देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला चंद्रकांत पाटील यांचं उत्तर, 'शिवसेनेचे सगळेच संजय बेशिस्त आहेत' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. 'शिवसेनेचे सगळेच संजय बेशिस्त आहेत' - चंद्रकांत पाटील

राज्यात एकाबाजूला कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला राजकारण तापलं आहे. आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवरच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका सुरू असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी "मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते," असं वक्तव्य केलं आहे.

यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "बोलघेवड्यांनी वायफळ बडबड न करता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करावा! शिवसेनेचे सर्वच संजय बेशिस्त आहेत. यात कसलीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता गायकवाड."

संजय गायकवाड यांच्यासारखे अपशब्द वापरणं हे आमच्या राजकारणात बसत नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. न्यूज 18 लोकतमने हे वृत्त दिलं आहे.

2. उद्योगासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर केंद्र सरकारची बंदी

कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी आणली आहे. यामधून नऊ उद्योगांना वगळण्यात आलं आहे. 22 एप्रिलपासून या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे.

रविवारी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून औद्योगिक कारणासाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितलं आहे.

"कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून यामुळे मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. खासकरुन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारने गठीत केलेल्या ग्रुपने औद्योगिक वापरासाठी होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा देशातील वाढती मागणी पूर्ण करण्याच्या तसंच जीव वाचवण्याच्या दृष्टीने आढावा घेतला आहे," असं अजय भल्ला यांनी सांगितलं आहे.

3. 'कारवाईच्या धमक्यांना मी भीक घालत नाही' - देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून हा सरकारी कामातील हस्तक्षेप आहे असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलंय. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरूअसताना पोलीस ठाण्याला भेट देत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेणे देवेंद्र फडणवीस यांना अडचणीचे ठरू शकते. याप्रकरणी काय कारवाई करता येईल याबाबत सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

"मी अशा कारवाईच्या धमक्यांना भीक घालत नाही," असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 20 वर्षं विरोधी पक्षात काम केलं असून जनतेसाठी 36 केसेस अंगावर घेतल्या आहेत असंही फडणवीस म्हणाले.

4. महाराष्ट्रासाठी 'प्राणवायू एक्स्प्रेस'

राज्यातील वैद्यकीय वापरासाठीच्या प्राणवायूचा तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वेमार्फत 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' चालवली जाणार आहे.

यासाठी मध्य रेल्वे कळंबोली ते विशाखापट्टणम, जमशेदपूर, रुरकेला आणि बोकारो असा सुलभ मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) तयार करणार आहे.

कळंबोली येथून रविवारी (19 एप्रिल) विशाखापट्टणमच्या दिशेने पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे. ही एक्सप्रेस दहा टँकरमधून प्राणवायू भरून घेऊन राज्यात परतेल. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

5. 'राजकारण ही कीड कोरोनापेक्षा भयाण' - तेजस्विनी पंडीत

देशाला कोरोनापेक्षा घातक कीड लागली असून ती कीड म्हणजे राजकारण आहे असं मत अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांनी मांडलं आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्या आहेत.

या पार्श्वभूमीवर तेजस्विनी पंडीत यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं, "सगळ्यात मोठी 'कीड' आपल्या देशाला नाही तर जगाला लागली आहे. ती म्हणजे 'राजकारण'. ही 'कीड' कोव्हिडपेक्षा भयाण आहे. घातक आहे आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडपासून बचाव करता आला तर बघा! अवघड आहे सगळंच..काळजी घ्या."

तेजस्विनी पंडीत यांच्यासोबत आणखी काही कलाकारांनीही यापूर्वी कोरोना संकट काळातही सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)