देवेंद्र फडणवीस पोहोचले एकनाथ खडसेंच्या घरी, रक्षा खडसेंसोबत चर्चा

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या घरी पोहोचले. फडणवीस यांनी याठिकाणी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी रक्षा खडसे यांची भेट घेऊन पक्षबांधणीबाबत चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. पण खडसेंविरुद्धच्या संघर्षानंतर फडणवीस पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेल्यानं या भेटीबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान त्यांनी मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या घरी जाण्याबाबत चर्चा होण्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे फडणवीस यांनी सोमवारी शरद पवारांच्या सिलव्हर ओक या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती.
त्या पाठोपाठ आता ते खडसेंच्या घरी पोहोचल्याने याचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. मात्र भाजपच्या खासदार असलेल्या रक्षा खडसे यांच्याबरोबर पक्षबांधणीबाबत चर्चा करण्यासाठी ते गेल्याचं सांगितलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह यावेळी आमदार गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती. मात्र एकनाथ खडसे हे दोन दिवसांपूर्वीच मुंबईला गेले आहेत. त्यामुळं फडणवीस त्यांच्या घरी जाऊनही या दोन नेत्यांची भेट झालेली नाही.
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यादरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले होते.
पक्षबांधणी की डॅमेज कंट्रोल?
देवेंद्र फडणवीस त्यांच्या जळगाव दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. तसंच वादळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करणार आहेत.
मात्र प्रामुख्यानं गेल्या आठवड्यात जिल्ह्यात भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत ज्या पद्धतीनं प्रवेश केला आहे, त्यासंदर्भात फडणवीस यांचा हा दौरा असल्याचीही चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्यात भाजपमधल्या अंतर्गत गटबाजीमुळं काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेचे 27 नगरसेवक भाजपमधून बाहेर पडले होते. या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळं भाजपला बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जळगावात मोठा धक्का बसला होता.
भाजपच्या या 27 नगरसेवकांपाठोपाठ आणखी 3 नगरसेवकांनी सोमवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय आणखी काही नगरसेवकही बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळं गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत डॅमेज कंट्रोलसाठी हा दौरा असल्याचीही चर्चा आहे.
खडसेंनी केले होते फडणवीसांवर आरोप
भाजप आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी जाहीर करत एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.
आपण स्वतःच्या इच्छेने पक्ष सोडत नसून, दुसरा पर्यायच पक्षानं समोर शिल्लक ठेवला नाही त्यामुळं नाईलाजानं बाहेर पडल्याचं खडसे यांनी सांगितलं होतं.

एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना आपण केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळंच पक्ष सोडला असल्याचं म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंना तिकिट नाकारण्यात आलं होतं.
त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यांचाही पराभव झाला. त्या पराभवामागेही पक्षांतर्गत विरोधकांचा हात असल्याचा आरोप खडसेंनी केला होता.
खडसे विरुद्ध फडणवीस अशा या वादानंतर जळगावमध्ये भाजपला हादरा बसणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. जळगाव महानगरपालिकेतील गटबाजीनंतर त्याला सुरुवात झाली अशीही चर्चा आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हा बालेकिल्ला वाचवण्यासाठी जळगावात पोहोचले. थेट खडसेंच्या घरी जाऊन त्यांनी काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, याचीही चर्चा सध्या सुरू आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























