You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी फक्त मुस्लीम कर्मचाऱ्यांचंच नाव का घेतलं?
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बंगळुरू, बीबीसी हिंदीकरिता
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
कर्नाटकात कोव्हिड-19 च्या रुग्णांना बेड देण्याबाबत एक कथित घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या खासदार आणि आमदारांकडून केला जात आहे. यानंतर सात जणांना अटकही करण्यात आली. पण या प्रकरणाने अतिशय दुःखदरित्या धार्मिक वळण घेतल्याचं दिसून येत आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये कोव्हिड रुग्णांसाठी बनवण्यात आलेल्या बंगळुरू साऊथ वॉर रुममध्ये बेड विकल्याचं प्रकरण चव्हाट्यावर आणल्याचा दावा राजकीय नेत्यांच्या एका पथकाने केला होता.
या पथकाचं नेतृत्व बंगळुरू दक्षिण मतदारसंघाचे खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे करत होते.
तेजस्वी सूर्या यांचा दावा काय?
बंगळुरूच्या त्या कोव्हिड सेंटरमध्ये बेड बुक केल्यानंतर पैसे घेऊन ते बेड इतरांना देण्यात येत आहेत, असा दावा तेजस्वी सूर्या यांनी केला आहे.
एका व्यक्तीला कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने त्याला होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं होतं. त्याच्या तब्येतीची निगराणी बंगळुरू महानगरपालिकेच्या (BBMP) डॉक्टरांकडून करण्यात येत होती.
या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याच्या 10 दिवसांनंतर त्याच्या नावावर एक बेड दुसऱ्या एका रुग्णाला देण्यात आला.
अर्ध्या रात्री हा बेड रिकामा होऊन दोन मिनिटंही झालेली नसताना दुसऱ्या रुग्णाला तो बेड देण्यात आला, असं सूर्या यांनी म्हटलं.
ते म्हणतात, "एखादा रुग्ण 30 सेकंदांच्या आत आतमध्ये कसा पोहोचू शकतो?"
माझा पक्ष सत्तेत जरूर आहे. पण अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत असल्यास, इतके मृत्यू होत असल्यास आम्ही शांत बसू शकत नाही.
राज्यात आपल्याच सरकारविरोधात पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी सूर्या आणि आमदारांना बोलावलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
धार्मिक वळण कुठे मिळालं?
मंगळवारी (4 मे) पत्रकार परिषद घेण्यापूर्वी तेजस्वी सूर्या आणि आमदार (रवि सुब्रमण्या, सतीश रेड्डी आणि उदय गरुडाचर) यांनी वॉर रुमचा दौरा केला होता. या घोटाळ्याच्या मुद्द्यावर त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांसोबत वादही घातला.
सूर्या यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हीडिओत सूर्या अधिकाऱ्यांशी बातचीत करताना बंगळुरू दक्षिण वॉर रुममधील 17 कर्मचाऱ्यांचं नाव घेताना दिसत आहेत.
यानंतर सूर्या विचारतात, यांची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया काय आहे? एका कर्मचाऱ्याने त्यांना सांगितलं, बसवनगुडीतील एक एजन्सीमार्फत हे काम केलं जातं.
तेव्हा रवि सुब्रमण्या म्हणतात, "तुम्ही मदरशातून नियुक्ती करता की महापालिकेतून?"
यादरम्यान त्यांनी वाचलेली सर्व नावे अल्पसंख्याक समाजाशी संबंधित होती. या प्रकारानंतर सूर्या यांच्यावर सोशल मीडियात जोरदार टीका होऊ लागली आहे.
बेड घोटाळ्यात वॉर रुममध्ये काम करत असलेल्या लोकांचं नाव घेऊन ते या प्रकरणाला धार्मिक वळण देत आहेत, असं म्हटलं जाऊ लागलं.
कर्नाटकचे काँग्रेस नेते श्रीवत्स वाय. बी. यांनी ट्वीट करून यावर म्हटलं, "बंगळुरू साऊथ कोव्हिड वॉर रुममध्ये 206 लोक काम करतात. तेजस्वी सूर्या यांनी बेड घोटाळ्यासंदर्भात बोलताना फक्त 17 नावेच का घेतली?
"राज्य सरकार, बंगळुरू महापालिका, भाजपचे मुख्यमंत्री, खासदार किंवा आमदार यासाठी जबाबदार नाहीत. तर कॉल सेंटरमध्ये असलेले 17 तरूण यासाठी जबाबदार आहेत. भाजपच्या कट्टरवादाची ही पातळी आहे.
कॉल सेंटरच्या मुलांचं म्हणणं काय?
वॉर रुमध्ये काम करत असलेल्या ज्या तरूणाचं नाव सूर्या यांनी घेतलं होतं, त्यांच्याशी बीबीसीने संवाद साधला. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपलं म्हणणं मांडलं.
तो म्हणतो, "आम्ही या ठिकाणी अतिशय कनिष्ठ पातळीवर काम करतो. बेड कुणाला मिळावा, कुणाला मिळू नये, हे आम्ही ठरवत नाही. शिफ्टमधील डॉक्टर जी सूचना करतात, आम्ही तेच काम करतो. आम्ही कॉल रिसिव्ह करतो आणि डॉक्टरांना त्याबाबत कळवतो. त्यानंतर डॉक्टरच बेड बुक करण्याबाबत सूचना करतात. त्यांच्या आदेशांचं आम्ही पालन करतो."
