उदयनराजे भोसले : 'राज्यात मराठ्यांचा उद्रेक झाला तर त्याला राज्यकर्ते जबाबदार'

व
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

'दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. पाच मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत, त्या त्यांच्या हातात आहेत, त्यांनी लवकर त्या मार्गी लावाव्यात,' असं संभाजीराजेंनी म्हटलंय.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज (14 जून ) खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती भेटले.

पुण्यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीनंतर उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'आता लोकप्रतिनिधींनी यावर बोलण्याची वेळ आली आहे, विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो,' असं संभाजीराजे यांनी म्हटलं.

'संभाजीराजेंनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे, सध्याचे राजकारणी देशाची फाळणी करण्याच्या विचारात आहेत,' असा आरोप यावेळी उदयनराजेंनी केला आहे.

'राजकारण्यांची मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही, यातून लोकांचा मोठा उद्रेक झाला तर त्यांना कुणीही थांबवू शकणार नाही,' असंही यावेळी उदयनराजेंनी म्हटलंय.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी दौरा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी संभाजीराजेंनी चर्चा केली आहे.

उदयनराजे-संभाजीराजे

फोटो स्रोत, TWITTER/@YUVRAJSAMBHAJI

16 जूनपासून आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणार असल्याचंही संभाजीराजेंनी जाहीर केलं आहे.

विशेष म्हणजे आजच (14 जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये संभाजीराजे यांचे वडील छत्रपती शाहू यांची भेट घेतली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होत आहे, याची उत्सुकता आहे.

दुसरीकडे, शाहू महाराज छत्रपती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरात न्यू पॅलेस इथं भेट झाली.

कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती आणि अजित पवारांची भेट

"मराठा समाज स्वतः सक्षम झाला पाहिजे, मराठा समाज स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे," असं वक्तव्य शाहू महाराज छत्रपती यांनी अजित पवार भेटीनंतर केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होताना दिसतो आहे. त्यासाठी खासदार संभाजी राजे छत्रपती येत्या 16 जून पासून मूक आंदोलन करणार आहेत. याची सुरुवात कोल्हापूरमधून होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराज छत्रपती यांची न्यू पॅलेस इथं भेट घेतली आणि नव्या चर्चांना उधाण आले.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter/Ajit Pawar

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नवा राजवाडा इथं शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. ही भेट नियोजित नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे . त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेणं याला वेगळं वलय प्राप्त झाले आहे.

या भेटीनंतर शाहू महाराजांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. राज्य सरकारच्या हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष देऊन त्या पूर्ण करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे."

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter/Ajit Pawar

राज्य सरकारकडून समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या, यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकार ने त्यांच्या अखत्यारितील सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम करावे, निधी द्यावा. या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितले

शाहू महाराज पुढे असंही म्हणाले की, "मराठा आरक्षण बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास व्हायला हवा. तो निकाल सर्वांनी समजून घेतला पाहिजे. याबाबत केंद्र सरकारने लक्ष दिले तर आणि त्यांना या विषयात तेवढा रस असेल तर घटनात्मक बदल करून पुढचं पाऊल टाकायला हवं."

दरम्यान, येत्या 16 जूनपासून खासदार संभाजी राजे छत्रपती मराठा आरक्षणबाबत मूक आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. याबाबत विचारलं असता आंदोलनाबाबत चर्चा झाली नसल्याचे शाहू महाराज यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)