कोरोना : ममता बॅनर्जी म्हणतात, 'भाजपच्या लोकांनी पश्चिम बंगालमध्ये कोरोना पसरवला' #5मोठ्याबातम्या

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. भाजपच्या लोकांनी पश्चिम बंगालमध्ये कोरोना पसरवला - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्याच लोकांनी कोरोना पसरवल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "पश्चिम बंगालमध्ये भाजपच्याच लोकांनी येऊन कोरोना पसरवला. मात्र अद्याप राज्याला पुरेशा लशी मिळालेल्या नाहीत."

"नेते राज्यात फिरून जनतेला भडकवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे मंत्र्यांनाही राज्यात प्रवेश करण्यासाठी RTPCR चाचणी आवश्यक असेल," असंही त्या म्हणाल्या.

तसंच, नवी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या नव्या संसदेवरही ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे.

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, SANJAY DAS

"कोरोना स्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहूनही अद्याप उत्तर मिळालं नाही. नवी संसद, पुतळ्यासाठी त्यांच्याकडे 20 हजार कोटी रुपये आहेत. पण लसीकरणासाठी ते 30 हजार कोटी रुपयांची व्यवस्था करू शकत नाहीत," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

तसंच ममता बॅनर्जी यांनी PM केअर फंडाचाही यावेळी उल्लेख केला. PM केअर फंड कुठे आहे? तरूण वर्गाचा जीव धोक्यात का टाकला जात आहे, असंही बॅनर्जी यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली आहे

2. मराठा आरक्षणाचा मार्ग अजूनही खुला, चिथावणीला बळी पडू नका - अशोक चव्हाण

"मराठा आरक्षणासाठीची लढाई अद्याप संपलेली नसून आरक्षणाचा मार्गही अजून खुला आहे, मराठा समाजाने कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नये," असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

अशोक चव्हाण

फोटो स्रोत, Twitter

"केंद्र सरकारच्या मागास आयोगाकडे कागदपत्रं सोपवता येतील. त्यानंतर केंद्र सरकार, राष्ट्रपती आणि राष्ट्रीय मागास आयोग यांच्या मदतीने मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावता येईल, तोपर्यंत संयम बाळगणं आवश्यक आहे," असंही अशोक चव्हाण म्हणाले.

"महाराष्ट्रात सत्तेसाठी तसेच राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ज्यांनी उद्योग सुरु केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने सहभागी होऊ नये," असंही चव्हाण यांनी म्हटलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

3. तुम्ही निवडणूक लढवणार आहात, आम्ही नाही - सुप्रीम कोर्ट

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. यासंदर्भात दिल्लीतील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली.

सुप्रीम कोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

यादरम्यान, न्यायालयाने तिसऱ्या लाटेसंदर्भातील केंद्र सरकारच्या तयारीपासून ते दिल्लीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातील अनेक प्रश्न केंद्र सरकारला विचारले.

शिवाय, तुम्ही निवडणूक लढवणार असून तुम्हीच जनतेला उत्तर देणं अपेक्षित आहे, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

"भारत सरकारची धोरणं ठरवण्याचा आमचा विचार नाही. आम्ही तुम्हाला फक्त इनपूट देत आहोत. धोरण तयार करण्याची जबाबदारी तुमची आहे. आम्ही ती जबाबदारी तुमच्याकडून घेणार नाही," असं कोर्टानं म्हटलं.

"दोन वर्षांनंतर तुम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत, आम्हाला नाही. तुम्ही लोकांना उत्तरं देण्यासाठी बांधील आहात. आम्हाला कोणीही यासंदर्भात प्रश्न विचारणार नाही. धोरणं ठरवणं ही आमची जबाबदारी नसून तुमची आहे, ती तुम्ही पार पाडा. आम्ही तुम्हाला केवळ सल्ला देऊ शकतो," असं न्यायालयाने सांगितलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

4. 'औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भररस्त्यात चोपला पाहिजे'

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट देशभरात आलेली आहे. यादरम्यान बेड, ऑक्सिजन यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसंच कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. हे सर्व पाहून अभिनेता रितेश देशमुखचा राग अनावर झाला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

रितेशने ट्वीट करत 'औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे' असं म्हणत राग व्यक्त केला. न्यूज 18 लोकमतने याबाबत बातमी दिली आहे.

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून आता नागरिकांना सरकारी दरात रेमडेसिवीरचा पुरवठा केला जाईल. त्यामुळे आता त्याचा काळा बाजारही होणार नाही.

तसेच रेमडेसिवीरविना कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होणार नाही. रेमडेसिवीरवर कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. उत्पादन अधिक झाल्यानंतर इतर राज्यांना देखील पुरवलं जाईल," असं नितीन गडकरी यांनी नमूद केलं आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

5. आसाराम बापू यांना कोरोनाची लागण

लैंगिक अत्याचार प्रकरणी कारावासाची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांना जयपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आसाराम बापू यांच्यावर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

5 मे रोजी आसाराम यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती वेगाने खालावत असून शरिरातील ऑक्सिजन पातळीही अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी एम्स रुग्णालयात दाखल केलं जाण्याची शक्यता आहे. ही बातमी झी न्यूजने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)