कोरोना व्हायरस : पोस्ट 'कोव्हिड' गँगरीनचा धोका का वाढतोय?

गँगरीन
फोटो कॅप्शन, गँगरीन
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये 'हार्ट अटॅक' आणि 'ब्रेन स्ट्रोक'ची प्रकरणं वाढल्याचं आपण पाहिलं. पण, पोस्ट 'कोव्हिड' गुंतागुंतीचा आणखी एक धोका वाढत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हा धोका आहे 'गँगरीन'चा.

सोप्या शब्दांत शरीराचा एखादा भाग सडणे याला 'गँगरीन ' असं म्हणतात.

तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, गेल्या काही दिवसात कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये आतड्यात गँगरीन होण्याचे प्रकार वाढताना पाहायला मिळाले आहेत.

काही रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूही झालाय.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात रक्ताची गाठ तयार होण्याचं प्रमाण वाढलंय. मग आतड्यात गँगरीन का होतं? याची लक्षणं काय? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आतड्यात गँगरीन होणं म्हणजे काय?

केईएम रुग्णालयाचे डॉ. महादेव गराळे सांगतात, "कोव्हिड-19 मुळे शरीरातील रक्त घट्ट (sticky) होतं. रक्त घट्ट झाल्यामुळे आतड्यातील लहान रक्तवाहिन्यात गाठ तयार होते. हृदय, फुफ्फुस, मेंदू, किडणी आणि तर काही रुग्णांमध्ये हाता-पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोव्हिडमुळे गाठ तयार होते. त्याचप्रकारे आतड्यांच्या रक्तवाहिन्यांमध्येही गुठळी तयार होते आणि रक्तप्रवाह थांबतो. याला आतड्यांमध्ये होणारं 'गँगरीन' म्हणतात.

मुंबईच्या झेन रुग्णालयाचे पोटविकारतज्ज्ञ (Gastroenterologist) डॉ. रॉय पाटणकर सांगतात, "आतड्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार झाली तर रक्तपुरवठा होत नाही. तो भाग काळा पडतो. याला गँगरीन झालं असं म्हणतात."

गँगरीन
फोटो कॅप्शन, गँगरीन

कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि कोरोनामुक्त रुग्णाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. मग गँगरीन कोणाला होतं?

यावर बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, "कोरोनावर उपचार घेत असलेल्या व्यक्तींना गँगरीन होत नाही. रुग्ण रिकव्हर झाल्यानंतर 14 दिवसांनी गँगरीन होण्याची शक्यता असते."

आतड्याचं गँगरीन होण्याची कारणं काय?

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर सांगतात, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आतड्यांना गँगरीन होण्याचे प्रकार वाढले आहेत.

फोर्टिस रुग्णालयाचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. हेमंत पाटील आतड्यांना होणाऱ्या ग्रॅंग्रिनची प्रमुख कारणं सांगतात,

  • कोव्हिडमुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर होणारा परिणाम
  • अनियंत्रित मधुमेह, सिगारेटचं व्यसन
  • जास्त वय आणि कमी रोगप्रतिकारशक्ती
  • कोलेस्ट्रोलचं वाढलेलं प्रमाण

मुंबईच्या केईएम रुग्णालयातील सर्जन डॉ. महादेव गराळे सांगतात, "दर आठवड्यात एक किंवा दोन रुग्ण आतड्यांमध्ये गँगरीन झालेले येतात. दुसऱ्या लाटेत ही संख्या वाढलीये."

गँगरीन
फोटो कॅप्शन, गँगरीन

तरुणांमध्ये वाढतायत गँगरीनची प्रकरण

तज्ज्ञ म्हणतात, कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत, दुसऱ्या लाटेत आतड्यांमध्ये गँगरीन झाल्याची प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये तरुणांचं प्रमाण खूप जास्त आहे.

डॉ. पाटणकर सांगतात, "गँगरीन वयस्कर व्यक्तींमध्ये जास्त दिसून येतं. ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रोलचा त्रास आहे. पण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोणतीच सहव्याधी नसलेल्या तरुणांना गँगरीनचा त्रास झाल्याचं पहायला मिळत आहे."

डॉ. पाटणकर यांच्याकडे 30 ते 50 वयोगटातील 7 रुग्ण गँगरीनची तक्रार घेऊन दाखल झाले होते. यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

ते म्हणतात, "पनवेलहून एक 42 वर्षीय रुग्ण दाखल झाला होता. त्याचं पूर्ण लहान आतडं काळं पडलं होतं. आतड्याचा कोणताच भाग वाचवण्यासारखा नव्हता. या व्यक्तीवर ऑपरेशनही करणं शक्य झालं नाही."

तर, डॉ गराळे यांनी 25 वर्षाच्या रुग्णावर उपचार केले होते. पण, त्याचं पूर्ण आतडं काळ पडलं असल्याने तो वाचू शकला नाही, असं ते म्हणतात.

पण, वयस्कर व्यक्तींना होणारा हा त्रास तरुणांना का होतोय? याबाबत माहिती देताना डॉ. पाटील सांगतात, "तरुणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसारखा कोलॅटरल (अतिरक्त) रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या नसतात. त्यामुळे त्यांना गँगरीनचा त्रास जास्त होतो."

गँगरीन
फोटो कॅप्शन, गँगरीन

आतड्यांच्या गँगरीनची लक्षणं कोणती?

कोरोनामुक्त झालेल्यामध्ये आतड्यांच्या गँगरीनचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे याची लक्षणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. डॉ. हेमंत पाटील याची लक्षणं सांगतात,

  • ओटीपोटात प्रचंड दूखणं
  • उलट्या होणं
  • हगवण लागणे आणि त्यात होणारा रक्तस्राव
  • ताप

तज्ज्ञ म्हणतात, काही तासातच प्रचंड प्रमाणात पोट फुगणे हे देखील आतड्यांमध्ये गँगरीन झाल्याचं एक लक्षण आहे.

आतड्यांच्या गँगरीनचे उपचार होतात?

डॉ. पाटणकर सांगतात, "लक्षणं दिसू लागल्यानंतर पहिले चार तास रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत."

सीटी स्कॅननंतर आतड्यांच्या गँगरीनचं निदान होतं. रुग्ण योग्य वेळेत रुग्णालयात दाखल झाला तर "आतड्यांमधली गाठ विरघळवून टाकणं शक्य आहे," असं पोटविकारतज्ज्ञ पुढे सांगतात.

"रक्त पुरवठा न होणारा आतड्याचा भाग चार तासात काळा पडण्यास सुरूवात होते. काही प्रकरणात पूर्ण आतडं काळ पडल्याचं पहायला मिळालंय," असं डॉ. पाटणकर म्हणतात.

तर काही रुग्णांवर शस्त्रक्रिया करून आतड्याचा खराब झालेला भाग काढून टाकण्यात येतो, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पायातही होतं गॅंग्रिन?

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातही पायाला गँगरीन झाल्यामुळे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

डॉ. गराळे सांगतात, आतड्यांच्या गँगरीनसोबत पायाला गँगरीन झालेले रुग्णही येत आहेत.

"आतड्यांच्या गँगरीनचं योग्य निदान खूप महत्त्वाचं आहे. काहीवेळा निदान होत नाही. काही रुग्ण अंगावर काढतात, फारसं गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे परिस्थिती गंभीर होते."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)