कोरोना लॉकडाऊन : देवेंद्र फडणवीस- काय सुरू-काय बंद, लॉक की अनलॉक, अपरिपक्वता की श्रेयवाद? #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. काय सुरू-काय बंद, लॉक की अनलॉक, अपरिपक्वता की श्रेयवाद? - देवेंद्र फडणवीस

राज्यात 5 टप्प्यातील अनलॉकची घोषणा करताना महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं गुरुवारी (4 जून) दिसून आलं होतं. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

"काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद?" या प्रश्नांकडे लक्ष वेधणारं ट्विट करून फडणवीस यांनी राज्य सरकारची खिल्ली उडवली.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात 5 टप्प्यात अनलॉकची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्य सरकारनं हा निर्णय अद्याप झाला नसल्याचं म्हटलं.

त्यानंतर काही तासातच मंत्री वडेट्टीवार यांनी घुमजाव करत अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली असून यावरचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील," असं म्हटलं होतं. त्यामुळे याची जोरदार चर्चा माध्यमं आणि समाज माध्यमांमध्ये झाल्याचं दिसून आलं.

विरोधी पक्ष भाजपला या मुद्द्यावर टीका करण्याच आयतीच संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी ही संधी न दवडता महाविकास आघाडी सरकारवर खोचक शब्दात निशाणा साधला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

2. शिवराज्याभिषेक सर्व महाविद्यालयांत साजरा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

यंदाच्या वर्षीपासून राज्यातील सर्व महाविद्यालये, खासगी विद्यापीठांमध्येही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी राज्यातील विविध नेत्यांच्या भेटी-गाठी करत असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी (4 जून) मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यावेळी राज्य सरकारच्या शिवराज्याभिषेक दिनाबाबतच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंना देण्यात आली. त्यामुळे 6 जून रोजी रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन यंदा राज्यभरात साजरा केला जाणार आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी यंदा रायगडावर न येण्याचं आवाहन शिवप्रेमींना केलं आहे.

"घरी आपलं कुटुंब आहे, त्यांची काळजी आपण केली पाहिजे. आपण जगलो तरच पुढच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला येवू शकतो. जी चूक कुंभमेळ्यात झाली, जी चूक मेट्रोच्या उद्घाटनात झाली आपण ती चूक करायची नाही. प्रत्येकाने रायगडावर न येता घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा, असं संभाजीराजे म्हणाले. ही बातमी झी 24 तासने दिली.

3. मोदी सरकारची विक्रमी गहू-तांदूळ खरेदी

यंदाच्या वर्षी सरकारतर्फे होणारी गहू आणि तांदळाच्या उत्पादनाची खरेदी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. त्यानुसार या वर्षातील विपणनाचं लक्ष्य सरकार सहजपणे गाठेल, अशी माहिती खाद्य सचिव सुधांशू पांडे यांनी दिली आहे.

चालू रब्बी हंगामात 2 जूनपर्यंत केंद्र सरकारने 411.12 लाख टन गव्हाची खरेदी केली. गेल्या वर्षी हे प्रमाण 365.36 लाख टन होतं.

गहू खरेदीचा याआधीचा विक्रम 389.92 लाख टन होता. सरकारने 432.5 लाख टन गहू खरेदी करण्याचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. ते सहजपणे पूर्ण होईल, असं पांडे म्हणाले.

गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 76 हजार 55 कोटी रुपये पाठवण्यात आल्याची माहितीही पांडे यांनी दिली. ही बातमी इंडिया टीव्हीने दिली आहे.

4. काँग्रेसच्या मूल्यांच्या आधारे उभारलेल्या यंत्रणाच कोरोना काळात शस्त्र म्हणून कामी आल्या - अमित देशमुख

काही दशकांपूर्वी काँग्रेसने ज्याचा पाया रचला तीच आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाविरुद्धच्या शस्त्र म्हणून कामी आल्या, असं मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

'लोकसत्ता'कडून आयोजित 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात ते बोलत होते.

आज देशात जे सुरू आहे, ते पाहता काँग्रेस पक्षाची मूल्येच देशाला तारक ठरली, असं म्हणावं लागेल. काही वर्षांपूर्वी ज्या अपेक्षेने राजकीय परिवर्तन झालं, त्याचं फलित काय आहे, याचा लोक विचार करत आहेत. आपण घेतलेल्या निर्णयाबाबत लोकांना अनेक प्रश्न पडले आहेत. देशाने काय मिळवलं, काय गमावलं हे आपण पाहत आहोत, असं अमित देशमुख म्हणाले.

लस उत्पादनादरम्यान विकास आधुनिकता परिवर्तन, सर्व धर्मसमभाव यांचा समावेश असेलेली व्यवस्था फायद्याची ठरली. ही यंत्रणा काँग्रेसच्या विचारसरणीशी सुसंगत आहे, असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

5. नाथाभाऊ आमचे शत्रू नाहीत, ते आमचे पालकच - चंद्रकांत पाटील

विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्यानंतर विविध प्रकारची राजकीय चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही फोडणी दिल्याचं पाहायला मिळतं. नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच आहेत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून भाजपचा संघर्ष संपणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना पाटील म्हणाले, "भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी वेगवेगळ्या कारणांनी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, अनेकजण भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहे. एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिल्याचा विषयही असाच आहे. महाराष्ट्राl शत्रू जरी असलो तरी त्या भागात गेल्यानंतर त्यांना भेटायला जाणं ही संस्कृती आहे. नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच आहेत. त्यांच्या घरात भाजपच्या खासदार आहेत, संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. जर संवाद नसेल तर अडचण असते, असं पाटील म्हणाले. ही बातमी सरकारनामाने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)