संबंधित तरूण वारंवार आपलं नाव न छापण्याची विनंती करत होता. एका खासगी एजन्सीने आपल्याला इथं कामावर ठेवल्याचं त्याने सांगितलं. दोन महिन्यात पहिल्यांदाच आम्हाला पगार म्हणून 12 हजार रुपये मिळाले असल्याचं त्यानं सांगितलं.
या तरूणासह त्याच्या सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. पण तिथं त्यांची चौकशी करण्यात आली नाही. मंगळवारी काही कर्मचाऱ्यांची चौकशी झाली. पण पुराव्यांअभावी कुणालाच अद्याप अटक करण्यात आली नाही.
सामाजिक कार्यकर्त्या तारा कृष्णस्वामी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाल्या, "पुरावेच उपबल्ध नव्हते म्हणून त्यांना अटक करण्यात आली नाही. पुरावे नसल्यामुळे तुम्ही या लोकांवर आरोप लावू शकत नाही. कोव्हिड संकटाच्या काळात कोणत्याही कारणाशिवाय त्यांनी त्यांची नोकरी गमावली आहे."
चार जणांना झाली अटक
शहर गुन्हे शाखेकडे या प्रकरणाची चौकशी करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी शहरातील आठ झोनल वॉर रुमवर छापेमारी केली आहे.
बंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "आम्ही चार जणांना अटक केली आहे. त्यामध्ये नेत्रावती आणि रोहित कुमार यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. तर बाकीच्या दोन जणांना आज अटक करण्यात आली. ते दोघेही डॉक्टर असून त्यांची नावे रेहान आणि सतीश अशी आहेत."
पोलिसांच्या पथकाने कोरोना रुग्णाचा नातेवाईक असल्याचं भासवत नेत्रावती आणि रोहित यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर रुग्णाची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांच्याकडून 20 ते 40 हजार रुपये घेण्यात येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.
अटक करण्यात आलेल्या लोकांचं नाव तेजस्वी सूर्या यांनी आपल्या यादीत घेतलंच नव्हतं, ही आश्चर्याची बाब आहे.
दुसऱ्या एका तपासात बंगळुरू शहर पोलिसांच्या सेंट्रल डिव्हीजन पथकाला आणखी एक असंच रॅकेट आढळून आलं.
बेड मिळवण्यासाठी मधला दलाल 50 ते 70 हजार रुपये वसूल करत होता. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.
यावरून काँग्रेस आमदार रिजवान अरशद यांनी ट्वीट करून सूर्या यांच्यावर टीका केली आहे.
"तेजस्वी सूर्या तुम्हाला लाज वाटते का? भाजप सरकार मदत करू शकत नाही तर हरकत नाही. पण आपलं अपयश लपवण्यासाठी धार्मिक तणाव पसरवू नका," असं त्यांनी म्हटल आहे.
ते पुढे म्हणाले, "212 लोक वॉर रुममध्ये काम करतात. तेजस्वी आणि त्यांची गँग फक्त 17 मुस्लीम नावं घेतात. ही यादी मदरशातून आल्याचं ते सांगतात. तुम्ही ही क्रोनोलॉजी समजून घ्या."
तेजस्वी सूर्या समोर आले
कचरा प्रशासनाचे जॉईंट कमिश्नर सर्फराज खान यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यावर सूर्या यांनी प्रतिक्रियाही दिली आहे.
सोशल मीडियावर हा संदेश देताना आपण दुःखी आहोत, माझ्यावर 17 कर्मचाऱ्यांची मदत केल्याचा आरोप आहे. त्यांना दहशतवादी संबोधलं जात आहे, असं खान यांनी लिहिलं
सर्फराज खान म्हणतात की ते कोणत्याही वॉर रुमचे प्रमुख नाहीत. त्यांच्याकडे इतर कामांची जबाबदारी आहे.
कोव्हिड केअर सेंटरमध्ये अधिकारी लोकांचा किंमती जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी काम करत आहेत, असं ते म्हणाले.
सर्फराज खान सांगतात, "मी हज भवनला 140 बेडच्या ऑक्सिजन कोव्हिड केअरमध्ये रुपांतरीत केलं होतं. हज कमिटीच्या फंडातून 50 ICU बेडची सोय केली. हज भवनमध्ये 90 टक्के रुग्ण इतर जातीधर्मांचे आहेत, फक्त 10 टक्के मुस्लीम आहेत, हे मी सांगू इच्छितो. लोक देवाला कोणत्याही नावाने संबोधत असतील तरी तो एकच आहे, असं मी मानतो. माझा देश, माझं सरकार आणि माझं संविधान यांच्यावर माझी नितांत निष्ठा आहे."
सूर्या यांनी खान यांना फोन करून म्हटलं की त्यांनी त्यांचं नाव कधीच घेतलं नव्हतं. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सूर्या नेहमीच पुढे येतील. खान यांच्या कामाचा आपण आदर करत असल्याचंही सूर्या यांनी म्हटलं.
बीबीसी हिंदीने सूर्या यांच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांशी बोलणं होऊनसुद्धा सूर्या यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही.
दुसरीकडे बंगळुरूतील बेड ब्लॉकिंगमागे एका मुस्लीम संघटनेचा हात असल्याचा आरोप ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के. ए. ईश्वरप्पा यांनी केला आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)