You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2021: आयपीएल सप्टेंबर-ऑक्टोबर युएईत होणार
इंडियन प्रीमिअर लीगच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित सामने युएई अर्थात संयुक्त अरब अमिराती इथे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत.
आयपीएलसाठी खास बायोबबल उभारण्यात आलं होतं. मात्र कोरोनाने हे बायोबबल भेदलं. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील माणसं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं.
हंगामातील उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार यासंदर्भात साशंकता होती. मात्र शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत वेळापत्रकावर शिक्कामोर्तब झालं. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली.
का झालं होतं आयपीएल स्थगित?
4 मे रोजी मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील लढत दिल्ली येथे होणार होती. मात्र त्याआधीच हैदराबाद संघातील वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली. दिल्ली संघातील अमित मिश्रालाही कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं.
सोमवारी कोलकाता संघातील दोन तसंच चेन्नई संघातील तीन खेळाडूंना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. दिल्लीच्या मैदानाची व्यवस्था पाहणाऱ्या ग्राऊंडस्टाफपैकी पाच जणांना कोरोना झाल्याने आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
खेळाडू, सामन्यांशी संबंधित इतर व्यक्ती, कर्मचारी, ग्राऊंड्समन, मॅच अधिकारी, आणि यात सहभागी असलेल्या इतर कोणाच्याही सुरक्षिततेशी तडजोड करायची नाही असं सांगत बीसीसीआयने चौदावा हंगाम स्थगित केला होता.
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन सगळे सामने मुंबईला खेळवण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या वाढू लागल्याने बीसीसीआयला नाईलाजाने हंगाम स्थगित करावा लागला.
गेल्या वर्षी देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तेरावा हंगाम युएईत आयोजित करण्यात आला होता. मात्र यंदाचा हंगाम भारतातच आयोजिक करण्यात आला. देशभरात लाखो कोरोना रुग्ण आढळत असताना आणि हजारो देशवासीयांना ऑक्सिजन, बेड, औषधं यांच्यासाठी वणवण करावी लागत असताना ही स्पर्धा सुरू राहिल्याने जोरदार टीकाही करण्यात आली होती.
यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघातील अक्षर पटेलला कोरोनाचा संसर्ग झाला होता. काही दिवसांपूर्वीच तीन निगेटिव्ह चाचण्यांनंतर तो मैदानात खेळायला उतरला. कोलकाता संघाच्या नितीश राणालाही कोरोना झाला होता. मात्र त्याने क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण केली.
निगेटिव्ह निकालानंतर तो सरावात सहभागी झाला. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये कार्यरत ग्राऊंडस्टाफपैकी दहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र तरीही मुंबईत दहा सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं.
दरम्यान घरात आणि नात्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने अव्वल फिरकीपटू आणि अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनने यंदाच्या हंगामातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
ऑस्ट्रेलियाचे केन रिचर्डसन, अॅडम झंपा आणि अँड्यू टाय यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रायफेल हेही परतणार होते मात्र ऑस्ट्रेलियाला जाणारी विमानसेवा स्थगित असल्याने ते भारतातच आहेत. घरातील सदस्यांना कोरोना झाल्याने पंच नितीन मेमन स्वगृही परतले होते.
देशातल्या कोरोना रुग्णांची प्रचंड संख्या आणि भयावह परिस्थिती यामुळे काही परदेशी खेळाडूंनी भीती व्यक्त केली होती. मात्र बायोबबल अत्यंत सुरक्षित आहे अशी हमी बीसीसीआयने दिली होती. स्पर्धा संपेपर्यंत आणि तुम्हाला सुखरुप घरी सोडण्याची जबाबदारी आमची असं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. मात्र कोरोनाने बायोबबल भेदलं.
यंदाच्या हंगामात सर्वच सामने तटस्थ ठिकाणी होणार होते. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई याठिकाणी होत आहेत. यंदाच्या हंगामात 60 सामने होणार आहेत. आतापर्यंत 29 सामने झाले होते.
भारतीय संघ काही दिवसातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होत आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही टेस्ट झाल्यानंतर भारतीय संघ महिनाभर इंग्लंडचमध्येच असेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यादरम्यान पर्यायी भारतीय संघ श्रीलंकेत वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिका खेळणार आहे.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकप भारतात होणार आहे. मात्र कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता वर्ल्डकपही युएईतच होण्याची चिन्हं आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)