कोरोनाः देवेंद्र फडणवीस- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी लपवल्याचे पुरावे आहेत #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. म्युकरमायकोसिसच्या उपचारांबाबत सरकारची घोषणा फसवी - फडणवीस
महाराष्ट्रात कोरोना संकटादरम्यान आलेल्या म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या आजारानेही थैमान घातलं आहे. म्युकरमायकोसिसमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. या आजाराच्या उपचारांचा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरील असल्याने त्यांच्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारकडून नुकतीच करण्यात आली होती.
मात्र, ही घोषणा फसवी असून राज्यात कुठल्याही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.
महाविकास आघाडी सरकारकडून कोरोना रुग्णसंख्या तसंच मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी लपवली जात आहे. या सर्व आकडेवारीचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असं फडणवीस म्हणाले.
सरकारने जनताभिमुख काम करण्याची गरज असल्याचं सांगत म्युकरमायकोसिसचा रुग्ण कोणत्याही रुग्णालयात भरती असेल तर त्याला सरकारकडूनच मोफत इंजेक्शन देण्यात यावे, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
2. येत्या 1 जूनपासून व्यापार सुरू झालाच पाहिजे, व्यापारी संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेले निर्बंध 1 जूनपासून उठवण्याच्या मागणीने राज्यात जोर धरला आहे.

फोटो स्रोत, cmo maharashtra
लॉकडाऊनमुळे व्यापारी अडचणीत आले असून येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरू झालाच पाहिजे, अशी मागमी व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे तसंच राज्य सरकारकडे केली आहे.
'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' चे राष्ट्रीय संघटन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी याबाबत एक निवेदन राज्य सरकारकडे पाठवलं आहे.
महाराष्ट्राच्या शेजारील विविध राज्यांत सर्व प्रकारचे व्यापार सुरू आहेत. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातील व्यापार बंद राहिल्यास येथील व्यापार शेजारील राज्यात जाण्याची भीती आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही, अशी भीती ललित गांधी यांनी व्यक्त केली.
याशिवाय, व्यापारी वर्गाला विविध सवलती देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली.
ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
3. 'लोक जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये'
2022 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक बैठक आयोजित केली होती.
या बैठकीवर माजी IAS अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी जोरदार टीका केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्याची गरज नव्हती, असं म्हणत सिंह यांनी भाजप तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

फोटो स्रोत, Ani
"लोक जगो अथवा नाही. मात्र निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये. सध्याचं युग हे लाज सोडलेल्या सत्तेचं युग आहे," असं सूर्य प्रताप सिंह यांनी ट्विट करून म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.
4. 'लशीची जागतिक निविदा टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का?'
"कोरोना प्रतिबंधक लशीच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारने जागतिक निविदा काढल्या आहेत. पण त्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यावरून भाजपने महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.

फोटो स्रोत, AFP
अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का, असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
कोरोना प्रतिबंधक लशीसाठी जागतिक निविदा काढण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात केली होती.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीस त्याचे अधिकार देण्यात आल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. वृत्तपत्रांमध्ये निविदा जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र महिना उलटूनही या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे लस खरेदी प्रक्रिया नेमकी कशामुळे रखडली, अडकली याचा तातडीने खुलासा करून राज्य सरकारने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी मागणी उपाध्येंनी केली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. शरद पवार-उद्धव ठाकरे यांची भेट, सुमारे 40 मिनिटे चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी भेट झाली.
यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान पवार आणि ठाकरे यांची सुमारे 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेले काही दिवस शरद पवार आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, या कालावधीत पवार यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बरेच दिवस भेट झाली नव्हती.
त्यामुळे आजारातून बरे झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या बैठकीत या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























