कोव्हिड -19च्या लशींवरचा आयात कर भारत सरकार रद्द करणार #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images / RICARDO ARDUENGO
विविध वर्तमानपत्रं, आणि वेबसाईटवरील आज छापून आलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. कोव्हिड -19च्या लशींवरचा आयात कर भारत सरकार रद्द करणार
कोव्हिड -19साठीच्या आंतरराष्ट्रीय लशी भारतात लवकर याव्यात यासाठी या लशींवरची 10 % टक्के इम्पोर्ट ड्यूटी म्हणजेच आयात कर भारत सरकार रद्द करणार असल्याचं वृत्त मिंट या वर्तमान पत्राने दिलंय.
रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक - व्ही लशीला देशात आपत्कालीन परिस्थितीतल्या वापरासाठीची मान्यता देण्यात आली असून या लशीची बॅच लवकरच येण्याची शक्यता आहे.
सोबतच फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सननेही आपल्या लशींची विक्री भारतात करावी, अशी विनंती सरकारने या कंपन्यांना केल्याचं एका ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं.
2. तन्मय फडणवीसांनी लस कशी घेतली, सोशल मीडियावरून देवेंद्र फडणवीसांना सवाल
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा पुतण्या - तन्मय फडणवीस यांच्यावरून टीका करण्यात येतेय.
तन्मयने लशीचा दुसरा डोस घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सोशल मीडिया युजर्सनी टीका करायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Twitter / fadnavis_tanmay
देशामध्ये 45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्यात येत असताना तन्मयने लस कशी घेतली असा सवाल अनेक युजर्सनी विचारला आहे. तन्मय पेशाने कलाकार आहे आणि तो फ्रंटलाईन वर्कर नसल्याने तो लस घेण्यास पात्र कसा ठरला, ही वशिलेबाजी नाही का? असा सवाल काहींनी विचारला आहे.
महाराष्ट्र टाईम्सने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे.
3. 'उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यापेक्षा मनसेने एखादं कोव्हिड सेंटर उभारावं'
बारामतीमधली कोरोनाची परिस्थिती भीषण होत असून ही परिस्थिती हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचं म्हणत मनसेने राज्यपालांकडे धाव घेतली होती. राज्यपालांनी बारामतीत लक्ष घालावं अशी मागणी मनसेने पत्राद्वारे केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलंय.
उपमुख्यमंत्री आणि बारामतीची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असून. राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी करण्याऐवजी मनसेने बारामतीकरांसाठी एखादं कोव्हिड सेंटर उभारावं असं राष्ट्रवादीचे नगर सेवक किरण गुजर यांनी म्हटलंय.
आजच्या लोकमतमध्ये याविषयीची बातमी आहे.
4, मुंबईतले 90 टक्के रुग्ण बहुमजली इमारतींमधले
मुंबईत नोंदवल्या जाणाऱ्या कोव्हिड -19च्या एकूण रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे बहुमजली इमारती वा इतर इमारतींमध्ये असल्याचं बृहन्मुंबई महापालिकेने म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images / INDRANIL MUKHERJEE
मुंबईमध्ये सध्या 87,000 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस असून यापैकी 90 टक्के रुग्ण हे इमारतींमध्ये राहणारे आणि 10 टक्के रुग्णसंख्या झोपडपट्ट्यांमधली असल्याचं मुंबई महापालिकेची आकडेवारी सांगते. इंडियन एक्स्प्रेसने याविषयीची बातमी छापली आहे.
बहुमजली इमारती आणि इतर प्रकारच्या इमारतींमध्ये सध्या मुंबईत 79,032 अॅक्टिव्ह रुग्ण, तर 8,411 रुग्ण हे झोपडपट्ट्यांमधले असल्याचं या बातमीत म्हटलंय.
5. लॉकडाऊनमुळे थांबली RTE ची प्रवेश प्रक्रिया
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन लावण्यात आल्याने सोमवार 19 एप्रिलपासून सुरू होणारी शिक्षण हक्क कायद्यांतर्गतची (RTE) शाळा प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लॉकडाऊन संपल्यानंतर याविषयीची पुढची माहिती देण्यात येणार असल्याचं RTEच्या वेबसाईटवर म्हटलंय.
RTE कोट्यामधून प्रवेशासाठी यंदा 4,727 ऑनलाईन अर्ज आले असल्याचं सकाळने या बातमीमध्ये म्हटलं आहे.
प्रवेशासाठीची पहिली सोडत निघाल्यानंतर सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती, पण आता ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























