कोरोना: 'रुग्णवाढीच्या दराप्रमाणे बेड वाढले पाहिजेत'- राजेश टोपे

फोटो स्रोत, Getty Images
"राज्यात ज्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे त्याप्रमाणात बेडही वाढले पाहिजेत," अशा सूचना दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं. "बेड्स नाहीत अशी परिस्थिती होता कामा नये," असे आदेश दिल्याचं त्यांनी आज सांगितलं.
राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
आरोग्य सेवा आयुक्तालयातून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हीडिओ काँफरन्सच्या माध्यमातून संवाद साधत आढावा बैठक घेतली.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे, सह आयुक्त डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ते पुढं म्हणाले, "होम आयसोलेशनमधे घरात कमी जागा असल्यामुळे संपूर्ण घर कोरोनाग्रस्त होतं, तशा व्यक्तींना इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन करावं."
एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये सौम्य लक्षणं आहेत आणि त्यांच्या घरी जर जागा कमी असेल तर त्यांची वेगळी व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात येते त्याला इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हटलं जातं. प्रशासनाच्या वतीने एखादी शाळा किंवा मंगल कार्यालय घेतलं जातं तिथे रुग्णांची खाण्या-पिण्याची तसेच औषधोपचाराची व्यवस्था केली जाते.
राज्यातील रेमडेसिविरच्या तुटवड्याबाबत टोपे म्हणाले, "ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या वापराबाबत टास्क फोर्सने नियमावली बनवली आहे. अत्यंत सौम्य लक्षणं असताना काही डॅाक्टर रॅमडेसिविर वापरत आहेत. यामुळे तुटवडा भासत आहे."
ऑक्सिजनच्या तुटवड्याबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले, "ज्या रुग्णालयात 50 किंवा त्यापेक्षा जास्त बेड्स असतील तर ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प सुरू करून त्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. सध्या बाहेरच्या राज्यांमधून ऑक्सिजन आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
"रेमडेसिविर बनवणाऱ्या कंपन्यांनी पुरवठा कमी केला आहे. लशीच्या पुरवठ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून केंद्र सरकारबरोबर बैठक घेण्याचा प्रयत्न सुरू आहे," असं टोपे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
सक्रिय रुग्णसंख्या पाहून खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा केला जाणार असून याबाबत आज अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या समवेत बैठक झाली असून त्यामध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठ्याबाबत नियोजन झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी खाटांचे नियोजन करतानाच या दोन्ही बाबींवर देखील नियंत्रण ठेवावे, असं टोपे यांनी यावेळी सांगितले.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना नाकारला जाणार नाही याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी विशेष लक्ष द्यावे.
कोविड सेंटर्समधील वातावरण, स्वच्छता, भोजनाचा दर्जा, स्वच्छतागृहांची साफसफाई यासाठी नियंत्रण ठेवावे आवश्यकता भासल्यास अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.राज्य कृती दलाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जो प्रोटोकॉल तयार केला आहे त्याचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी दिले.
औषधांच्या अतिरेकी वापरावर नियंत्रण ठेवतानाच ज्यांना लक्षणे आहे त्यांना बेड मिळेल यासाठी प्रयत्न करा असे सांगतनाच कोरोनाबाबत जाणीवजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
'वाढत्या मृत्यूदराचे कारण शोधा'
राज्यातील वाढत्या मृत्यूदराबाबत आरोग्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "काही जिल्ह्यांचा मृत्यूदर वाढतोय त्याचे कारण शोधा. रुग्ण उपचारासाठी उशिरा दाखल होत असून त्यांनी वेळेवर दाखल व्हावं यासाठी जनजागृती करण्यात यावी जेणेकरून लक्षणं दिसताच रुग्ण वेळेवर रुग्णालयात येतील."

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/getty images
पुढे ते म्हणाले, "ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या क्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घ्यावी आणि लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने चाचणी करतानाच अनावश्यक उपचार न करण्याबाबत सूचना देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
बऱ्याच ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन गांभीर्याने पाळत नाही असे निदर्शनास येत आहे त्यामुळे त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करावे, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























