कोरोना: 'नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल,' सामनाचा इशारा #5मोठ्याबातम्या

गंगा

फोटो स्रोत, BBC Sport

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. 'नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल' - सामना

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनातून केंद्र सरकारवर निशाना साधण्यात आला आहे.

"हिंदुत्वाच्या नावावर पश्चिम बंगालमध्ये धार्मिक, सामाजिक विभाजन करता आले नाही. त्यामुळे हे टूलकिट अपयशी ठरले. कोरोनाशी लढाई आणि लोकांसाठी जीवन यज्ञ महत्त्वाचा नसून निवडणुकांनाच प्राधान्य मिळत आहे. निवडणुका मागेपुढे झाल्याने आकाश कोसळणार नाही.

"सध्या संपूर्ण लक्ष कोरोनाच्या लढाईकडे देणं गरजेचं आहे. नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल. जगात आपली नाचक्की होईल," असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

"निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोनाचा प्रसार झाला. निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला फासावर लटकवू का नये? असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला होता. उत्तर प्रदेशच्या बाबतीतही केंद्र सरकार तीच चूक करत आहे. गंगेतील पात्रात वाहत असलेल्या मृतदेहांना पुन्हा जिवंत करणार नाही. पश्चिम उत्तर प्रदेशातील मथुरा, मेरठ, बागपत या जाटबहुल प्रदेशात भाजपचा पराभव झाला."

"अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन कोरोना काळात करून घेतले गेले, त्या भूमीपूजनावर गंगेत तरंगणारे मृतदेह भारी पडत आहेत. गंगेत आज हिंदूंचे मृतदेह बेवारस अवस्थेत तरंगत आहेत. हे मृतदेह भाजपला राजकीय पराभवाकडे ढकलत आहेत," असं सामनाने म्हटलं आहे.

2. अर्धनग्न होत हॉस्पिटलमध्ये आंदोलन, आंदोलकांना अटक

कोरोना उपचारांसाठी भरमसाठ बिल आकारलं जाण्याची उदाहरणं नवीन नाहीत. नाशिक शहरात रुग्णांच्या कुटुंबीयांकडून घेतलेली आगाऊ रक्कम परत मिळण्याच्या मागणीसाठी रुग्णांचे नातेवाईक, तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून रुग्णालयात कपडे काढून एक वेगळ्याच प्रकारचे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे फेसबुक लाइव्ह करत वोक्हार्ट रुग्णालयाच्या कारभाराचा विरोध करण्यात आला. दोन्ही आंदोलकांना मुंबई नाका पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

बिल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र

वडाळा नाका परिसरातील वोक्हार्ट रुग्णालयात अमोल जाधव याच्या कुटुंबीयांवर उपचार सुरू होते. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जाधव यांनी रुग्णालयात सुमारे दीड लाखाची रक्कम आगाऊ भरली होती ती परत देण्याची मागणी केली.

उपचाराचे बिल मेडिक्लेममधून वर्ग केल्यानंतर आगाऊ रक्कम परत मागण्यासाठी रुग्णालयात गेले असता, रुग्णालय प्रशासनाने केवळ 1 लाख 12 हजार रुपये देणार असल्याचे सांगितल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

बिलाची संपूर्ण रक्कम भरणा केल्यावर आगाऊ रक्कम का कापली जात आहे, याची विचारणा केली असता त्यांनी विविध प्रकारची कारणे दिली. याचा विरोध करत जितेंद्र भावे, अमोल जाधव यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर कपडे काढून आंदोलन केले.

3. लखनौमध्ये सांडपाण्यात आढळला कोरोना

सांडपाण्यात कोरोना व्हायरस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये नाल्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तेव्हा तपासणीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

कोरोना, लखनौ,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना

आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यास सुरुवात केली होती. पाण्याचे नमुने तपासणीसाठी 8 सेंटर तयार केले गेले आहेत.

लखनौमधल्या रुकपूर, घंटाघर आणि मछली मोहाल भागातील नाल्यामधून पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. 19 मे रोजी या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती.

तेव्हा रुकपूर खदरा येथील नाल्यातील पाण्यात करोना व्हायरस असल्याचं आढळून आलं आहे. एसजीपीआय लॅबनं याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

4. आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या घरातून तीन कोटी जप्त

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या घरावर छापा घातले. राठोड यांच्याविरोधात सव्वा तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

मुंबईतल्या गोरेगाव पूर्व इथल्या आरे कॉलनीत राहणाऱ्या तक्रारदारानं घराची दुरुस्ती करण्यासाठी आरे दुग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांची भेट घेतली होती. त्यानंतर नथू राठोड यांनी त्यास आरेचा शिपाई अरविंद तिवारी याची भेट घेण्यास सांगितली.

तक्रारदारानं शिपाई अरविंद तिवारी यांची भेट घेतली असता, त्या शिपायानं नथू यांच्या वतीनं 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदारानं लाच न देता मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 14 मे रोजी लेखी तक्रार केली.

19 मे रोजी तक्रारदारानं नथू राठोड यांच्या वरळी दुग्ध डेअरी येथील कार्यालयात भेट घेतल्यानंतर तक्रारीची खातरजमा झाली. त्यानंतर नथू राठोड यांनी पुन्हा एकदा तक्रारदाराला अरविंद तिवारी यांची भेट घेण्यास सांगितले.

त्यानुसार पुन्हा एकदा 24 मे रोजी तक्रारदारानं दुग्ध डेअरी गोरेगाव कार्यालयात शिपाई अरविंद तिवारी यांची भेट घेतली असता, त्यांनी 50 हजार इतक्या रकमेच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागानं सापळा रचून शिपाई अरविंद तिवारीला 50 हजारांची लाच स्वीकारताना पकडलं.

5. बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानं आणि व्यवसाय उघडणार

बांधकाम साहित्याशी संबंधित दुकाने आणि व्यवसायांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादळ आणि पावसाळा यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात 15 ते 20 मे या कालावधीत तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरे व अन्य बांधकामांची पडझड झाली. तसेच पावसाळाही तोंडावर आला आहे. ही बाब लक्षात घेत बांधकांमांची दुरुस्ती व मजबुतीकरण ही कामे प्रभावित होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

कंस्ट्रक्शन साईट

फोटो स्रोत, Getty Images

बांधकाम व्यवसाय आणि बांधकाम साहित्याशी संबंधित दुकाने यांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार निर्बंधांमध्ये सूट देत ही दुकाने खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

राज्य सरकारने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 13 एप्रिल रोजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश जारी करून कठोर निर्बंध लादले आहेत. त्यात अत्यावश्यक बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता बांधकाम साहित्याशी संबंधित दुकाने आणि व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.

आगामी पावसाळी मोसमाच्या अनुषंगाने त्याच्याशी संबंधित दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्र्या, पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय सुरू ठेवता येतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)