कोरोना लस: मुंबईतील हाफकिन संस्थेत कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनास केंद्र सरकारची मंजुरी, #5मोठ्याबातम्या

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. मुंबईतील हाफकिन संस्थेत कोव्हॅक्सिन लसनिर्मितीस केंद्र सरकारची मंजुरी

मुंबईतील हाफकिन संस्थेला कोव्हॅक्सिन लशीचं उत्पादन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

हाफकिनमध्ये भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोव्हॅक्सिन लस बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने गुरुवारी (15 एप्रिल) मान्यता दिली आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत पत्र पाठवलं. वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हाफकिनमध्ये कोव्हॅक्सिन लस बनवण्याची परवानगी एका वर्षाकरिता दिली जात आहे. सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लसीकरण वेगाने करण्याची गरज आहे. त्यामुळे हाफकिनमध्ये लवकरच लशीचं उत्पादन सुरू करावं. लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात यावी, असं केंद्र सरकारने राज्याला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हाफकिनमध्ये लसनिर्मितीची परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे काही दिवसांपूर्वीच केली होती. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. राज्यात आता मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू करता येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

2. कुंभमेळ्यात 5 दिवसांत 1700 पेक्षा जास्त भक्तांना कोरोनाची लागण

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सध्या कुंभमेळा सुरू आहे. याठिकाणी लाखो भक्तांची गर्दी जमल्याचं सांगितलं जात आहे.

कुंभमेळ्यात गेल्या 5 दिवसांत म्हणजेच 10 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान सुमारे 1700 पेक्षा जास्त भक्तांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

गेल्या पाच दिवसात कुंभमेळ्यात तब्बल 2 लाख 36 हजार 751 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 1701 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून

गेल्या पाच दिवसात केलेल्या आरटी-पीसीआर आणि रॅपीड अँटीजन टेस्टचे हे आकडे आहेत. अजूनही काही जणांचे रिपोर्ट येणे बाकी असून हा आकडा 2000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभू कुमार झा यांनी दिली. चेंगराचेंगरी होण्याचं संकट असल्याने याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू करण्यात अडचणी असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

कुंभमेळा

फोटो स्रोत, Ani

3. PM केअर्स फंडमधून 100 नव्या रुग्णालयांमध्ये स्वतःचं ऑक्सिजन प्लांट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी कोरोना काळात सुरू केलेल्या PM केअर्स फंडमधून 100 नव्या रुग्णालयांमध्ये स्वतःचं ऑक्सिजन प्लांट बनवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी (15 एप्रिल) दिली.

सध्या देशातील 12 राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

सध्या कोरोना काळात ऑक्सिजनची अधिक गरज आहे. त्यामुळे PM केअर्स फंडातून 100 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने कळवलं. ही बातमी NDTV इंडियाने दिली.

नाना पटोले

फोटो स्रोत, facebook

4. विधानसभा 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष - नाना पटोले

2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असं भाकित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केलं आहे.

"आमच्याकडे पक्षाला मानणाऱ्या लोकांसाठी जागा आहे, संधीसाधूंसाठी नाही. आमची दारं सगळ्यांसाठी उघडी आहेत," असं इंदापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पटोले म्हणाले.

तसंच, इंदापूरमधला पुढचा आमदार हा काँग्रेसचा असेल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

गारा
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

5. अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. यामध्ये सातारा, सोलापूर, बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कमीजास्त प्रमाणात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडला. तसंच काही भागात गारपीटही झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या परिसरात शेतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढलं. यामध्ये शेतीचं नुकसान झाल्याचं समोर येत आहे. जिल्ह्यातील द्राक्ष व केळी बागांसह शेतात काढणी करून ठेवलेली ज्वारी, जनावरांचा कडबा, कांदा, तूर, हरभरा व अन्य पिकांचं मोठं नुकसान झालं. पंढरपूर तालुक्यातील एकटय़ा बाभुळगावात सुमारे दीडशे एकर केळीच्या बागांना फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)