IPL 2021: चेतन सकारिया- तीन महिन्यांपूर्वी भावाला गमावलं अन् आता कोरोनाने वडिलांना नेलं

फोटो स्रोत, Rajasthan Royals
22 वर्षीय चेतन सकारियाने सोमवारी दिमाखात आयपीएल पदार्पण केलं. पदापर्पणातच चमकदार कामगिरी करणार्या चेतनचं सगळीकडून कौतुक झालं. आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वी आणि स्पर्धा रद्द झाल्यावर, चेतनला एका पाठोपाठ दोन आघात बसले आहेत.
तीन महिन्यांपूर्वी चेतनच्या मोठ्या भावाचं निधन झालं होतं तर आता त्याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं आहे. चेतनचे वडील कांजीभाई सकारिया
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून एक उदयोन्मुखी खेळाडू बनलेल्या चेतनाचा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला होता.
काही महिन्यांपूर्वी चेतनच्या भावाने जीवन संपवलं. हा आघात सहन करत चेतनने सोमवारी आयपीएल पदार्पण केलं. घरात एवढी दुर्देवी घटना काही महिन्यांपूर्वी घडलेली असतानाही, चेतनने पदार्पणाच्या लढतीतच तीन विकेट आणि एक भन्नाट कॅच पकडत आपल्या कणखरतेची प्रचिती दिली.
एप्रिलमध्ये सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत चेतनने पदापर्पणाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पंजाब किंग्सच्या संघाच्या तीन विकेट काढल्या होत्या.
चेतनच्या आईने क्रिकइन्फो या वेबसाईटशी बोलताना सांगितलं होतं की, "आमच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यात जे घडलंय ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये. माझ्या दुसऱ्या मुलाने राहुलने महिनाभरापूर्वी आत्महत्या केली. चेतन त्यावेळी सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत खेळत होता. भावाच्या अकाली जाण्याबद्दल आम्ही त्याला दहा दिवस काहीही सांगितलं नाही कारण त्याच्या खेळावर परिणाम होऊ नये. वडिलांची तब्येत बरी नाही असं आम्ही त्याला सांगत राहिलो.
"जेव्हा चेतनचा कॉल यायचा तेव्हा तो वडिलांच्या तब्येतीविषयी विचारायचा. भावाशी बोलू द्या असं विचारायचा. आम्ही ऐनवेळी विषय बदलायचो. मी त्याला वडिलांशीही बोलू द्यायचे नाही कारण त्यांनी चुकून सांगितलं तर. एक दिवस माझ्या संयमचा बांध फुटला. भाऊ गेला हे कळल्यानंतर आणि आम्ही त्याला हे सांगितलं नाही हे समजल्यावर चेतन आमच्या कोणाशीच आठवडाभर बोलला नाही. तो धड खातपितही नसे. दोघा भावांचं गुळपीठ होतं".
या दुर्देवी घटनेनंतर महिनाभरात राजस्थान रॉयल्स संघाने लिलावात चेतनला 1.20 कोटी रुपयांची बोली लावत ताफ्यात समाविष्ट केलं. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत चेतन सहाव्या स्थानी होता. चेतनला आयपीएलमध्ये मिळालेले पैसे स्वप्नवत असल्याचं त्याच्या आईने सांगितलं.

फोटो स्रोत, BCCI/IPL
सलामीच्या लढतीतच चेतनने लोकेश राहुल, मयांक अगरवाल आणि झाय रिचर्डसन यांना बाद केलं. ख्रिस मॉरिसच्या बॉलिंगवर चेतनने निकोलस पूरनचा अफलातून कॅच टिपला.
सौराष्ट्रसाठी खेळणाऱ्या चेतनने खडतर परिस्थितीशी झगडत इथपर्यंतची वाटचाल केली. चेतनचे वडील ट्रक चालवत असत. काही काळानंतर त्यांनी टेंपो चालवायला सुरुवात केली. क्रिकेटसारखा महागडा खेळ परवडणार नाही अशी चेतनच्या कुटुंबीयांची स्थिती होती.
सौराष्ट्रचा अनुभवी खेळाडू शेल्डॉन जॅक्सनने चेतनला स्पाईक्स दिले होते. सौराष्ट्रला रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीपर्यंत मजल मारून देण्यात चेतनचा महत्त्वाचा वाटा होता.
चेतनच्या गुणकौशल्याला चेन्नईस्थित एमआरएफ फाऊंडेशनमध्ये पैलू पाडण्यात आले. ग्लेन मॅकग्रा, एम. सेंथीलनाथन यांनी चेतनच्या अॅक्शन, रनअप, अचूकता यावर खूप काम केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























