कोरोना लस: मुंबईत पुन्हा होणार लसीकरणाला सुरुवात

फोटो स्रोत, Getty Images
लशींचा साठा संपल्यामुळे मुंबईतले बहुतांश केंद्रावरील लसीकरण थांबले होते आता ते पुन्हा सुरळीत होणार आहे अशी माहिती महानगरपालिकेनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेला दीड लाख लशींचा साठा प्राप्त झाल्याने लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.
पुढील तीन दिवस बहुतांशी केंद्रांवर होणार कोव्हिड प्रतिबंध लसीकरण प्रक्रिया सुरू होईल असं पालिकेने म्हटलं आहे.
कोव्हिड प्रतिबंध लसीच्या 1 लाख 58 हजार मात्रा बृहन्मुंबई महानगर पालिकेला रविवारी प्राप्त झाल्या असून शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
यामुळे, सोमवार दिनांक 26 ते बुधवार दिनांक 28 एप्रिल असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असं पालिकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान, प्राप्त लस साठ्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा अतिशय सीमित असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोव्हिड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे 59 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 132 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.
मात्र, कोव्हिड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते.

त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेऊन दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकेला आज कोविशिल्ड लसीच्या 1 लाख 50 हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या 8 हजार अश्या एकूण 1 लाख 58 हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत.
हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.
लस साठा उपलब्ध झाल्याने पुढील किमान तीन दिवस खासगी केंद्रांना देखील लसीकरण मोहीम राबवता येईल. लस साठा प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचे वितरण सुरू होते.
ज्यांनी लस साठा आज नेला नाही त्यांना उद्या सकाळी 8 वाजेपासून लस साठा नेता येईल. ही बाब लक्षात घेता, उद्या सोमवार दिनांक 26 एप्रिल 2021 रोजी काही केंद्रांवर लसीकरण प्रत्यक्ष उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.सर्व संबंधितांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असं आवाहन पालिकेनं नागरिकांना केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























