कोरोना ऑक्सिजनचा तुटवडा : 'औषधं आणि बेड देऊ शकत नसाल, तर निदान मरायला तरी थोडी जागा द्या'

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, भारत
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

"ऑक्सिजन, ऑक्सिजन, कुणी मला ऑक्सिजन देईल का?"

माझी सकाळच्या या कॉलने झाली. एका शालेय शिक्षिकेनी मला फोन केला. त्यांचे 46 वर्षीय पती दिल्लीच्या रुग्णालयात कोव्हिडशी झुंज देत आहेत. त्या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. म्हणून त्यांनी मला फोन करून विचारणा केली की कुठे ऑक्सिजन सिलेंडर मिळेल का?

मी माझ्याशी मनाशीच बोललो. दिल्ली शहरात श्वास घेणं ही आता चैन झाली आहे असंच वाटू लागलं आहे.

दिल्लीत असलेला ऑक्सिजन तुटवडा दूर व्हावा यासाठी रुग्णालय युद्ध पातळीवर काम करत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत फोन मेसेज करत आहेत.

त्या महिलेचा फोन आला, तेव्हा मॉनिटरच्या बीप होण्याचा आवाज स्पष्टपणे मला ऐकू येत होता. त्या सांगत होत्या, त्यांच्या पतीच्या ऑक्सिजनची पातळी 58 वर आहे. थोड्या वेळाने ती वाढून 62 वर गेली. जर तुमची ऑक्सिजनची पातळी 92 च्या खाली आली तर डॉक्टरांशी सल्ला-मसलत करावी असं सांगितलं जातं.

त्या सांगतात, पतीची ऑक्सिजनची पातळी वाढल्यामुळे त्यांना आता हायसं वाटत आहे.

मी माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीला मेसेज केला आणि विचारलं की ऑक्सिजनची पातळी किती असावी जेणेकरून रुग्णाला बरं वाटतं. ती सांगते, की ऑक्सिजनची पातळी 40 जरी असली तरी पेशंट आपल्याशी बोलू शकतो.

'25 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी जीव गेला'

मी वर्तमानपत्र उचललं. त्यात वाचलं की दिल्लीतल्या एका मोठ्या रुग्णालयात 25 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी जीव गेला. क्रिटिकल केअर युनिट ऑक्सिजनच्या अभावामुळे प्रचंड तणावाखाली आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजन मॅन्युअलीच दिलं जात आहे. म्हणजे क्रिटिकल केअरमध्ये असलेली उपकरणं न जोडताच हे ऑक्सिजन दिलं जात आहे.

वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर एक फोटो पाहून मन हेलावून गेलं. दोन पुरुष आणि एका महिलेला एका ऑक्सिजन सिलेंडरमधून ऑक्सिजन पुरवठा होत आहे.

सर्वसामान्यांनी कोव्हिडबाबत दाखवलेल्या निष्काळजीपणाने आणि सरकारच्या हलगर्जीपणामुळे तयार झालेल्या स्थितीने त्या तीन अनोळखी लोकांना दुःखात एकत्र आणलं.

काही दिवसांपूर्वीची एक बातमी वाचली. एका व्यक्तीचा 40 वर्षांचा मुलगा रुग्णालयाबाहेर बेडची वाट पाहत मरण पावला. निदान, त्याला स्ट्रेचर मिळालं होतं. त्या बातमीत असा उल्लेख होता.

दुःखात बुडालेले भारतीय या गोष्टीसाठीही कृतज्ञ दिसत असल्याची विचित्र स्थिती दिसत आहे.

जर तुम्ही जिवंत असताना आम्हाला बेड, ऑक्सिजन किंवा औषधी देऊ शकत नसताल तर मेल्यावर किमान जाळायला जागा तरी द्या, इतके असहाय लोक झाले आहेत.

जसा जसा दिवस पुढे सरकू लागला तसं मला जाणवलं काहीच बदलेलं नाही.

ऑक्सिजनअभावी लोक मरत आहेत, औषधीचा पुरवठा पुरेसा नाही. ब्लॅक मार्केटमध्येही जास्त पैसे मोजूनही औषधी मिळत नाहीत. दुकानांवर पाट्या औषधी संपल्याच्या पाट्या आहेत आणि लोक भीतीपोटी आवश्यकता नसताना देखील औषधी खरेदी करत आहेत. जणू काही आपण आता युद्धातच आहोत.

अनेक अर्थांनी हे पण खरं आहे की सध्या युद्धजन्यच स्थिती आहे.

त्या शिक्षिकेचा पुन्हा फोन आला. रुग्णालयाकडे ऑक्सिजन फ्लो-मीटर देखील नव्हतं. त्याची व्यवस्था तिला स्वतःच करावी असं सांगण्यात आलं.

मी फोना-फोनी केली. ट्विटरवर लोकांची मदत मागितली. एका व्यक्तीजवळ ते मिळालं आणि पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

सरकारने कितीही सांगू द्या, पण स्थिती वाईटहून दयनीयतेच्याच दिशेने जात असल्याचं दिसत आहे. ऑक्सिजन टॅंकर वेळेत पोहोचत नाहीयेत. बेड नाहीत, औषधांचं प्रमाण अल्प आहे.

भारतातील संपन्न वर्गाला काही विशेष अधिकार आणि चांगली वर्तणूक मिळत असे. पण त्यांचे विशेषाधिकार काढून घेतले आहेत असंच वाटत आहे. एका नियतकालिकाच्या संपादकाचा मला फोन आला. त्याच्या एका परिचितासाठी तो ऑक्सिजन सिलेंडर शोधत होता.

ज्या सोसायटीमध्ये मी राहतो तिथं लोकांनी छोटे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर विकत घेतले आहेत. ज्या लोकांना श्वास घेण्यासाठी अडचण होत आहे, त्यांची मदत याद्वारे केली जात आहे. आमच्या सोसायटीमध्ये 57 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि ते त्यांच्या घरात क्वारंटाईन झाले आहेत.

रुग्णांना त्यांच्या हालतीवरच मरण्यासाठी सोडून देण्यात आलेलं आहे. अनेकांची वाटचाल मंदगतीने मरण्याच्याच दिशेनी होत असल्याचं वाटत आहे. कोरोना हा अनेक आक्राळ-विक्राळ चेहरे असलेला आजार आहे असंच वाटत आहे.

अमेरिकेत प्रॅक्टिस करत असलेल्या पॉल कलानिधी यांनी त्यांच्या आठवणींवर 'व्हेन ब्रेथ बिकम्स एअर' नावाचं पुस्तक लिहिलं होतं. कलानिधी यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाला होता आणि त्यात त्यांचं 2015 मध्ये निधन झालं होतं. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं होतं. जरी मी मरणासन्न आहे, जरी मी मृत्यूच्या दारात आहे पण जोपर्यंत माझा मृत्यू होत नाही तोवर मी जिवंतच आहे.

त्यांच्या या वाक्याची प्रचिती आता येत आहे. प्राणवायूसाठी तडफडणाऱ्या अनेक भारतीयांच्या आयुष्यात आता केवळ काही गोष्टीच आता शिल्लक आहे, ज्यात करुणेचा काही अंश बाकी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)