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

"मी अशा भागात राहतो, जिथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे माझ्या खात्यात पैसे आल्यास परत जाऊ देणार नाही," असं वडेट्टीवारांनी म्हटलं. त्यावर भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा."

त्यावर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, "आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे."

ओबीसी

फोटो स्रोत, Twitter

यावेळी वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं की, "जेवढे पैसे सारथीला मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथं."

कोरोना संपल्यावर औरंगाबादमध्ये ओबीसींचा विराट मोर्चा होईल, अशी घोषणाही वडेट्टीवारांनी केली.

2) मागच्या दारानं केंद्रीय यंत्रणा आणल्या जातायेत - संजय राऊत

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, "राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात आहेत. केंद्रीय यंत्रणा कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असतील, तर हे संघराज्य व्यवस्थेला हानिकारक आहे."

"शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे की, सत्ता गेल्यामुळे निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावला जात आहे," असंही राऊत म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

संजय राऊत

यावेळी संजय राऊतांनी प्रताप सरनाईकांच्या पत्राबाबतही भाष्य केलं.

"प्रताप सरनाईक यांच्या पत्रात विनाकारण त्रास दिला जात असल्याचा उल्लेख आहे, हे मी वारंवार सांगतोय. या तक्रारींचा राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा निष्पक्षपणे तपास करू शकतात. न्यायालयं आहेत. पण मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जात आहेत," असं राऊत म्हणाले.

3) माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मी मॅनेज होईन का? - संभाजीराजे

माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, मी मॅनेज होईन का? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीकाकारांना उद्देशून विचारला आहे. ते कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांशी संवाद साधताना बोलत होते. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

नाशिकमधील मूक आंदोलनानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला 21 दिवसांची मुदत दिलीय. संभाजीराजेंच्या या भूमिकेवर काहींनी प्रश्न उपस्थित केले. यालाच संभाजीराजेंनी उत्तर दिलंय.

संभाजीराजे

फोटो स्रोत, FACEBOOK/YUVRAJ SAMBHAJIRAJE CHHATRAPATI

राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीतली चर्चेची माहिती संभाजीराजेंनी मराठा संघटनांच्या समन्वयकांना दिली.

"जे लोक ठोक मोर्चाची भाषा करतात, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, त्याचे काय परिणाम होतील. कोरोनाचं संकट आहे, कोल्हापूरकरांनी हे संकट वाढवलं हा ठपका आपल्यावर बसेल. त्यामुळे आरोग्याचा विचार करून निर्णय घेत आहोत," असंही संभाजीराजे म्हणाले.

4) असदुद्दीन ओवेसींचा MIM पक्ष यूपीत लढवणार 100 जागा

खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा MIM पक्ष उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवणार आहे. ओवेसी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

MIM ने यूपी निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रियाही सुरू केल्याची माहिती ओवेसेंनी दिली.

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते ओम प्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीप्रणित भागिदारी संकल्प मोर्चासोबत MIM युती करणार आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

MIM उत्तर प्रदेशात कुणासोबत जाणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. त्यातून निर्माण होणाऱ्या अफवांना थांबवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओवेसींनी यूपी निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांनीही यूपी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय.

5) फेसबुक, गुगलचे अधिकारी संसदीय समितीसमोर हजर होणार

फेसबुक इंडिया आणि गुगल इंडियाचे अधिकारी भारताच्या संसदीय समितीसमोर हजर होणार आहेत. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

सोशल मीडिया, ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या दुरुपयोगाच्या प्रकरणी, तसंच नागरिकांच्या अधिकारांच्या संरक्षणाबाबत यावेळी अधिकाऱ्यांना समितीकडून प्रश्न विचारले जातील.

उद्या (28 जून) दुपारी 4 वाजता फेसबुक आणि गुगलच्या अधिकाऱ्यांना समितीसमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)