उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांना भिडणाऱ्या शिवसैनिकांना भेटले : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. भाजप कार्यकर्त्यांना भिडणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे भेटले

बुधवारी (16 जून) शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांना भिडणाऱ्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.

'कुणी अंगावर आले की शिंगावर घ्या' या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे शिवसैनिकांनी कृती केल्याने उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे,असं या बातमीत म्हटलंय.

शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्यासह 25 ते 30 शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तुमच्या मारामारीचे व्हीडिओ आपण पाहिल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली, असं बातमीत म्हटलं आहे.

शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले होते. राम मंदिराच्या जमिनीच्या बाबतीत घोटाळ्याचा आरोप सामनातून केला गेला होता. आरोपांबाबत भाजपने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं, या वेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

2. तोपर्यंत गोव्यात पर्यटनाला परवानगी नाही - मुख्यमंत्री

राज्यातील प्रत्येक 18 वर्षांवरील व्यक्तीला कोरोना लसीचा कमीतकमी एक डोस मिळत नाही, तोपर्यंत गोव्यात पर्यटन पुन्हा सुरू होणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

31 जुलैपर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचं प्रशासनाचं लक्ष्य असल्याचंही ते म्हणाले.

याआधी गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनीही पर्यटन व्यवसाय सुरू करण्याबाबत माहिती दिली होती.

"किनारपट्टीवरील संपूर्ण लोकांचं पूर्णपणे लसीकरण केल्यावरच पर्यटन पुन्हा सुरू झालं पाहिजे. गोव्याचा पर्यटन उद्योग आम्ही कायमच बंद ठेवू शकत नाही कारण ते आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण कणा आहे," असं अजगावकर म्हणाले.

गोव्यात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये 21 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

3. आता पुढच्या 5 पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल - गोपीचंद पडळकर

श्रीगोंदा, कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधीकधी, तर श्रेय घेण्यात मात्र सर्वात आधी असतात, असा टोला भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी लगावलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

आपणच मुख्यमंत्री असल्याप्रमाणे रोहित पवार केंद्र सरकारवर बोलतात. पण आपल्याच मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याकडे त्यांचं लक्ष नसतं, अशी टीकाही पडळकर यांनी केलीय.

ते पुढे म्हणाले, "रोहित पवार हे शरद पवार यांचं सुधारित व्हर्जन आहे. गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल."

4. शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा

शिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्यात आली आहे. आता शिक्षकांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर मुंबई लोकलमधून शिक्षकांना प्रवासाची मुभा मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षकांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होते.

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती.

5. शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश

शाळेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला (TC/LC)नसल्यास सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

शासन निर्णयात म्हटलं आहे की,

  • प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसंच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या कोरोना काळात असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याचे कळत आहे.
  • केवळ L.C./T.C. नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक तसेच RTE कायद्याची पायमल्ली करणारे आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा T.C/L.C उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला आहे.
  • विद्यार्थ्यांना TC/LC अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)