के. के. शैलजा: कोरोनाची परिस्थिती हाताळण्याऱ्या 'रॉकस्टार' मंत्र्यांना नवीन मंत्रीमंडळातून डच्चू का?

फोटो स्रोत, @kkshailaja
कोरोना संकट रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या शैलजा यांना केरळच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. 'रॉकस्टार' म्हटलं गेलेल्या शैलजांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या निर्णयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात येत आहे.
आधीच्या राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांना हटवलं आहे. कोरोना संकट काळात पिनराई विजयन यांच्या नेतृत्वामधील आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांच्या कामाची प्रशंसा करण्यात आली होती.
शैलजा यांनाही मंत्रिपदावरून बाजूला करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये शैलजा यांनी मत्तनूर मतदारसंघात 60,000हून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला होता.
केरळ राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात आरोग्यमंत्री या नात्याने शैलजा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. केंद्र सरकारनेही त्यांचं कामाचं कौतुक केलं होतं.
शैलजा यांना आता सीपीएम पक्षाचा व्हिप करण्यात आलंय. या पदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा नाही.

फोटो स्रोत, ARUN CHANDRABOSE
कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचं काम शैलजा यांच्या नेतृत्वात झालं होतं. पिनराई विजयन यांना पर्याय म्हणून शैलजा यांच्या नावाचा विचार पक्षांतर्गत पातळीवर झाला होता. मात्र प्रत्यक्षात नव्या मंत्रिमंडळात शैलजा यांच्याकडून मंत्रीपद काढून घेण्यात आलं आहे.
गेल्या मंत्रिमंडळात असलेले फक्त स्वतः विजयन नवीन मंत्रिमंडळात असतील, LDF च्या मंत्रिमंडळात बाकी सगळे नवीन मंत्री असतील.
या निर्णयामुळे आपण निराश नसल्याचं याविषयी बोलताना शैलजा यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, "हा कोणा एकाबद्दलचा निर्णय नाही, एक टीम म्हणून काम केलेल्या सगळ्यांबाबतचा घेण्यात आलेला हा निर्णय आहे. नवीन मंत्रिमंडळही चांगलं काम करेल अशी मला खात्री आहे. मी पक्षाची कार्यकर्ता आहे पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा मला आदर आहे."
गेल्या वर्षी कोव्हिडच्या साथीदरम्यान शैलजा यांनी केलेल्या कामाचं कौतुक झालं होतं. त्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. पण ही बाब पक्षातल्या काहींना आवडली नसल्याचं म्हटलं जातंय. पक्षाने निवडणुकीदरम्यान त्यांचा मतदारसंघ बदलण्याचा निर्णय घेतला होता.
या पक्षाचा जवळून अभ्यास केलेल्या एका राजकीय विश्लेषकांनी नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं, "विजयन यांची पक्षावर इतकी पकड आहे की शैलजांना हटवण्यात येण्याला 5-6 जणांपेक्षा जास्त कुणी विरोध केला नाही. मोहम्मद रियास यांना परत आणण्यालाही कोणी विरोध केला नाही."
काही वर्षांपूर्वी केरळमध्ये निपाह व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यावेळीही शैलजा यांनी चांगलं काम केलं होतं.
एमबी राजेश यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून तर शैलजा यांची पक्षाच्या व्हीप म्हणून निवड झाल्याचं सीपीएमतर्फे सांगण्यात आलं. टीपी रामकृष्णन यांची पक्षाचे सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.
पक्षाचे विधिमंडळातील नेते आणि मुख्यमंत्री म्हणून पिनराई विजयन यांच्या नावावर सीपीएमने शिक्कामोर्तब केलं आहे.
केरळमध्ये आलटून पालटून डाव्या किंवा काँग्रेस सरकार निवडून येतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत एलडीएफ अर्थात लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने (डावी आघाडी) सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
एमवी. गोविंदन, के.राधाकृष्णन, केएन. बालागोपाळ, पी.राजीव, वीएन. वासवन, साजी चेरियन, वी.शिवकुट्टी, मोहम्मद रियास, डॉ. आर. बिंदू, वीना जॉर्ज तसंच व्ही.अब्दुल रहमान यांची मंत्रिपदी निवड झाली आहे.
निवडणुकीवेळी पिनराई विजय यांनी सलग दोन टर्म आमदार असलेल्या नेत्यांना तिकीट न देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पक्षाचं नुकसान होऊ शकतं असा सूर उमटला होता. मात्र प्रत्यक्षात सीपीएमला या निर्णयाचा फायदा झाला.
शैलजा यांना मंत्रिपदावरून बाजूला करून सीपीएमने व्यक्तीपेक्षा पक्षाचं धोरण महत्त्वाचं असल्याचं दाखवून दिलं आहे. आरोग्य व्यवस्थेत झालेल्या सुधारणांसाठी फक्त आरोग्यमंत्री शैलजा यांना श्रेय देण्यास तयार नसल्याचंही सीपीएमने स्पष्ट केलं आहे.
नव्या मंत्रिमंडळात शैलजा यांना आरोग्य खात्याच्या बरोबरीने अन्य महत्त्वाचं खातं मिळेल अशी अटकळ होती. शैलजा यांना बाजूला करण्यात आल्याने पिनराई यांच्या नव्या मंत्रिमंडळात हे खातं कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. शैलजा यांच्याप्रमाणे चांगलं काम करण्याचं आव्हान नव्या आरोग्यमंत्र्यांसमोर असेल.
पूर्ण वेळ राजकारणात येण्यापूर्वी शैलजा यांनी 23 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आहे. शैलजा यांना घरातूनच कम्युनिस्ट पक्षाचे बाळकडू मिळाले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























